स्वतःला जागतिक नेता म्हणवून घेणारा कोणताही देश रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणासंदर्भात तटस्थ राहू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भारतातील युक्रेनचे राजदूत ओलेक्सांद्र पोलिशचुक यांनी केले आहे.
“तटस्थ राहणे ही चांगली गोष्ट आहे, पण आताच्या परिस्थितीत तो योग्य मार्ग नाही. आम्ही कोणावरही टीका करत नाही, परंतु जर तुम्ही स्वतःला जागतिक नेते म्हणत असाल, तर तुम्ही तटस्थ राहू शकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपले मत मांडले.
युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या आणि रशियाकडून त्वरित आक्रमकता थांबवण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील ठरावांमध्ये भारत मतदानापासून दूर राहिल्याचा संदर्भ त्यांच्या या वक्तव्यामागे होता.
युद्ध सुरू झाल्यापासून भारत संघर्षाशी संबंधित विविध मतदानांपासून दूर राहिला आहे. आंतरराष्ट्रीय दबावाला भारताने विरोध केला असला तरी युएनजीए आणि युएनएससीमध्ये मांडण्यात आलेल्या अशा ठरावांपासून दूर राहण्याचा पर्याय भारताने निवडला आहे.
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलशी बोलताना युक्रेनचे राजदूत म्हणाले, “भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य व्हायचे आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकणांपासून दूर राहणे हा मार्ग नाही.” युक्रेनचे उप-संरक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या पोलिशचुक यांनी सुचवले आहे की भारताने युक्रेनवरील आपल्या धोरणाचा आढावा घ्यावा.
विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की या युद्धातील तटस्थता असमर्थनीय आहे. मुख्य प्रवाहातील भारतीय दैनिकात अलीकडेच लिहिलेल्या एका लेखात पोलिशचुक यांनी तटस्थतेबाबत युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्याचा हवाला दिला.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “आक्रमण करणारा आणि पीडित यांच्या संदर्भात तटस्थता असू शकत नाही. या संघर्षातील तटस्थतेचा अर्थ असा आहे की तुम्ही रशियाच्या बाजूने आहात.”
राजदूतांच्या मते आंतरराष्ट्रीय कायद्याचे असे स्पष्ट उल्लंघन होत असताना तुम्ही बघ्याची भूमिका घेणे म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदाय म्हणून आपल्याला बांधणारी तत्त्वेच कमकुवत करणे होय याची ही आठवण आहे.
राजदूत पुढे म्हणाले की, भारताची शक्ती आणि प्रभाव खूप महत्त्वाचा आहे. युक्रेन भारतीय नेतृत्वावर अवलंबून आहे कारण “तुमचा रशियावर नक्कीच प्रभाव आहे.”
2010 मध्ये मेजर-जनरल पदावरून निवृत्त झालेल्या युक्रेनच्या राजदूतांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय समाजाचा दबाव, भारताची मदत आणि आमच्या सर्व भागीदारांच्या दबावामुळे आम्ही हे युद्ध थांबवू शकतो.
ते म्हणाले की, युक्रेन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त देश कदाचित जगातील सर्वात शांततापूर्ण देश आहे, मात्र त्याला युद्धाच्या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागले. ते म्हणाले की, युद्धाच्या हजार दिवसांत, रशियन आक्रमणामुळे 600 मुले मरण पावली असून 80 लाखांहून अधिक युक्रेनियन लोकांनी देश सोडला आहे.
युद्धात नागरिकांना मोजाव्या लागणाऱ्या परिणामांविषयी आपला मुद्दा स्पष्ट करताना राजदूत म्हणाले, “नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे 36 लाख लोक अंतर्गत विस्थापित झाले आहेत.”
युक्रेन रशिया युद्धाने हजार दिवसांचा टप्पा ओलांडल्यामुळे पोलिशचुक म्हणाले, “आम्हाला युक्रेनच्या पुनर्बांधणीत भारताचा अधिक सहभाग अपेक्षित आहे.”
युद्ध केव्हा संपेल असे विचारले असता, राजदूत पोलिशचुक म्हणाले, “हा प्रश्न युक्रेनसाठी नाही तर पुतीनसाठी आहे. आम्ही उद्याच युद्ध थांबवायला तयार आहोत.
ते पुढे म्हणाले, “युद्ध थांबवू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन. त्यांनी सुरुवात केली. ते लगेच हे युद्ध थांबवू शकतात.”
