आतापर्यंत उच्च दर्जाच्या दूरसंचार उपकरणांसाठी ओळखला जाणारा एचएफसीएल हा अग्रगण्य तंत्रज्ञान उपक्रम आता संरक्षण क्षेत्रातील एक प्रमुख उत्पादक म्हणून वेगाने स्वतःची ओळख प्रस्थापित करत आहे. निर्यातीकडे लक्ष देत, कंपनीने यशस्वीरित्या असे अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे.
एचएफसीएलच्या सर्वात उल्लेखनीय उत्पादनांपैकी एक म्हणजे तोफांच्या दारूगोळ्यासाठी स्वदेशात विकसित केलेले इलेक्ट्रॉनिक फ्यूज. लढाईच्या काळात विश्वासार्हता आणि परिणामकारकता दर्शविणाऱ्या या फ्युजची व्यापक चाचणी घेण्यात आली आहे. एचएफसीएल सध्या या नाविन्यपूर्ण फ्युजच्या निर्यातीबाबत चर्चा करत आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की हे पाऊल ‘आत्मनिर्भर भारत‘ अभियानाशी सुसंगत आहे, जे संरक्षण उत्पादनांसाठी आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देते.
आपल्या प्रगत संरक्षण उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये भर घालत, एचएफसीएलने संरक्षण दलांसाठी 12-मायक्रॉन टीआय-कोर-आधारित औष्णिक शस्त्रांची रचना केली आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विविध लढायांमध्ये आवश्यक लक्ष्यभेदाची अचूकता वाढवते.त्यामुळे एचएफसीएलला अशा नवकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सक्षम असलेल्या जागतिक कंपन्यांच्या निवडक गटामध्ये स्थान मिळाले आहे. कंपनीने हलक्या मशीनगन आणि रॉकेट लाँचरसाठी स्वदेशात विकसित केलेल्या या औष्णिक शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठीच्या निविदांमध्येही भाग घेतला आहे. त्यामुळे या उत्पादनांची सध्या वेगवेगळ्या टप्प्यांवर चाचणी सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
संरक्षण आणि सुरक्षा दलांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या माहिती, देखरेख आणि टेहळणी (आयएसआर) या गरजा पूर्ण करण्यासाठी, एचएफसीएल अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक प्रगती करत आहे. या प्रयत्नांचे उद्दिष्ट मजबूत आणि विश्वासार्ह आयएसआर क्षमता प्रदान करणे आहे, जी आधुनिक लष्करी कारवायांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते.
प्रगत रडार आणि आरएफ सोल्यूशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या रॅडडेफ प्रायव्हेट लिमिटेड या संशोधन आणि विकास उपक्रम उपकंपनीद्वारे, एचएफसीएलने विविध परिचालन गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन आणि किनारपट्टीवरील पाळत ठेवणाऱ्या रडारची रचना आणि विकास केला आहे. हे रडार फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड कंटिन्यूअस वेव्ह (एफएमसीडब्ल्यू) तंत्रज्ञानाचा वापर करतात. यामुळे पारंपरिक रडार प्रणालींपेक्षा अनेक फायदे होतात. शिवाय यात उच्च अचूकता, कमी वीज वापर आणि हस्तक्षेप प्रतिकार तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
भारताची संरक्षण क्षमता वाढवण्याची एचएफसीएलची बांधिलकी भारतीय लष्कराच्या मेक-2 कार्यक्रमातील त्याचा सहभाग परत एकदा अधोरेखित करते. वापरकर्त्यांकडून पहिल्या स्तरावरील चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, बीएमपी 2/2के पायदळ लढाऊ वाहनांची शस्त्रास्त्रे अद्ययावत करण्यासाठी विक्रेता म्हणून कंपनीची निवड झाली आहे.
एचएफसीएलकडे या उत्पादनांचे बौद्धिक संपदा अधिकार आहेत, जे आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत, असा कंपनीचा दावा आहे.
“एचएफसीएलने यशस्वीरित्या एक सर्वसमावेशक, आयपीआरच्या मालकीचा अत्याधुनिक संरक्षण उत्पादन पोर्टफोलिओ तयार केला आहे जो केवळ भारताच्या दृष्टीनेच महत्त्वाचा नाही तर निर्यातीसाठी देखील त्याला प्रचंड मागणी आहे. संरक्षण व्यवसायात लक्षणीय प्रवेश करत, आम्ही नवीन उत्पादन संधींचा शोध घेत आहोत आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय योगदान देण्यासाठी धोरणात्मक युती तयार करत आहोत. भारतीय संरक्षण दलांसाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी आमची नाविन्यपूर्ण उत्पादने आपला महसूल आणि नफा वाढवण्यासाठी सज्ज आहेत,” असे एचएफसीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र नाहटा म्हणाले.
या धोरणात्मक घडामोडी आणि स्वदेशी विकसित संरक्षण तंत्रज्ञानाच्या वाढत्या पोर्टफोलिओमुळे, एचएफसीएल राष्ट्रीय आणि जागतिक संरक्षण बाजारपेठेत लक्षणीय योगदान देण्यासाठी तयार आहे.
टीम भारतशक्ती