मंगळवारी मस्कतमधील एका मशिदीत इस्लामिक स्टेटच्या तीन जिहादींनी शिया उपासकांना लक्ष्य करत गोळीबार केला तेव्हा शांततामय ओमान हादरून गेला. मशिदीऐवजी त्यांनी दोन हिंदू मंदिरे किंवा गुरुद्वारा किंवा चर्च यांनाही लक्ष्य केले असते, तर ठार झालेल्या पाच निष्पापांपेक्षा (एक भारतीय, चार पाकिस्तानी) मृतांचा आकडा अधिक झाला असता.
इस्लामिक स्टेट (आयएस) शियांना लक्ष्य करण्यासाठी ओळखले जाते. इराकपासून अफगाणिस्तान तसेच पाकिस्तानपर्यंत करण्यात आलेल्या हत्याकांडांमध्ये शेकडो नागरिक प्राणाला मुकले आहेत. पण मस्कतला झालेल्या या हल्ल्यामागे काही वेगळेच कारण असण्याची शक्यता आहे.
“ओमान हा मुस्लिम बहुसंख्याक देश आहे, परंतु नागरिकांमध्ये प्रामुख्याने, पैगंबर मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर उदयास आलेली इस्लामची एक शाखा, इबादी यांचा समावेश आहे,” असे माजी मुत्सद्दी महेश सचदेव सांगतात. सचदेवा यांनी सौदी अरेबिया आणि गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जिथे ओमान सदस्य आहे) यासह पश्चिम आशियातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.
“सुन्नी इस्लाम आणि शिया इस्लामच्या मधोमध इबादी आहेत. त्यांच्याकडे सामान्यतः उदारमतवादी म्हणून पाहिले जाते, त्यांच्यासाठी दहशतवादाला फार काही महत्त्व नाही आणि आयएस त्यांचा तिरस्कार करते,” असे सचदेवा म्हणाले.
मात्र या विधानावरून मशिदीवर झालेल्या हल्ल्याचे स्पष्टीकरण मिळते का? अभ्यासकांचा असा अंदाज आहे की शियांना (आणि कालांतराने कदाचित इतर धार्मिक गटांना) लक्ष्य करणाऱ्या हिंसाचाराच्या कृतींद्वारे आयएस ओमानमध्ये आपले पाय रोवण्याची मनिषा बाळगून आहे.
मोहरमच्या पवित्र महिन्यात आशुरातील मशिदीवर झालेला हल्ला हा आखातातील प्रमुख शिया शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणला आव्हान देणारा आणि आयएसच्या अतिरेक्यांना हिंसाचाराच्या आणखी कृत्यांसाठी चिथावणी देणारा मानला जाऊ शकतो. दहशतवादी कुठून आले असावेत? ओमानमध्ये शस्त्रविक्रीवर कडक निर्बंध असताना त्यांना त्यांची शस्त्रे कुठून मिळाली?
या प्रश्नांची उत्तरे ओमानच्या नकाशात सापडतात. बहरीनमधील ‘द हिंदू’ चे वार्ताहर म्हणून आखाती देशांचे वार्तांकन करणारे पत्रकार अतुल अनेजा यांचा असा विश्वास आहे की ओमानच्या दक्षिणेकडे असलेल्या येमेनमध्ये सुरू असणाऱ्या गृहयुद्धामुळे सशस्त्र गटांना सुमारे 300 किलोमीटर लांबीच्या सध्या कोणतीही सुरक्षा नसलेल्या सीमेवरून पलिकडे जाण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण झाली असावी.
याशिवाय महेश सचदेव एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतात. मशिदीवर झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचे आहेत. या इस्लामिक स्टेटमधील अनेक जण मूळचे अल-कायदाचे होते, जे येमेनी वंशाचे होते आणि ओसामा बिन लादेनने तयार केले होते (त्याचे वडील येमेनचे होते जे नंतर सौदी अरेबियात स्थायिक झाले होते).
अभ्यासक येथे आणखी एका सौदी दुव्याबद्दल अंदाज लावतात. उत्तर सौदी अरेबियातील हैइल प्रदेशात राहणाऱ्या अल-रशीद जमातीने 1902 मध्ये अल सौद कुटुंबाने त्यांना पदच्युत करेपर्यंत वाळवंटी प्रदेशावर राज्य केले.
हे वैमनस्य आणि नाराजी अजूनही कायम असून विविध अहवालांनुसार, आयएसने समर्थनासाठी अल रशीद नेटवर्कमध्ये प्रवेश केला. योगायोगाने, अल रशीदचे जाळे इराक आणि तुर्कीपर्यंत पसरले आहे.
एक काळ असा होता जेव्हा सौदी अरेबियाने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त म्हणजे 2 हजार 500 लढवय्ये आयएसकडे पाठवले होते. याशिवाय सौदी धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून लाखो डॉलर्स आयएसला देण्यात आले मात्र काही काळाने सौदी लोकांना हे समजले की आयएसचे ध्येय त्यांची सत्ता संपवणे हे आहे आणि म्हणूनच सौदीने त्यांना पाठिंबा देणे बंद करण्याचा निर्णय घेतला.
मशिदीवरील हल्ला हा ओमान किंवा इतर आखाती देशांमधील अशा आणखी हल्ल्यांची सुरूवात असू शकते का?” असे सचदेव यांना विचारले असता ते म्हणाले, “हे सांगणे कठीण आहे, परंतु आयएस आपल्या ताकदीची पुनर्बांधणी करण्यास उत्सुक आहे असे दिसते. केवळ यावर्षी झालेल्या हल्ल्यांची संख्या बघितली तरी हे लक्षात येईल.”
जानेवारीमध्ये, आयएसने दोन स्फोट घडवून आणले ज्यात दक्षिण-पूर्व इराणच्या करमान शहरात 100हून अधिक लोक ठार झाले; या वर्षी मार्चमध्ये, चार कट्टर ताजिकांनी मॉस्कोच्या बाहेर क्रोकस सिटी हॉलमध्ये 140 लोकांना ठार केले; आणि गेल्या महिन्यात, इस्लामिक स्टेटने रशियन प्रजासत्ताक दागेस्तानमधील चर्च आणि सभास्थानावर केलेल्या रक्तरंजित हल्ल्यात 20 लोक मारले गेले.
आयएस पुन्हा संघटित होत असेल, पुन्हा शस्त्रसज्ज होत असेल आणि कदाचित नवीन सुरक्षित आश्रय शोधत असेल. ओमानमध्ये करण्यात आलेला गोळीबार पुढे काय होणार आहे याचा इशारा असू शकतो.
By (सूर्या गंगाधरन)