अत्याधुनिक हेलिकॉप्टर सेवा प्रदान करण्यासाठी एअरबस हेलिकॉप्टर आणि इंदामर कंपनी यांच्यात एक धोरणात्मक करार झाला असून भारतातील रोटरी-विंग मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हहॉल (MRO) इकोसिस्टमला बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल यानिमित्ताने उचलले गेले आहे. भारतात हेलिकॉप्टरच्या ताफ्यात लक्षणीय वाढ होत असून त्यांची देखभाल आणखी दर्जेदार करणे या सहकार्य कराराचे उद्दिष्ट आहे.
एअरबस हेलिकॉप्टरकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, इंदामर ही कंपनी एअरबस हेलिकॉप्टरसाठी MRO सेवा प्रदान करेल. इंदामरच्या मुंबई, नवी दिल्ली आणि नागपूर येथे असलेल्या अत्याधुनिक सेवा सेंटर्समध्ये या एमआरओ सेवा पुरविल्या जातील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरबस हेलिकॉप्टर कंपनीच्या कस्टमर सपोर्ट ॲन्ड सर्व्हिसेस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंदामर एव्हिएशन प्रा. लि.चे संचालक प्रजय पटेल, एअरबस इंडिया तसेच दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रेमी मेलर्ड तसेच एअरबस इंडिया आणि दक्षिण आशियाचे हेलिकॉप्टर विभाग प्रमुख सनी गुगलानी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नागपूर केंद्र सुविधेचे उद्घाटन झाले.
एअरबस हेलिकॉप्टर कंपनीच्या कस्टमर सपोर्ट अँड सर्व्हिसेस विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप यांनी भारतामध्ये एक शाश्वत रोटरी-विंग एव्हिएशन इकोसिस्टम तयार करण्याचे महत्त्व विशद केले. भारताच्या वाढत्या ताफ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच भारताच्या हेलिकॉप्टर एमआरओ सेवांचे उद्दिष्ट्य गाठण्याच्या दृष्टीने इंदामरसोबत धोरणात्मक सहकार्य करत असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
एका दशकापूर्वी, इंदामरने भारतीय हेलिकॉप्टर ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्या रोटरी-विंग एमआरओ विभागाची स्थापना करण्यावर धोरणात्मकपणे लक्ष केंद्रित केले होते, असे इंदामर एव्हिएशनचे संचालक प्रजय पटेल यांनी सांगितले. एअरबससोबतचे सहकार्य करार हे इंदामरच्या या फोकस पद्धतीने काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे सांगत पटेल यांनी या कराराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
इंदामर – एअरबस हेलिकॉप्टर यांच्यातील MRO पार्टनरशिपचे उद्दिष्ट सर्व्हिसिंग अधिक जलद गतीने पुरविणे तसेच, एअरबस हेलिकॉप्टरकडून ग्राहकांसाठी केवळ भारतातच नाही तर, दक्षिण आशियात एक उत्कृष्ट आफ्टर-मार्केट अनुभव निर्माण करणे, हे आहे.
हे सहकार्य भारतातील एअरबसच्या व्यापक औद्योगिक विस्ताराचा एक भाग आहे, जे देशात एक विकसित आणि व्यापक एरोस्पेस इकोसिस्टम उभारण्यासाठी योगदान देईल. देशांतर्गत सिव्हिल आणि पॅरा-पब्लिक हेलिकॉप्टर मार्केटमध्ये एअरबस आघाडीवर आहे, 2010पासून नवीन नोंदणीकृत वितरणांपैकी निम्म्याहून अधिक हेलिकॉप्टर्सचे वितरण कंपनीने केले आहे. सध्या भारत आणि दक्षिण आशियात विशेषत: ऊर्जा, वाणिज्य आणि व्यावसायिक विमान वाहतूक विभागांसाठी H125, H130, H135, H145, आणि Dauphin यासारख्या आघाडीच्या 125हून अधिक एअरबस हेलिकॉप्टर्सचा वापर ऑपरेटर्सकडून केला जात आहे.
इंदामर – एअरबस हेलिकॉप्टर MRO सहकार्य करार हेलिकॉप्टर देखभाल आणि सहाय्य सेवांमध्ये भारताच्या क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार हे नक्की.
टीम भारतशक्ती
(अनुवाद : आराधना जोशी)