राजधानी दिल्लीहून वेलिंग्टन येथे आगमन झाल्यावर, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे विमानतळावरूनच भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना भेटण्यासाठी गेले. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याबद्दल कलाम यांना प्रचंड आदर होता. 3 एप्रिल हा दिवस म्हणजे फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने फिल्ड मार्शल माणेकशॉ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीचा तो किस्सा भारतशक्तीच्या वाचकांसाठी –
सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर असलेले तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम कुन्नूर भेटीवर आले होते. तिथे पोहोचल्यावर त्यांना कळले की, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिल्ड मार्शलना भेटणे हे खरंतर राष्ट्रपतींच्या त्या दिवशीच्या कार्यक्रमात समाविष्ट नव्हते. मात्र या भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, राजधानी दिल्लीतून वेलिंग्टन येथे आगमन झाल्यावर, कलाम थेट विमानतळावरून फिल्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशॉ यांना भेटायला गेले. हा अत्यंत दुर्मीळ पण हृदयस्पर्शी असा क्षण होता.
त्यावेळी माणेकशॉ लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर निलगिरीत वास्तव्यास होते. अब्दुल कलाम आणि माणेकशॉ या दोघांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. जो काही काळ त्यांच्यात संवाद साधला गेला, त्यात त्या दोघांनी या आधीच्या भेटींना उजाळा दिला. तत्कालीन राष्ट्रपतींनी फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. या भेटीच्या वेळी फिल्ड मार्शल अत्यंत आनंदी होते आणि त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींचे अतिशय प्रेमाने स्वागत केले.
तिथून परत निघायच्या आधी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी माणेकशॉ यांना विचारले, “तुम्ही इथे आरामात आहात का? मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? तुमची काही तक्रार आहे का? तुम्हाला अधिक आरामदायक अशा काही गोष्टीची गरज आहे का?” यावर उत्तर देताना माणेकशॉ म्हणाले, “होय, मिस्टर एक्सलन्सी, माझी एक तक्रार आहे”. त्यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना विचारले की, काय तक्रार आहे?
माणेकशॉ यांनी उत्तर दिले, “सर, माझी तक्रार आहे की, मी उठू शकत नाही आणि माझ्या प्रिय देशाच्या माझ्या सर्वात आदरणीय राष्ट्रपतींना सलाम करू शकत नाही”.
पण या भेटीसंदर्भातील कथेचा उरलेला भाग असा आहे की, माणेकशॉ यांनी राष्ट्रपतींना सांगितले की, त्यांना जवळपास वीस वर्षांपासून फिल्ड मार्शलपदासाठी असणारी पेन्शन दिली गेलेली नाही. या बातमीने धक्का बसलेल्या राष्ट्रपतींनी दिल्लीला जाऊन पेन्शनच्या थकबाकीला एका आठवड्याच्या आत मंजुरी दिली. सुमारे 1.25 कोटी रुपयांचा धनादेश संरक्षण सचिवांमार्फत एका विशेष विमानाने वेलिंग्टन, उटी येथे पाठवला, जिथे माणेकशॉ उपचार घेत होते. धनादेश मिळाल्यानंतर माणेकशॉ यांनी तातडीने तो आर्मी रिलीफ फंडाला दान दिला. या दोघांची ही कृतीच त्यांच्या मनाचा मोठेपणा अधोरखित करते.
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या भेटीदरम्यान तत्कालीन राष्ट्रपतींना अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके रुग्णालय पाहून आनंद झाला आणि त्यांनी अभ्यागतांच्या पुस्तकात लिहिले : “मिलिटरी हॉस्पिटल, वेलिंग्टन नेहमीच सर्वोत्तम योगदान देत आहे. कृपया आमच्या महान संपत्तीची, म्हणजेच आमचे एकमेव फिल्ड मार्शल माणेकशॉ यांची नीट काळजी घ्यावी.”
Courtesy : News Bharati
अनुवाद : आराधना जोशी