“जरी आमचा देश युद्धामुळे कठीण काळातून जात असला तरी आम्ही त्यामुळे आमच्या लोकांचे दैनंदिन जीवन थांबू नये यासाठीही आमचे प्रयत्न आहेत.” युक्रेन या वर्षाच्या अखेरीस मुंबईत आपला दूतावास उघडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा दूतावास केवळ व्हिसासाठीच नव्हे तर आर्थिक सहकार्यासाठीही असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. “या तीन वर्षांत आम्ही आफ्रिकेत दहाहून अधिक दूतावास सुरू केले आहेत. आमची जगभरात ओळख व्हावी अशीच इच्छा आहे.”
“तुम्ही कल्पना करू शकता का, युद्धाच्या आधी युक्रेनमध्ये 22 हजार भारतीय विद्यार्थी होते. खार्किव उत्साहाने सळसळत होते. भारतीय विद्यार्थ्यांनी होळी आणि दिवाळी साजरी केली होती. आता, आमच्याकडे फक्त 5 हजार भारतीय विद्यार्थी आहेत.” 2022 मध्ये, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या जवळजवळ एक चतुर्थांश होती.
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना युक्रेनच्या राजदूतांनी युद्धजन्य परिस्थितीचे वर्णन सर्वात धोकादायक असे केले. “आम्हाला विश्वास आहे की आम्ही या सगळ्यातून लवकरच बाहेर येऊ कारण प्रत्येकाला शांतता हवी आहे.”
युक्रेनला या सगळ्यातून आपण पूर्वीच्या दिवसांचे परत जाऊ या आशेने आणि तेथील लोकांच्या अतूट भावनेने परिभाषित केले आहे यावर त्यांनी भर दिला. “आमचे मित्र आणि सहकारी आमच्या पाठिशी उभे आहेत.”
ते म्हणाले की, महात्मा गांधींचे भारत छोडो आंदोलन हे केवळ स्वातंत्र्याचे आवाहन नव्हते, तर ते एक सार्वत्रिक विधान होते. ऑगस्ट 2023 मध्ये राजदूत म्हणून पदभार स्वीकारलेल्या पोलिशचुक यांनी महात्मा गांधींचा हवाला देत बऱ्यापैकी चांगल्या हिंदीतून आमच्याशी संवाद साधला. “किसी की शक्ती को दुसरे राष्ट्र पर अत्याचार करने का अधिकार नहीं है.” (कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर अत्याचार करण्याचा अधिकार नाही), असे ते मोठ्याने टाळ्या वाजवत म्हणाले. गांधींनी कर्मावर भर दिल्याची आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली.
“युक्रेनची कथा केवळ आमच्या देशापुरती मर्यादित नाही. मानवताच्या परत एकदा उभं राहण्याच्या जागतिक कथेचा तो एक भाग आहे,” असे ते म्हणाले. “आम्ही येथे केवळ आमच्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे नाही तर आम्हाला पाठिंबा देणारा जागतिक समुदाय-आमचे मित्र, भागीदार आणि शेजारी जे न्यायाच्या स्वातंत्र्यासाठीच्या आमच्या लढ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यामुळे उभे आहोत.” राजदूत म्हणाले,” मला आशा आहे की युक्रेनचे आणखी मित्र बनतील आणि आणखी मजबूत होऊन एक नवा युक्रेन उदयास येईल.”
युक्रेन दूतावास आणि नवी दिल्लीतील पोलिश संस्थेने युक्रेनच्या अतूट धैर्याचे हजार दिवस साजरे करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दूतावासाने नवी दिल्लीतील फॉरेन कॉरेस्पॉन्डंट्स क्लब ऑफ साउथ एशिया येथे ‘टाइमलाइन ऑफ वॉर’ हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनात पहिल्या दिवसापासून 796व्या दिवसापर्यंतच्या युद्धाची टिपण्यात आलेली दृश्ये मांडण्यात आली आहेत.
युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यात प्रमुख छायाचित्रकारांचे 29 अद्वितीय फोटो येथे मांडण्यात आले आहेत.
पोलंडचे दिग्दर्शक मॅसीक हॅमेला यांचा ‘इन द रिअरव्यू “हा शक्तिशाली माहितीपटही या क्लबमध्ये दाखवण्यात आला. या माहितीपटात रशियन आक्रमणाच्या दरम्यानच्या युक्रेनच्या एकजुटीची ताकद दाखवण्यात आली आहे.
21 नोव्हेंबर हा दिवस युक्रेनसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हा दिवस त्यांच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचा दिवस आहे, जो युक्रेनच्या लोकांच्या दृष्टीने लोकशाही, स्वातंत्र्य आणि न्याय प्रतिबिंबित करण्याचा क्षण आहे.
तृप्ती नाथ
स्ट्रॅटन्यूज ग्लोबल