कझाकस्तान या मध्य आशियाई राष्ट्राची राजधानी अस्ताना, आजपासून (बुधवारी) सुरू होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी सज्ज आहे.
भारतातील नव्या सरकारच्या संसदेतील पहिल्या अधिवेशनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या शिखर परिषदेसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याने परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
नऊ सदस्य देशांचे नेते, निरीक्षक आणि पाहुण्यांचे स्वागत करणारे बॅनर याव्यतिरिक्त, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांसह करण्यात आलेली कडक सुरक्षा व्यवस्था नजरेत भरणारी आहे.
“शिखर परिषदेच्या आगामी कार्यक्रमांसाठी याआधीच्या कार्यक्रमांपेक्षा पूर्णतः वेगळी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अस्तानाच्या रहिवाशांना एकतर घरीच राहण्याची किंवा शिखर परिषदेच्या काळात शहर सोडून जाण्याची शिफारस केली आहे,” असे एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या शिखर परिषदेला उपस्थित राहणार असून ते एक दिवस आधीच कझाकस्तानला पोहोचले आहेत. गुरुवारी एससीओ शिखर परिषद संपल्यानंतर ते ताजिकिस्तानलाच्या राजकीय दौऱ्यावर जाण्याची अपेक्षा आहे. शी जिनपिंग यांच्यासमवेत परराष्ट्र मंत्री वांग यी, चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या जनरल ऑफिसचे संचालक काई की आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विमानतळावर कझाकिस्तानचे अध्यक्ष कासिम-जोमार्ट टोकायेव यांनी स्वागत केले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन मंगळवारी उशिरा किंवा बुधवारी पहाटे लवकर कझाकस्तानला पोहोचण्याची अपेक्षा आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या आगमनाची अचूक वेळ सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
इतर नेत्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि तुकीशचे अध्यक्ष तय्यिप एर्गोगन शिखर परिषदेला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
अस्तानाच्या ग्रॅण्ड पॅलेस ऑफ इंडिपेंडन्स येथे होणाऱ्या या शिखर परिषदेत बेलारूस या देशाचा दहावा पूर्ण सदस्य म्हणून समावेश होणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि पुतीन युरेशियाच्या ब्लू प्रिंटचा विस्तार करण्यासाठी एससीओच्या व्यासपीठाचा वापर करतील अशी अपेक्षा आहे.
आर्थिक सहकार्य हे अस्तानाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. व्यापारातील अडथळे कमी करण्यासाठी या परिषदेत पुढाकार घेतला जाईल तसंच सदस्य देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इतर पावले उचलली जातील, असे सूत्रांनी सांगितले. याचाच एक भाग म्हणून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची प्रमुख योजना ‘द बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ वर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
“एकंदरीत, आम्ही अतिशय उपयुक्त आणि फलदायी शिखर परिषदेची अपेक्षा करतो, ज्याचा दूरगामी परिणाम होईल,” असे एका कझाक अधिकाऱ्याने सांगितले.
रामानंद सेनगुप्ता