लष्करी शिक्षणात भारत आणि बांगलादेश या दोनही देशांचे संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने, विशेषतः धोरणात्मक आणि परिचालन अभ्यासात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. सागरी सुरक्षा, सागरी अर्थव्यवस्था, अंतराळ आणि दूरसंचार यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांच्या दृष्टीने दोन्ही देशांसाठी हा करार फायदेशीर ठरणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, मीरपूर, ढाका यांनी ‘मिलिटरी एज्युकेशन स्ट्रॅटर्जिक ॲन्ड ऑपरेशन स्टडीज’मधील सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे. हा सामंजस्य करार सशस्त्र दलांची व्यावसायिक क्षमता वाढवण्याच्या आणि उभय देशांमधील संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही दोन्ही कॉलेजेस तिन्ही सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कर्मचारी आणि कमांडसाठी असणाऱ्या सर्वोच्च जबाबदाऱ्यांसाठी तयार करतात. दोन्ही कॉलेजमधील मूल्ये, प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि कार्यपद्धती समान असून आव्हानेही सारखीच आहेत. त्यामुळे या महाविद्यालयांनी द्विपक्षीय प्रतिबद्धता आणखी वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामंजस्य करारावर 22 जून 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली. हा सामंजस्य करार व्यावसायिक कौशल्य वाढविण्यात, धोरणात्मक घडामोडींमध्ये सखोल अंतर्दृष्टी प्रदान करण्यात, सर्वोत्तम पद्धती आणि कौशल्ये शेअर (सामायिक) करण्यात मदत करेल. तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्राध्यापक सदस्यांच्या शैक्षणिक क्षमता वाढविण्यासाठी मदत करेल. हा करार प्रशिक्षण अभ्यासक्रम, संयुक्त चर्चासत्रे, अध्यापन आदानप्रदान आणि प्रशिक्षक भेटींचे आयोजन सोपे करण्यात मदत करेल.
पंतप्रधान मोदी यांनी चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले, ते म्हणाले, “आम्ही संरक्षण उत्पादनापासून ते सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणापर्यंत तपशीलवार चर्चा केली आहे.” त्यांनी इंडो-पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये सामील होण्याच्या बांगलादेशच्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले. हे पाऊल भारताच्या सागरी शेजारी देशांमधील प्रादेशिक सहकार्य लक्षणीयरीत्या विस्तारेल आणि आणखी सोपे करेल. हे करार, दोन्ही देशांना परस्पर लाभ देण्याचे आश्वासन देणाऱ्या ‘नेबरहूड फर्स्ट’ या दृष्टिकोनातून भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहेत, यावर त्यांनी जोर दिला.
टीम भारतशक्ती