चीनचा तैवानला इशारा: लष्करी उद्दिष्ट साध्य, मात्र युद्धसराव चालूच राहणार
दि. ३० मे: गेल्या आठवड्यात तैवानच्या खाडीत, तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशांत केलेल्या युद्धसरावासाठी समोर ठेवलेली बहुतांश लष्करी उद्दिष्टे सध्य झाली असून, गरज पडल्यास भविष्यात पुन्हा असा सराव आयोजित करण्यात येईल, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर चीनला चिथावणी दिल्यास अधिक आक्रमक प्रत्युत्तर दिले जाईल, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी तैवान आणि अमेरिकेला दिला आहे.
तैवान हा आपलाच भाग आहे अशी चीनची धारणा आहे. तैवानमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आलेले लाई-चिंग-ते यांना चीन अराजकवादी आणि फुटीरतावादी मानतो. लाई यांनी अध्यक्षपदी शपथ घेतल्यानंतर चीन आणि तैवान हे दोन स्वतंत्र देश आहेत आणि तैवानचे सार्वोभौमत्त्व चीनसमोर दुय्यम नाही, असे प्रतिपादन केले होते. त्यामुळे लाई यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्या शपथविधीनंतर तिसऱ्याच दिवशी चीनने तैवानच्या खाडीच्या परिसरात आणि त्याच्या भोवती युद्धसरावाचे आयोजन केले होते. या सरावात चिनी नौदलाच्या आणि तटरक्षकदलाच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी भाग घेतला होता. ‘चीनकडून तैवानची जागा अतिक्रमित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या युद्धसरावाच्या निमित्ताने लाई यांच्या प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे,’ अशी टीका तैवानने केली होती. त्यानंतर क्काही तासांतच चीनकडून ही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेला युद्धसराव तैवानच्या आक्रमक स्वातंत्र्यवादी कारवाया आणि त्यांच्या फुटीरतावादावर अंकुश लावण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या सरावासाठी समोर ठेवलेली उद्दिष्टे आम्ही साध्य केली आहेत. ‘बाहेरच्या’ बदलत्या परिस्थितीमुळे कितीही अडचणी आल्या तरीही आम्ही त्याच्याशी सामना करण्यास सज्ज आहोत. फुटीरतावाद्यांनी पुढे काही कारवाया करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर उपाय अंमलात आणण्यात येतील,’ असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू क़्विआन यांनी म्हटले आहे. त्यांनी चीन आणि तैवानच्या विषयात सुरु असलेल्या ‘परकी हस्तक्षेपा’बद्दलही इशारा दिला आहे. चीनकडून अधिकृत युद्धसराव थांबविण्यात आला असला, तरी तैवान भोवतालच्या त्यांच्या कारवाया बंद झालेल्या नाहीत. गुरुवारीही चिनी युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी संयुक्तपणे युद्ध तयारी आणि गस्तीचा सराव केला, असे तैवानने म्हटले आहे.
चीनने तैवानवर प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्याचा आम्हाला प्रामुख्याने राजनयाच्या (डिप्लोमसी) क्षेत्रात मोठा फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि जागतिक संस्थांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला चीनकडून अडथळे आणले जातात,’ असे तैवानचे परराष्ट्रमंत्री लीन चिआ-लुंग यांनी तैवानी संसदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले. या आठवड्यात होणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत सहभागी होऊ नये म्हणून चीन आमच्यावर दबाव आणत आहे, असे ते म्हणाले. ‘तैवान हा चीनचाच एक प्रांत असल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात एक देश म्हणून सहभागी होता येणार नाही,’ असे चीनने म्हटले आहे. तैवानने मात्र त्यांचे हे म्हणणे फेटाळून लावले आहे. तैवान, रिपब्लिक ऑफ चायना, हा एक स्वतंत्र देश आहे. त्याचा चीनशी, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, काही संबंध नाही, असे तैवानने म्हटले आहे. साम्यवादी माओ झेडोंग यांच्याकडून चीनच्या अंतर्गत यादवीत पराभव झाल्यानंतर चीनमधील रिपब्लिकन नेत्यांनी पलायन करून १९४९ मध्ये तैवानची, रिपब्लिक ऑफ चायनाची, स्थापना केली होती.
विनय चाटी
(रॉयटर्स)