ब्रिटनच्या निवडणुकीत सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला अनेक ठिकाणी मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. संरक्षण सचिव तसंच संभाव्य भावी नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मंत्र्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी विक्रमी संख्येने त्यांची संसदीय जागा गमावली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
संरक्षण मंत्री ग्रँट शॅप्स आणि संसदेच्या खालच्या सभागृहाच्या नेत्या पेनी मॉर्डट हे आठ कॅबिनेट मंत्र्यांपैकी आहेत ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. याआधी 1997 मध्ये टोनी ब्लेअर यांच्या लेबर पक्षाला निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून ते सत्तेवर आणले तेव्हा सात खासदार पराभूत झाले होते. यंदा हा विक्रम मोडीत निघाला.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 200 हून अधिक जागा गमावल्या आहेत. लेबर पक्ष 2010 नंतर प्रथमच सत्ताग्रहण करणार आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा गमावल्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांना दोषी ठरवत शॅप्स यांनी आपल्या भाषणादरम्यान कंझर्व्हेटिव्ह पक्षावर हल्ला चढवला.
“आम्ही पारंपरिक कंझर्व्हेटिव्ह मतदारांच्या संयमाचा गैरफायदा घेतला आहे. अंतहीन राजकीय सोप ऑपेरा तयार करण्याच्या मानसिकतेबरोबरच अंतर्गत शत्रुत्व आणि गटबाजी यांच्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे ते म्हणाले.
आर्थिक अस्थैर्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला राग, राजकीय घोटाळे आणि अनेक वर्षांच्या सरकारी खर्चातील कपातीनंतर सार्वजनिक सेवांमध्ये निर्माण झालेल्या संकटांमुळे, मतदारांनी ब्रिटनमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा जास्त काळ सत्तेत राहिलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधात मतदान केलं.
1997 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री मायकेल पोर्टिलो यांच्यानंतर आपली जागा गमावणारे शॅप्स हे ब्रिटनमधील सर्वात वरिष्ठ मंत्री आहेत. आधुनिक ब्रिटनच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात दुर्मिळ घटना मानता येईल.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त झालेल्या शॅप्स यांनी दळणवळण, उर्जेपासून ते वाणिज्यपर्यंत अनेक खाती सांभाळली आहेत.
ब्रिटिश राजकारणात वरिष्ठ मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागणे ही घटना तुलनेने दुर्मिळ आहे. गेल्या 27 वर्षांमध्ये झालेल्या सहा निवडणुकांमध्ये गुरूवारपर्यंत केवळ चार कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या जागा गमावल्या होत्या.
मात्र शुक्रवारी पहाटेपासून जाहीर होत गेलेल्या निकालांनंतर पराभवाची मालिकाच सुरू झाली.
यावेळी सरकारच्या कारभाराची जबाबदारी पेनी मॉर्डंट यांच्यावर होती. संसदेमध्ये अपेक्षेनुसार सुनाक यांचा दणदणीत पराभव झाला आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं असतं त्यांची जागा घेण्यासाठी पेनी मॉर्डंट आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या.
प्रिवी कौन्सिलच्या लॉर्ड प्रेसिडेंटच्या त्यांच्या मानद पदाचा अर्थ होता की 2022 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रमुख घटनात्मक भूमिका होती. राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी एका तासाहून अधिक काळ मोठी तलवार समारंभात धरून उभ्या असलेल्या पेनी मॉर्डंट यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली होती.
इतर पराभूत उमेदवारांमध्ये पीटर बॉटमली यांचा समावेश आहे. संसदेत सर्वात जास्त काळ सेवा देणारे खासदार म्हणून ते ओळखले जातात. सर्वात जास्त काळ संसदेत राहिलेल्या सदस्याला देण्यात येणारी ‘फादर ऑफ द हाऊस’ ही मानद पदवीही त्यांना प्रदान करण्यात आली होती. 1975 साली पहिल्यांदा ते निवडून आले होते. यंदा मात्र वर्थिंग वेस्टच्या जागेवर त्यांचा पराभव झाला.
“18 व्या शतकातील माननीय गृहस्थ” अशी पदवी मिळालेल्या आणि त्यांच्या दिमाखदार जीवनशैली तसंच कायम डबल-ब्रेस्टेड सूट परिधान करणारे माजी मंत्री जेकब रीस-मोग यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.
अर्थात या निवडणुकीत केवळ कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्याच वरिष्ठांना पराभवाचा धक्का बसला आहे असं नाही.
किएर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाच्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते सांभाळतील अशी अपेक्षा असलेले जोनाथन एशवर्थ हे अपक्ष उमेदवाराकडून पराभूत झाले आहेत.
डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ राजकीय नेते जॉर्ज गॅलोवे यांनाही पराभूत व्हावे लागले आहे. पॅलेस्टिनी समर्थक या अजेंड्यावर चालणाऱ्या लेबर पक्षाने आपल्या उमेदवाराचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मार्चमध्ये गॅलोवे यांनी ब्रिटनच्या लेबर पक्षासाठी रॉचडेलची जागा जिंकली होती.
सूर्या गंगाधर
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)