पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्याविषयी अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात झालेल्या बैठकीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने निवेदन जारी केले आहे. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी तीव्र भूमिका घेतली आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर रशियापासून दूर राहण्यासाठी भारताला पाश्चिमात्य देशांच्या दबावाला सामोरे जावे लागले आहे. रशियाबरोबरचे दीर्घकालीन संबंध आणि त्याच्या आर्थिक गरजांचा हवाला देत भारताने आतापर्यंत या दबावाला विरोध केला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात मोदी यांनी सोमवारी रशियात पुतीन यांची भेट घेतली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, पुतीन यांच्याशी झालेल्या त्यांच्या चर्चेमुळे मैत्रीचे बंध आणखी दृढ होण्यास नक्कीच मदत होईल.
अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, “पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार आहेत हे पाहण्यासाठी मी त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांकडे जातीने लक्ष ठेवून आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे, रशियासोबत त्यांच्या संबंधांबद्दल आम्हाला भेडसावणारी चिंता आम्ही थेट भारतालाच स्पष्टपणे सांगितली आहे.”
“आणि म्हणून आम्हाला आशा आहे की, भारत आणि इतर कोणताही देश जेव्हा रशियाशी संवाद साधतो, तेव्हा रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचा आदर केला पाहिजे, युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, हे ते स्पष्टपणे सांगतील.”
सोव्हिएत संघाच्या काळापासून रशिया हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. मात्र सध्या भारत इतर पर्यायांचीही चाचपणी करत आहे, कारण युक्रेनच्या युद्धामुळे रशियाच्या शस्त्रास्त्रे आणि सुटे भाग पुरवण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण झाला आहे.
अलीकडच्या काळात अमेरिकेने भारताला आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे आशिया-पॅसिफिकमध्ये चीनला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका भारताकडे बघत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादून त्याला जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे, तर चीन, भारत, मध्य पूर्व देश, आफ्रिकन देश आणि लॅटिन अमेरिकेने रशियाशी असलेले संबंध कायम ठेवले आहेत.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)