पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा आजचा दिवस ‘वन टू वन संवाद’ (म्हणजे फक्त त्या दोघांचीच होणारी भेट) आणि त्यानंतर प्रतिनिधी स्तरावरील चर्चेमुळे अत्यंत व्यस्त असणार आहे. मोदींसाठी, एकीकडे रशियाशी असलेले द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे आहेत, तर दुसरीकडे या बैठकीबाबत जगाची नाराजी दर्शविणारी नजर त्यांच्यावर असेल. त्यामुळे याचा समतोल साधण्याची किमया मोदींना साधावी लागणार आहे.
प्रथम द्विपक्षीय संबंधांचा विचार करूया. पंतप्रधान मोदींचा हा दौरा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता आणि तो आता करावा लागला आहे. अभ्यासकांच्या मते, आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगळी असती तर चांगले झाले असते, पण अनुकूल परिस्थितीबद्दल आस बाळगणं म्हणजे चंद्राची इच्छा बाळगण्यासारखं आहे. मोदी यांना हातात आलेल्या पत्त्यांच्या मदतीनेच सद्य परिस्थिती हाताळावी लागेल.
रशियाचे युक्रेनवरील आक्रमण भारताच्या सार्वभौमत्वाच्या कल्पनेविरुद्ध असलं तरी, अनेक वेळा नमूद केलेल्या कारणांमुळे भारताला रशियाची गरज आहे.
भारतीय लष्कराकडे रशियाकडून घेण्यात आलेली शस्त्रास्त्रं, त्यांची सेवा आणि देखभाल होणं आवश्यक आहे. याशिवाय रशियाकडून होणारा तेल पुरवठा ज्यामुळे ऊर्जेचा विश्वासार्ह पुरवठा होण्याची गरज भागते,याशिवाय सहा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भारताने रशियाशी केलेला करार विसरून चालणार नाही. या करारानुसार दोन प्रकल्प सुरू झाले आहेत आणि बाकीचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
रशिया आणि चीन यांच्यातील वाढत्या धोरणात्मक सहकार्यामुळे भारताला चीनसोबतच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याची गरज आहे, हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे.
या भेटीनंतर आगामी काळात जागतिक नेते मोदींना काय सांगणार आहेत? त्यांच्यावर टीका होणार हे नक्की पण पंतप्रधानांचे पुतीन यांच्याबद्दलचे मत जाणून घेण्याची इच्छा देखील या नेत्यांना असू शकते.
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या युक्रेनबरोबरच्या युद्धाचा शेवट कसा होणार हे पुतीन यांना दिसतंय का? कसं? पुतीन मागे हटण्यास तयार असतील का, त्यासाठी ते किती प्रयत्न करतील आणि कसे? याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
मोदींकडे कदाचित या सगळ्यांवर मर्यादित उत्तरं असतील. पुतीन यांचं मन फक्त पुतीन यांनाच माहीत आहे. मोदी शक्य तितक्या मुत्सद्दीपणाच्या चौकटीत राहून रशियाच्या नेत्याला हे युद्ध संपवण्याचे आवाहन करतील यात काही शंका नाही. पण त्याचा किती परिणाम होईल?
“परम मित्र” म्हणजे किती पुढे जायचं आहे, काय बोलायचं आहे आणि कसं जायचं हे समजून घेणं.
येत्या काही तासांत, दोन्ही देश त्यांच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या अनुषंगाने बातचीत करतील. मात्र ही चर्चा नेमकी कशी होईल हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
सूर्या गंगाधरन