अमेरिका आणि नाटो सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानने सत्तेत परत येण्याला यंदा तीन वर्षे पूर्ण झाली. हा तिसरा वर्धापन दिन बुधवारी (14 ऑगस्ट) बगराम हवाईतळावर लष्करी संचलनाने साजरा करण्यात आला. 2021 मध्ये सहयोगी सैन्याच्या प्रचंड आणि अत्यंत अराजक परिस्थितीतील एअरलिफ्टची हीच ती जागा होती.
खरेतर 15 ऑगस्ट 2021 रोजी काबूलमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केली होती. मात्र यंदा वर्धापन दिनाच्या एक दिवस आधीच लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. कारण याच दिवशी अनेक वर्षांच्या पाश्चिमात्य पाठिंब्याने स्थापन करण्यात आलेल्या अफगाण सुरक्षा दलांचे विघटन झाले आणि अमेरिकेचा पाठिंबा असणारे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी परदेशात पळून गेले.
या संचलनात तालिबानच्या सशस्त्र दलांनी हमवी, हेलिकॉप्टर्स आणि रणगाड्यांसह अनेक प्रकारच्या लष्करी सामुग्रीचे प्रदर्शन केले. यातील बहुतेक सामुग्री एकेकाळी अफगाण सैन्याकडे होती आणि ती परदेशी (मुख्यतः अमेरिकन) सैन्याने पुरवली होती. मात्र अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर तालिबानने ती जप्त करून आपल्या ताब्यात घेतली.
अफगाणिस्तानातील एकेकाळी अमेरिका आणि नाटोचा सर्वात मोठा लष्करी तळ असलेल्या जागी झालेल्या या भव्य लष्करी संचलनात चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराणचे प्रतिनिधी तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सहभागी झाले होते.
प्रशासनाने बुधवारी प्रसारित केलेल्या संदेशात तालिबानचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते हैबतुल्ला अखुंदजादा यांनी म्हटले की, या गटाने अफगाणिस्तानला इस्लामिक शरिया-आधारित देशात रूपांतरित केले आहे.
“ही व्यवस्था इस्लामिक आणि शरिया-आधारित आहे, या राजवटीत शरियाची अंमलबजावणी केली जात आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आपण स्वतःवर आणि इतरांवर अल्लाहचा (देवाचा) विश्वास आणि शरिया कायम ठेवू आणि लागू करू,” असे ते म्हणाले.
महिलांचे शिक्षण, पोशाख आणि प्रवासावर लादण्यात आलेल्या अनेक निर्बंधांसाठी, शरिया कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी परदेशी मुत्सद्दी, वकील आणि अनेक अफगाणी लोकांनी अखुंदजादांना जबाबदार धरले आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने हे कायदे लागू केले गेले आहेत.
“असदची 24 तारीख (14 ऑगस्ट) हा अफगाणिस्तानच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे,” असे उपपंतप्रधान मोहम्मद अब्दुल कबीर यांनी घोषित केले, “हा दिवस अफगाण मुजाहिदीनच्या संघर्ष आणि बलिदानाने प्रकाशझोतात आला आहे. हा दिवस लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून भावी पिढ्या परस्परसंवाद आणि स्वातंत्र्याचे धडे शिकतील.”
“जगासाठी आमचा संदेश हाच आहे की त्यांनी असे समजू नये की त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिले आहे, परंतु आम्ही ते स्वातंत्र्य मिळवले आहे,” असे अंतर्गत प्रभारी मंत्री सिराजुद्दीन हक्कानी म्हणाले. त्यांच्या भाषणाच्यावेळी तालिबान सैनिक मोटारसायकल आणि लष्करी वाहनांवरून त्यांच्यासमोर संचलन करत जात होते.
जगातील कुख्यात दहशतवाद्यांच्या यादीत सिराजुद्दीन हक्कानी याचे नाव असून त्याच्या डोक्यावर 50 लाख डॉलरचे बक्षीस आहे.
“आम्ही प्रत्युत्तर देत नाही, आम्ही त्यांना कामाच्या चांगल्या संधी दिल्या आहेत आणि अफगाणिस्तान उभारणीच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करण्याचा त्यांचा हेतू चांगला आहे, ज्याप्रमाणे ते अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी वचनबद्ध होते, त्यांनीही अफगाणिस्तानच्या विकासासाठी वचनबद्ध असले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर, घालण्यात आलेले बँकिंग निर्बंध आणि इतर देशांकडून या सरकारला औपचारिक मान्यता न मिळाल्याने अफगाणिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे.
दोन दशकांच्या संघर्षानंतर सुरक्षा पुनर्स्थापित करण्याला प्राधान्य दिल्याचा तालिबानचा दावा आहे. तर दुसरीकडे, इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी गटांनी परदेशी पर्यटक आणि चिनी नागरिक वारंवार येत असलेल्या हॉटेल्सना लक्ष्य करत त्यांच्यावरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.
महिलांच्या हक्कांबाबत तालिबान आपली विचारसरणी बदलत नाही तोपर्यंत त्यांच्या सरकारला मान्यता देणे आणि निर्बंध मागे घेतले जाणार नाहीत, असे पाश्चात्य देशांनी म्हटले आहे.
तालिबानचा दावा आहे की ते अफगाण संस्कृती आणि इस्लामिक कायद्याच्या त्यांच्या व्याख्येनुसार महिलांच्या हक्कांचा आदर करतात.
12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींना औपचारिक शिक्षण घेण्यापासून वंचित करण्यात आले आहे. महिलांना सहसा पुरुष पालकाशिवाय लांबचा प्रवास करण्याची परवानगी नाही. याखेरीज जिम आणि उद्यानांमध्ये जाण्यासदेखील त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)