गॅमी चक्रीवादळामुळे तैवानने मंगळवारी आपला वार्षिक हान कुआंग युद्ध खेळ थोडक्यात आटोपला. वादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चिनी सैन्याने सामुद्रधुनी ओलांडून आक्रमण केल्यास तैवानच्या बचावात्मक योजना सुधारण्यासाठी हे युद्ध खेळ खेळले जातात. चक्रीवादळामुळे या सरावात व्यत्यय आल्याने सरावाच्या व्याप्तीवर परिणाम झाला आहे.
तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तैवानला प्रभावित करणारे हंगामातील हे पहिले चक्रीवादळ, गॅमी, बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्यान ईशान्य किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
सध्या तैवानने मध्यम स्वरूपाचे चक्रीवादळ म्हणून त्याची गणना केली आहे. हे वादळ नंतर तैवान सामुद्रधुनी ओलांडून शुक्रवारी पहाटे आग्नेय चिनी प्रांत फुजियानला धडकण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात होणाऱ्या तैवानच्या वार्षिक हान कुआंग लष्करी कवायतींमध्ये कपात करण्यात आली असून पूर्व किनाऱ्यावरील लढाऊ विमानांचा सरावही रद्द करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
मंत्रालयाचे प्रवक्ते सन ली-फांग यांनी ह्युलियन हवाई तळावर पत्रकारांना सांगितले की, सध्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. “त्यामुळे चक्रीवादळाची परिस्थिती पाहता आम्ही काही हवाई आणि नौदल घटकांना तैनात करू.”
तैवानच्या वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, आग्नेय किनाऱ्यापासून दूर असलेल्या ग्रीन आयलंड आणि ऑर्किड बेटाकडे जाणाऱ्या सर्व बोटांच्या फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. देशांतर्गत चार विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय विमान सेवांमध्ये अद्याप कोणताही व्यत्यय आलेला नाही.
गॅमी वादळ आता फिलिपिन्सच्या पूर्वेकडे सरकले आहे. वादळामुळे मुसळधार पाऊस पडत असला तरी त्यात अद्याप जीवितहानी झालेली नाही.
ही वादळे अत्यंत विध्वंसक असू शकतात, परंतु तैवान पारंपारिकपणे कोरड्या हिवाळ्याच्या महिन्यांनंतर, बेटाच्या दक्षिणेकडील भागात जलाशयाची भरपाई करण्यासाठी त्यांच्यावरच अवलंबून असतो.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)