फिलीपिन्सचे अध्यक्ष मार्कोस ज्युनियर शुक्रवारी मनिलामध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) शांग्री-ला डायलॉगच्या 21व्या परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी मुख्य भाषण करणारे पहिले फिलीपिन्स नेते ठरले. आपल्या भाषणात, मार्कोस ज्युनियर म्हणाले की, फिलिपिन्सची आशियानच्या केंद्रस्थानी असलेली बांधिलकी त्याच्या परराष्ट्र धोरणाचा “मुख्य घटक” असेल.
ज्युनियर मार्कोस यांनी भारताचे वर्णन एक मित्र म्हणून केले आणि फिलीपिन्स भारताबरोबर यानंतरही सहकार्य करत राहील असे सांगितले. ते म्हणाले, “आम्ही अमेरिकेबरोबरची आमची युती आणि ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, ब्रुनेई आणि आशियानच्या इतर सर्व सदस्य देशांबरोबरची आमची धोरणात्मक भागीदारी मजबूत करू.”
त्यांनी इतर राष्ट्रांसोबत धोरणात्मक भागीदारी कायम ठेवण्याची घोषणा केली. केवळ संरक्षण क्षेत्रातच नव्हे तर पर्यावरण, आर्थिक, लोकांमधील संबंध आणि शाश्वत विकासासाठीही भविष्यात अधिक सहकार्य आणि सहयोगाने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
“आमच्या सर्व बहुपक्षीय सहभागांमधून, आम्ही आमच्या अद्वितीय प्रादेशिक दृष्टीकोनांसह जागतिक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो”, असे राष्ट्रपती म्हणाले. “आम्ही कोरिया प्रजासत्ताक (आणि) भारत यासारख्या मित्र राष्ट्रांसोबत अधिक दृढ सहयोगासाठी प्रयत्न करू”, असेही ते पुढे म्हणाले.
“भू-राजकारणाने नागरिकांचे सेवक म्हणून, सार्वजनिक बुद्धिजीवी म्हणून, राजकारणी म्हणून आपल्या लोकांसाठी काम करणे आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचे रक्षण करणे या आपल्या मूलभूत कर्तव्यापासून आपले लक्ष विचलित करू नये. याच कारणांमुळे आम्ही स्थैर्य, सुरक्षा आणि शांततेसाठी प्रयत्न करतो,” असे आपल्या भाषणात ज्युनियर मार्कोस म्हणाले.
चीन जवळजवळ संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा करतो. तर तैवान, फिलीपिन्स, ब्रुनेई, मलेशिया आणि व्हिएतनाम त्याच्या काही भागांवर दावा करतात. यासंदर्भात मार्कोस म्हणाले की फिलिपिन्स आणि इतर आग्नेय आशियाई देशांकडे दक्षिण चीन समुद्रात “शांतता, स्थैर्य आणि समृद्धी” साठी दूरदृष्टी आहे, परंतु चीनच्या दृष्टीने हे कमी महत्त्वाचे आहे.
“दुर्दैवाने, ही दृष्टी सध्या एक स्वप्नवत वास्तव आहे. बेकायदेशीर, जबरदस्तीने, आक्रमक आणि फसव्या कृतीने (चीन) आपल्या सार्वभौमत्वाचे, सार्वभौम अधिकारांचे आणि अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करीत आहे,” असे मार्कोस म्हणाले.
2022 मध्ये भारत – फिलीपिन्स दरम्यान झालेल्या 375 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या कराराचा एक भाग म्हणून यावर्षी एप्रिलमध्ये भारताने फिलीपिन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे दिली.
संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाने फिलीपिन्सच्या मरीन कॉर्प्सला शस्त्रप्रणाली पोहोचवण्यासाठी अमेरिकन वंशाचे सी-17 ग्लोबमास्टर वाहतूक विमान फिलिपिन्सला पाठवले. दक्षिण चीन समुद्रात वारंवार होणाऱ्या संघर्षांमुळे फिलीपिन्स आणि चीनमधील तणाव वाढला असताना फिलीपिन्स क्षेपणास्त्र प्रणालींची डिलिव्हरी घेत आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी फिलीपिन्स 3 ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली तटीय भागात (दक्षिण चीन समुद्र) तैनात करणार आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्स)