डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने प्रचार सभेदरम्यान गोळीबार करण्यात आला. मात्र गोळी त्यांच्या उजव्या कानात चाटून गेली. शनिवारी झालेल्या या घटनेमुळे तिथे घबराट पसरली. ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्त पसरले. गोळीबारामुळे बसलेल्या धक्क्यातून ट्रम्प लवकरच सावरले आणि त्यांनी हवेत आपली मूठ फिरवत तोंडाने ‘लढा! लढा! लढा!” असेच उपस्थितांना सांगितले.
सिक्रेट सर्व्हिसने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, गोळीबार करणारा ठार झाला आहे, रॅलीमध्ये सहभागी असलेल्या एकाचा मृत्यू झाला तर इतर दोन प्रेक्षक जखमी झाले. हत्येचा प्रयत्न म्हणून या घटनेचा तपास केला जात होता, असे एका सूत्राने रॉयटर्सला सांगितले. तर ट्रम्प यांची प्रकृती स्थिर आहे.
पिट्सबर्गच्या उत्तरेस सुमारे 30 मैल (50 किमी) अंतरावर असलेल्या पेनसिल्व्हेनियाच्या बटलर येथे झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मंचावर सांगितले की, “मला गोळी लागली जी माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागात घुसली. “खूप रक्तस्त्राव झाला.”
जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी 78 वर्षीय ट्रम्प यांनी नुकतेच आपले भाषण सुरू केले होते. गोळी लागल्याने त्यांनी उजव्या हाताने आपला उजवा कान पकडला. नंतर तो हात पाहण्यासाठी खाली आणला. तेवढ्यात त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याभोवती कडे करून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याआधी ट्रम्प पोडियमच्या मागे गुडघ्यावर पडले होते. सुमारे एका मिनिटानंतर ते पोडियमच्या मागून बाहेर आले तेव्हा त्यांची लाल रंगाची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ टोपी त्यांच्या हातात होती आणि सुरक्षा रक्षक त्यांना एका वाहनात बसवण्यापूर्वी ‘थांबा, थांबा’ असे म्हणताना ऐकू येत होते.
गोळीबार करणाऱ्याची ओळख आणि त्याचा हेतू लगेच स्पष्ट होऊ शकलेला नाही. आघाडीच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सनी त्वरित या घटनेचा निषेध केला आहे.
5 नोव्हेंबरच्या निवडणुकीला चार महिन्यांपेक्षा कमी काळ राहिलेला असताना गोळीबाराची ही घटना घडली आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांची डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी लढत होणार आहे.
रॉयटर्स/इप्सोससह बहुतांश जनमत चाचण्यांमध्ये हे दोन्ही उमेदवार जनमत चाचण्यांमध्ये समान चालल्याचे दिसून आले आहे.
बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला स्थान नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र आले पाहिजे.”
गर्दीत असलेले ट्रम्प समर्थक रॉन मूस यांनी गोंधळाचे वर्णन करताना म्हटले आहे, “मी सुमारे चार गोळ्या झाडल्याचे ऐकले आणि मी जमावाला खाली झुकताना पाहिले. नंतर ट्रम्पदेखील खरोखरच पटकन खाली पडले. मग सिक्रेट सर्व्हिसच्या रक्षकांनी धावत जाऊन शक्य तितक्या लवकर ट्रम्प यांचे संरक्षण केले. अवघ्या सेकंदभरात ते सर्व त्यांचे रक्षण करत होते.”
मूस यांनी सांगितले की त्यानंतर त्यांना एक माणूस धावत जाताना आणि लष्करी गणवेशातील अधिकारी त्याचा पाठलाग करताना दिसले. त्यांनी सांगितले की आपण अतिरिक्त गोळ्यांचा आवाजही ऐकला, पण नक्की कोणी गोळीबार केला याची आपल्याला खात्री नव्हती. त्यांनी सांगितले की, तोपर्यंत स्नाइपर्स मंचामागील गोदामाच्या छतावर उभे राहिले होते.
आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)