दलाई लामा यांनी त्यांच्या 89 व्या वाढदिवशी प्रकृती अस्वास्थ्य असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. पुढील वाढदिवसाच्या आसपास आपल्या उत्तराधिकारीबद्दलचा निर्णय स्पष्ट करू असे त्यांनी जाहीर केले आहे.
सध्या अमेरिकेला असणाऱ्या या तिबेटी बौद्ध धर्माच्या निर्वासित आध्यात्मिक नेत्याने एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की ते गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरे होत असून “शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त” आहेत.
“अलीकडेच माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली, ज्यामुळे मला काही समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता मी बरा होत असून समस्याही कमी झाल्या आहेत,” असे दलाई लामा यांनी अमेरिकेतून जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. इथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
“दलाई लामा रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे म्हणत, माझ्या आरोग्याबद्दल तुम्हाला गोंधळवून टाकण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. त्यामुळे माझी प्रकृती गंभीर असल्याचे भासवले जात आहे. अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवण्याची गरज नाही “, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी आता जवळजवळ 90 वर्षांचा आहे पण मला शारीरिक समस्या जाणवत नाहीत, फक्त माझ्या पायांमध्ये थोडी समस्या उद्भवली आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही केलेल्या प्रार्थनांसाठी मी तिबेटमधील आणि बाहेरच्या माझ्या सर्व तिबेटी लोकांचे, सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो,” असे म्हणत,”काही समस्या या वृद्धत्वाचा भाग आहेत,” अशीही टिपण्णी त्यांनी केली.
दलाई लामा 23 जून रोजी न्यूयॉर्क शहरात दाखल झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी तिबेटी समुदायाचे सदस्य आणि हितचिंतक रस्त्यावर रांगेत उभे होते.
बौद्ध धर्माला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करणारी एक करिश्माई व्यक्ती म्हणून दलाई लामा यांची ओळख आहे. निर्वासित असूनही तिबेटविषयक कार्य जिवंत ठेवल्याबद्दल 1989 मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. चीनने 1950 मध्ये तिबेटी प्रदेशात सैन्य पाठवल्यानंतर नऊ वर्षांनी दलाई लामा 1959 मध्ये भारतात पळून आले होते. आपण तिबेट “गुलाम” मुक्त करत आहोत असा चीनचा दावा होता.
दलाई लामांचे वय वाढत असताना आणि आरोग्यविषयक समस्यांशी ते लढा देत असताना, चीनमध्ये अधिक स्वायत्ततेसाठी किंवा संपूर्ण स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या तिबेटी लोकांच्या दृष्टीने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती हा एक मोठा कळीचा मुद्दा बनला आहे. तिबेटी बौद्धांचा असा विश्वास आहे की दलाई लामांच्या मृत्यूनंतर नवजात बालक म्हणून पुनर्जन्म होतो.
90व्या वाढदिवसाच्या आसपास आपण उत्तराधिकाराबद्दलचे स्पष्टीकरण करू -ज्यात आपला पुनर्जन्म होईल की नाही आणि कुठे यासह अनेक प्रश्नांची उत्तरे दिली जातील असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.
शनिवारी, जगभरातील हजारो बौद्ध अनुयायी आणि हितचिंतक दलाई लामा यांच्या दीर्घायुष्यासाठी उत्सव साजरा करत आहेत, प्रार्थना करत आहेत.
शेवटी, दलाई लामा हे तिबेटमध्ये परतण्याच्या सर्वात प्रबळ आशेचे प्रतिनिधित्व करणारे कणखर व्यक्तिमत्व आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)