रशियाची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्थ केल्याचा युक्रेनचा दावा
दि. १० जून: रशिया विरोधातील युद्धात अमेरिकेच्या एफ-१६ या लढाऊ विमानांचा वापर केला गेल्यास ही विमाने रशियाकडून लक्ष्य करण्यात येतील, असा इशारा रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘ड्युमा’च्या सदस्याने दिला आहे. अशा परिस्थितीत रशियाने या विमानांना लक्ष्य केल्यास ती रशियाची न्याय्य भूमिका असेल, असेही या सदस्याने सांगितले. दरम्यान, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला उद्ध्वस्थ केल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे.
रशियाच्या आक्रमणाविरुद्ध झुंजत असलेल्या युक्रेनला अमेरिकेसह अन्य युरोपीय देशांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे आर्थिक आणि लष्करी मदतही केली आहे. ही मदत युक्रेनकडून रशियाच्या विरोधात वापरली जाऊ नये, यासाठी रशियाकडून दबाव आणला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या ‘ड्युमा’च्या संरक्षण विषयक समितीचे प्रमुख असलेल्या आंद्रेई कार्तापोलोव यांनी दिला आहे. रशियाविरोधात लढण्यासाठी आणि रशियन भागावर बॉम्बफेक करण्यासाठी एफ-१६ या लढाऊ विमानांचा वापर युक्रेनकडून करण्यात आल्यास या विमानांवर क्षेपणास्त्रे डागून टी पाडण्यात येतील. अशा प्रसंगी ती विमाने रशियन संरक्षण यंत्रणांचे न्याय्य लक्ष्य ठरतील. ही विमानेच नव्हे तर, युक्रेनबाहेर असलेले इतर हवाईतळही लक्ष्य करण्यात येतील, असे कार्तापोलोव यांनी सांगितले.
क्रिमियातील रशियाची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्थ
दरम्यान, आपल्या हवाईदलाने रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्थ केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या हवाईदलाने क्रीमियाच्या परिसरात असलेल्या रशियाच्या तीन जमिनीवरून हवेत अमर करणाऱ्या हवाई संरक्षण यंत्रणा मारा करून निकामी केल्या आहेत. झ्हान्कोई येथे हवाईदलाने यशस्वी मारा करून रशियाची एस-४०० ही हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केली, तर येव्पातोरीया आणि चोर्नोमोर्स्क येथे तैनात असलेल्या दोन एस-३०० या यंत्रणांवरही मारा करण्यात आला, अशी माहिती युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी दिली. ‘युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणा तातडीने बंद झाल्याचे रडारच्या नोंदीवरून लक्षात आले. त्याचबरोबर मोठा स्फोटही ऐकू आला, असे युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी ‘टेलिग्राम’वर म्हटले आहे.
रशियाचा दावा फेटाळला
रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये शिरकाव केल्याच्या दावा युक्रेनकडून सोमवारी फेटाळण्यात आला. रशियाच्या चेचन्या प्रांताचे नेते रमजान कादिरोव यांनी अखमात या चेचन स्पेशल फोर्सेसनी युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी प्रांतातील रीझ्हीवका या सीमावर्ती भागात शिरकाव करून तो ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. मात्र, युरी झार्को या स्थानिक युक्रेनी अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावला आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)