सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ट्रम्प यांच्या बाजूने मोठा निर्णय दिला. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असतानाच्या काळात घेतलेल्या निर्णयांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, या निकालाने एक ‘धोकादायक पायंडा’ पाडला आहे. यामुळे राष्ट्राध्यक्ष एखाद्या राजासारखा वाटायला लागेल. म्हणूनच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना नाकारून अमेरिकन लोकांनी या निकालाबाबत ‘असहमती’ व्यक्त करावी असे आवाहन बायडेन यांनी केले.
व्हाईट हाऊसमधून अतिशय स्पष्ट, मोजून मापून दिलेल्या प्रतिक्रियेत बायडेन म्हणाले की, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ असा आहे की 2020 च्या निवडणुकीचे निकाल उलटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी खटला चालवण्याची शक्यता फारच कमी आहे. या निकालामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांना राजाचा दर्जा मिळू शकतो असा इशारा त्यांनी दिला .
अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एका माजी राष्ट्राध्यक्षाने सत्तेत असताना केलेल्या कृत्याबद्दल फौजदारी खटला दाखल करता येणार नाही, असे म्हटले आहे. मात्र खाजगी कृत्य केल्याबद्दल खटला चालवता येईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालामुळे एका महत्त्वाच्या निर्णयात प्रथमच कोणत्याही प्रकारचा खटला चालवण्यापासून अध्यक्षीय विशेषाधिकारांना मान्यता दिली गेली आहे.
अमेरिकेत राजे नसतील या तत्त्वावर या राष्ट्राची स्थापना झाली होती. आपल्यापैकी प्रत्येकजण कायद्यापुढे समान आहे. कोणीही, कधीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही नाहीत,” असे बायडेन टेलीप्रॉम्प्टरच्या मदतीने आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले.
ते म्हणाले की न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की राष्ट्रपती काय करू शकतात यावर आता अक्षरशः कोणतेही बंधन (मर्यादा) नाही. बायडेन म्हणाले, “हा एक धोकादायक पायंडा आहे, कारण कार्यालयाचे अधिकार यापुढे कायद्याने मर्यादित राहणार नाहीत. तर या मर्यादा केवळ राष्ट्राध्यक्ष स्वतः तयार करतील.”
गेल्या आठवड्यात ट्रम्प यांच्याविरुद्धच्या डिबेटमध्ये अतिशय खराब प्रदर्शनामुळे त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून या निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच 81 वर्षीय बायडेन व्हाईट हाऊसमध्ये त्यांची पहिली प्रतिक्रिया देत होते.
अटलांटा येथील डिबेटमध्ये अनेकदा शब्द उच्चारताना ते अडखळले होते. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी तसंच आणखी चार वर्षे देशाचा कारभार चालवण्यासाठी ते सक्षम आहेत या दृष्टीने त्यांच्या प्रतिक्रिया आणि वागणुकीची छाननी केली जात आहे.
बायडेन म्हणाले की त्यांनी उदारमतवादी न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर यांची बाजू घेतली, ज्यांनी लिहिले की 6-3 अशा मतांनी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे त्यांना अमेरिकेच्या लोकशाहीची आता भीती वाटते.
आता अमेरिकन लोकांना तेच करावे लागेल जे न्यायालयाने करायला हवे होते, पण केले नाही. आता अमेरिकेचे लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत निर्णय देतील “, असे बायडेन यांनी नोव्हेंबरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा संदर्भ देत सांगितले.
“न्यायमूर्ती सोटोमेयर यांच्या आजच्या असहमतीशी मी सहमत आहे,” असे ते पुढे म्हणाले. “त्यामुळे अमेरिकन लोकांनीही याबाबत असहमती दर्शवली पाहिजे. मी असहमत आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. देव आपली लोकशाही टिकवून ठेवण्यास मदत करो,” असे बायडेन शेवटी म्हटले.
ज्या व्यक्तीने तो जमाव अमेरिकेच्या राजधानीमध्ये पाठवला होता, त्याला नंतर त्यादिवशी जे घडले त्याबद्दल संभाव्य गुन्हेगारी शिक्षेला सामोरं जावं लागत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी अमेरिकन लोकांना न्यायालयाकडूनच उत्तर मिळणे योग्य आहे,” असे बायडेन म्हणाले. दंगली भडकवण्यासाठी उत्तेजन देणाऱ्या भूमिकेबद्दल ट्रम्प यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
बायडेन म्हणाले की, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी त्या खटल्याचा निकाल जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. मात्र आता, आजच्या निर्णयामुळे, ते अत्यंत अशक्य आहे. या देशातील लोकांचे हे भयंकर नुकसान आहे,” असेही बायडेन यांनी ताशेरे ओढले.
सूर्या गंगाधरन