बंगळुरू येथील लघु-शस्त्र उत्पादक कंपनी एसएसएस डिफेन्सने .338 लापुआ मॅग्नम कॅलिबर स्नाइपर रायफलचा पुरवठा करण्यासाठी एका मित्र देशाकडून मोठा निर्यात करार मिळवला आणि तो यशस्वीपणे पूर्णही केला.
भारताने स्नाइपर रायफल्स परदेशात निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. स्नाइपर रायफलची रचना आणि निर्मिती पूर्णपणे भारतातच करण्यात आली आहे. यात तिच्या बॅरलचाही समावेश आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केवळ स्नाइपर रायफल्सच नव्हे, तर या खासगी कंपनीला अनेक मित्र राष्ट्रांकडून सुमारे 50 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीच्या दारूगोळ्याच्या पुरवठ्याचे कंत्राटदेखील मिळाले आहे.
संरक्षण सूत्रांनी सांगितले की खाजगी कंपन्यादेखील स्वतःहून ग्राहकांचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे भारत सरकार जलद मंजुरीच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांना हाताशी धरत आहे. परदेशातून आलेले विनंती अर्जदेखील अशा कंपन्यांकडे पाठवत आहे.
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्र अनेक नवे टप्पे पार करत आहे. परिणामी 2023 – 24 या आर्थिक वर्षात भारताचे वार्षिक संरक्षण उत्पादन सुमारे 1.27 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.
“भारत आता तोफांपासून क्षेपणास्त्र प्रणाली तसेच लहान शस्त्रास्त्रांपर्यंत अनेक उपकरणांची मोठ्या संख्येने निर्मिती आणि निर्यात करत आहे. भारत आतापर्यंत या प्रणालींचा आयातदार होता, परंतु आता आम्ही त्यांची निर्यात सुरू केली आहे,” असे एका सूत्राने सांगितले.
सूत्रांनी सांगितले की एसएसएस डिफेन्सने स्नाइपर रायफल्सची निर्यात आधीच पूर्ण केली आहे. ही रायफल 1500 मीटर आणि त्याहून अधिक उंचीवरील लक्ष्य टिपू शकते. या रायफलच्या निर्यातीबाबत आता इतर काही देशांशीही बोलणी सुरू आहेत.
या देशांतील प्रतिनिधींनी बंगळुरू येथील कंपनीच्या उत्पादन आणि चाचणी केंद्राला भेट दिली असून त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या रायफलची निर्यात क्षमता जास्त आहे कारण किमान 30 देश .338 लापुआ मॅग्नम स्नाइपर वापरतात आणि डझनभराहून अधिक उत्पादक त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार या रायफल्सचे विविध भाग तयार करत असतात.
देशाने स्नाइपर रायफल्सची निर्यात सुरू केली आहे, तर दुसरीकडे भारतीय लष्कर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या निर्यातदारांच्या शोधात होते. 2019 मध्ये लष्कराच्या नॉर्दर्न कमांडने बॅरेटकडून मर्यादित संख्येने .50 कॅलिबर एम95 आणि बेरेट्टाकडून .338 लापुआ मॅग्नम स्कॉर्पियो टीजीटी या रायफल्सची खरेदी केली होती.
मात्र लष्कराने दीड वर्षांपूर्वी रायफल्स खरेदीसाठी निविदा मागवल्या असल्या तरी 4 हजार 500 स्नाइपर रायफल्सची मोठी मागणी अद्याप प्रलंबित असून त्याच्या चाचण्या सुरूही झालेल्या नाहीत. सूत्रांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक देशांच्या पुरवठा साखळीला फटका बसला आहे आणि भारत ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.
आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्ससह)