हमासने दक्षिण इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यानंतर स्वतःच्या अपयशाच्या अहवालाचे निष्कर्ष इस्रायली सैन्याने जाहीर केले आहेत. हल्ल्याच्या वेळी सर्वात जास्त फटका बसलेल्या समुदायांपैकी एक असलेल्या किबुट्झ बेरीमधील नागरिकांचे संरक्षण करण्यात आपण अयशस्वी ठरल्याचे सशस्त्र दलांनी कबूल केले आहे. सुमारे एक हजार लोकांचा समुदाय असलेल्या बेरीवर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक नागरिक मारले गेले आणि 32 जणांना गाझाला ओलीस ठेवण्यात आले. यापैकी 11 ओलिस अजूनही तिथेच आहेत.
या तपासासाठी त्या दिवशी घडलेल्या सगळ्या घटनांची साखळी, झालेली लढाई आणि सुरक्षा दलांच्या वर्तनाची तपासणी करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले. किबुट्झ नागरिकांच्या संरक्षणात आपण कमी पडलो अशी स्वतःच्या अपयशाची कबुली देताना लष्कराने आपल्या शीघ्र प्रतिसाद दलाबरोबरच बेरी इथल्या रहिवाशांच्या शौर्याचे कौतुक केले. मोठ्या संख्येने दहशतवादी येऊनही या दहशतवाद्यांना मागे हटवण्याचा नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न केल्याचे अहवालात म्हटले आहे.
इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी इस्रायलच्या सैन्याची अजिबात तयारी नव्हती, हल्ला झालेल्या भागात अपुरे सैन्य होते, याशिवाय हल्ला झाल्यानंतर दुपारपर्यंत नेमके काय सुरू आहे याबद्दलचे चित्र स्पष्ट नव्हते. हल्ला सुरू झाल्यानंतर काही तासांनी देखील, बेरीच्या रहिवाशांना योग्य प्रकारे सतर्क करण्यात आले नव्हते. शिवाय सैन्याच्या लढाईत कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता, असे तपासात आढळून आले.
मात्र दहशतवाद्यांनी सुमारे 15 लोकांना ओलीस ठेवलेल्या घरावर रणगाड्यातून करण्यात आलेल्या हल्ल्यात लष्कराची कोणतीही चूक नव्हती असे तपासात आढळून आले. रणगाड्याने हल्ला केल्याच्या घटनेमुळे इस्रायलमध्ये नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल प्रचंड टीका झाली आहे.
त्या घरातून गोळीबाराचा आवाज आल्यानंतर तसेच दहशतवाद्यांनी स्वतःला आणि ओलिसांना ठार मारण्याचा त्यांचा हेतू जाहीर केल्यानंतर, ओलिसांना वाचवण्यासाठी सैन्याने तेथे घुसण्याचा निर्णय घेतला,” असे लष्कराच्या तपास अहवालात म्हटले आहे.
“पथकाला असे आढळले की घराच्या आत असलेल्या ओलिसांना रणगाड्याच्या गोळ्यांमुळे दुखापत झालेली नव्हती,” असे अहवालात म्हटले आहे. मात्र, आतमध्ये असलेल्या ओलिसांचा नेमका कोणत्या कारणांनी मृत्यू झाला हे नक्की करण्यासाठी पुढील तपास करणे आवश्यक आहे. त्यांना बंदूकधाऱ्यांनी मारले आहे असे दर्शविणारे काही पुरावे तिथे बघायला मिळाले.
इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलंट यांनी गुरुवारी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी सैन्याच्या अपयशाची राज्यस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. हा दिवस इस्रायलच्या नागरिकांसाठी सर्वात प्राणघातक दिवस ठरला तर होलोकॉस्टनंतर ज्यू लोकांवर करण्यात आलेला सर्वात वाईट हल्ला होता.
गॅलंड म्हणाले की, या तपासात आपण स्वतः आणि पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचीही चौकशी झाली पाहिजे. नेतान्याहू यांनी राज्यस्तरीय चौकशी आयोग स्थापन करण्याच्या या आधीच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
चौकशी आयोगाबरोबरच इस्रायली सैन्यानेही बेरीच्या रहिवाशांना भेट दिली. 7 ऑक्टोबरपासून आजही विस्थापित म्हणून जगणाऱ्या हजारो लोकांमध्ये बेरी येथील मणी रहिवासी आहेत.
टीम भारत शक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)