कॅनडात सशस्त्र दलांचे नेतृत्व करण्यासाठी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे.
सशस्त्र दलांमधील लिंगभेद आणि गैरवर्तन निर्मूलन दलप्रमुख लेफ्टनंट-जनरल जेनी कॅरिग्नन 18 जुलै रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारतील.
मूळच्या लष्करी अभियंत्या असलेल्या कॅरिग्नन यांनी आपल्या 35 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत अफगाणिस्तान, बोस्निया-हर्जेगोव्हिना, इराक तसेच सीरियामध्ये सैन्यदलाचे नेतृत्व केले आहे.
त्यांना जनरल पदावर बढती दिली जाईल. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या सशस्त्र दलातून (सीएएफ) निवृत्त होत असलेले सध्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल वेन आयर यांची जागा लेफ्टनंट-जनरल जेनी कॅरिग्नन घेतील.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी लेफ्टनंट-जनरल जेनी कॅरिग्नन यांचे नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. त्यांच्यात असणारे विलक्षण नेतृत्वगुण, सर्वोत्कृष्टतेचा ध्यास आणि सेवेप्रती असणारे समर्पण ही कॅनडाच्या सशस्त्र दलांच्या दृष्टीने एक प्रचंड महत्त्वाचे कौशल्य असल्याचे त्यांनी मान्य केले.
जस्टीन ट्रुडो म्हणाले, “मला विश्वास आहे की, नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून, त्या कॅनडाला मजबूत, अधिक सुरक्षित आणि जागतिक सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करतील.”
राष्ट्रीय संरक्षण मंत्री बिल ब्लेअर यांनीही लेफ्टनंट-जनरल जेनी कॅरिग्नन यांचे अभिनंदन केले. आपल्या अभिनंदन संदेशात राष्ट्रीय संरक्षण मंत्री म्हणाले, “लेफ्टनंट-जनरल जेनी कॅरिग्नन यांनी कॅनडासाठी देशात आणि परदेशात बजावलेली सेवा सर्वोत्कृष्ट आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, खडतर कामगिऱ्यांमध्येही उत्कृष्टतेसाठी त्यांच्या नावाची नोंद आहे.”
बिल म्हणाले की त्यांच्या व्यापक अनुभवामुळे नवनवीन सुरक्षा आव्हानांमध्ये कॅनेडियन सशस्त्र दलांचे नेतृत्व करण्यासाठी त्या योग्य व्यक्ती बनल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, “त्यांच्या नेतृत्वाखालील या महत्त्वाच्या संस्थेच्या भविष्याबद्दल मला विश्वास आहे. लेफ्टनंट-जनरल कॅरिग्नन यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही एकत्र काम करत राहण्यासाठी उत्सुक आहोत.” असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार गव्हर्नर जनरल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करतात.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफवर कॅनेडियन सशस्त्र दलांचे (सी. ए. एफ.) नियंत्रण आणि प्रशासन करण्याची जबाबदारी सोपवलेली असते आणि तो लष्करी रणनीती, योजना आणि लष्कराच्या आवश्यकतांसाठी देखील जबाबदार असतो.
कॅरिग्नन अशा वेळी पदभार स्वीकारणार आहेत ज्यावेळी कॅनडावर संरक्षण खर्च वाढवण्यासाठी मित्रराष्ट्रांचा दबाव आहे. सशस्त्र दल सैन्य भरतीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे, कालबाह्य झालेली साधनसामग्री बदलण्यात विलंब होत आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये नौदलाच्या प्रमुखांनी ही सेवा ‘गंभीर स्थितीत’ असल्याचा इशारा दिलेला आहे आणि कदाचित 2024 मध्ये नौदल आपली मूलभूत कर्तव्ये पार पाडू शकणार नाही अशी परिस्थिती आहे.
स्त्रीवादी भूमिकेचे समर्थक असलेल्या ट्रुडो यांनी 2015च्या उत्तरार्धात पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली आणि लिंग समानतेला चालना देण्यासाठी तयार केलेल्या धोरणांचा पाठपुरावा केला.
2021 मध्ये पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी कॅनडाच्या दुसऱ्या सर्वोच्च लष्करी पदासाठी पहिल्यांदाच केल्या गेलेल्या महिलेच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती.
लेफ्टनंट-जनरल फ्रान्सिस एलन यांना संरक्षण कर्मचाऱ्यांच्या उप-प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे लष्कराने त्यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले होते.
ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कॅनडाच्या इतिहासात प्रथमच एका कणखर महिलेला उपाध्यक्षपदावर पाहून मला खूप आनंद झाला आहे.
2018 मध्ये रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची – ब्रेंडा लकी यांची – कॅनडाच्या पंतप्रधानांनी नियुक्ती केली होती. ब्रिटीश राजेशाहीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे शेवटचे दोन गव्हर्नर जनरल महिलाच होत्या. ट्रुडो यांनी त्या दोघींच्याही नावांचा उल्लेख केला.
तृप्ती नाथ
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)