Apple कंपनीने चीनमधील त्यांच्या नवीन iPhone मॉडेल्सवर, 500 युआन ($68.50 डॉलर्स) पर्यंतच्या दुर्मिळ सवलती दिल्या आहेत. यामागील प्रमुख कारण म्हणजे, तंत्रज्ञान विश्वातील बादशाह अशी ओळख असलेल्या Apple ला, चीनमधील Huawei सारख्या स्थानिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या स्पर्धेत आपले स्थान सुरक्षित ठेवायचे आहे.
4-7 जानेवारी दरम्यान चालणारी ही चार दिवसांची विशेष ऑफर, Apple ने त्यांच्या वेबसाइटवर जारी केली असून, ग्राहकांना विशिष्ट पेमेंट पद्धती वापरून खरेदी केलेल्या iPhone मॉडेल्सवर ही सवलत मिळणार आहे.
ऍपलसाठी घसरता बाजार
आयफोन १६ प्रो, ज्याची सुरुवातीची किंमत चीनमध्ये ७,९९९ युआन आहे आणि आयफोन १६ प्रो मॅक्स, ज्याची सुरुवातीची किंमत ९,९९९ युआन इतकी आहे, त्यावर कंपनीने ५०० युआनची सर्वात मोठी सवलत देऊ केली आहे. तर आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लसवर ४०० युआनची सवलत देण्यात येणार आहे.
या सवलतींमुळे, चीनची मंदावणारी अर्थव्यवस्था आणि महागाईच्या दबावामुळे, खर्च करण्याच्या बाबतीत सतर्क असलेल्या असलेल्या स्थानिक ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये चीनमधील ग्राहक चलनवाढ पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहचली होती.
सध्या ऍपल कंपनी चीनमधील त्यांच्या घटत्या बाजारपेठेशी झुंजते आहे. चीन ही जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, जिथे स्थानिक उत्पादकांनी ऍपलसोबतची आपली स्पर्धा तीव्र केली आहे.
Huawei ला सर्वोच्च स्थान
चीनच्या स्मार्टफोन बाजारपेठेत Huawei कंपनीने बाजी मारली असून, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये, प्रिमियम सेगमेंट अंतर्गत Huawei ने स्थानिक पातळीवर बनवलेल्या प्रभावशाली चिपसेटसह दमदार कमबॅक केले आणि तेव्हापासूनच स्मार्टफोन मार्केटमध्ये एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून स्थान पटकावले. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, Huawei ने चीनच्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर, मागील वीकेंडला मोबाईल फोनसह विविध हाय-एंड उपकरणांच्या किंमती थेट 3,000 युआनपर्यंत कमी केल्या होत्या.
Apple 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत, चीनच्या पहिल्या पाच स्मार्टफोन विक्रेत्यांच्या स्पर्धेतून, थोड्याश्या फरकाने बाहेर पडली मात्र तिसऱ्या तिमाहीत त्यांनी पुन्हा पहिल्या पाचात स्थान मिळवले. US कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत तिसऱ्या तिमाहीत मागील वर्षाच्या तुलनेत 0.3% घसरण झाली, तर हुआवेईच्या विक्रीत 42% वाढ झाली, असे संशोधन कंपनी IDC ने दिलेल्या माहितीद्वारे समोर आले आहे.
त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसमोर आपले स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी, ऍपलने या खास सवलती ऑफर केल्या आहेत. ज्यामध्ये iPhone 16 च्या विविध व्हेरिएंट्ससह, काही जुन्या iPhone मॉडेल्सवर 200 ते 300 युआनची सवलत देण्यात आली आहे. तसेच अन्य श्रेणीतील उत्पादने जसे की- MacBook लॅपटॉप आणि iPad टॅब्लेट सारख्या उत्पादनांवरही काही सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी, WeChat Pay किंवा Alipay सारख्या काही विशीष्ट पेमेंट पद्धतींचा वापर करणे अनिवार्य आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)