देशाला तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण परिवर्तनाची आवश्यकता: लष्करप्रमुख

0

“भविष्यातील युद्धभूमी ही जलद तंत्रज्ञानाच्या परिवर्तावरच परिभाषित केली जाईल,” असे म्हणत, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बहु-डोमेन ऑपरेशन्समध्ये स्वदेशी क्षमता निर्माण करण्यासाठी, सशस्त्र दल, शैक्षणिक संस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सखोल सहकार्य करण्याचे आवाहन केले. मंगळवारी, नवी दिल्ली येथे झालेल्या ‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ (India Defence Conclave 2025) मध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले की, “संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी आणि सातत्याने विकसीत होत असलेल्या युद्ध बदलांसाठी देशाने सज्ज असण्याची गरज आहे, आणि त्यासाठी परिसंस्थेचे बळकटीकरण अत्यंत आवश्यक आहे.”

लष्करप्रमुखांनी यावेळी नमूद केले की, “भारताच्या लष्करी परिवर्तनामध्ये वेग, नवोपक्रम आणि संयुक्त प्रयत्नांच्या माध्यमातून, कल्पनांना ठोस क्षमतांमध्ये रूपांतरित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” पुढे ते म्हणाले की, “अवलंबनापासून स्वावलंबनाकडे जाण्यासाठी नवनवीन भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. तसेच जमीन, हवाई क्षेत्र, समुद्र, अवकाश आणि सायबर या सर्व क्षेत्रांमध्ये, कार्यक्षमता आणि एकात्मतेसह तंत्रज्ञानाचा प्रसार होणे आवश्यक आहे.”

“संरक्षण क्षेत्र आता एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे, ज्यामध्ये प्रयोगशीलता, स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि उद्योग तसेच स्टार्टअप्ससोबतचे वाढते सहकार्य यावर भर दिला जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी लष्करात उभारलेल्या विशेष तंत्रज्ञान मोहिमा आणि नवोन्मेष केंद्रांचे उदाहरण देत सांगितले की, “या उपक्रमांमुळे मूळ संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष युद्धसज्ज क्षमतेपर्यंतचा प्रवास अधिक वेगाने होत आहे.”

दृष्टीकोनापासून अंमलबजावणीपर्यंत: उद्योग नेत्यांची प्रतिक्रिया

लष्करप्रमुखांनी केलेल्या परिवर्तनाच्या आवाहनानंतर, चक्रा न्यूजचे मुख्य-संपादक संदीप उन्‍नीथन यांच्या नेतृत्वामध्ये एक उत्साहवर्धक पॅनल चर्चा पार पडली. या चर्चेत, झेन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक अटलुरी, SMPP कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कंसल, आणि शिल्ड एआयचे व्यवस्थापकीय संचालक सर्जन शाह सहभागी झाले होते.

उन्‍नीथन यांनी असे निरीक्षण नोंदवले की, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास या संघर्षांनी हे सिद्ध केले आहे की, ड्रोन (UAVs), अचूक-मार्गदर्शित शस्त्रास्त्रे (precision-guided munitions), आणि AI-तंत्रज्ञानावर आधारिक प्रणाली, हे ‘आधुनिक युद्धाला’ नव्याने पुन्हा परिभाषित करत आहेत.

ते म्हणाले की, “आपण 21व्या शतकातील सर्वात मोठ्या आणि सातत्यपूर्ण संघर्षांचे साक्षीदार आहोत, जिथे मानवरहित प्रणाली, स्वयंचलित कारवाया आणि बहुआयामी समन्वय हे निर्णायक घटक ठरत आहेत.”

“भारताने आता संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.”

भारताची ड्रोन आणि अँटी-ड्रोन परिसंस्था उभारणे

झेन टेक्नॉलॉजीजचे अशोक अटलुरी यांनी, भारताच्या देशांतर्गत ड्रोन उत्पादन आणि अँटी-ड्रोन क्षमतांना गती देण्याची तातडीची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, “खऱ्या अर्थाने ड्रोन शक्ती बनण्यासाठी, आपल्याला सिद्ध कौशल्य असलेल्या प्रमुख कंपन्यांची निवड करावी लागेल आणि नियमीत ऑर्डर आणि भागीदारीद्वारे त्यांना सातत्यपूर्ण पाठबळ द्यावे लागेल.” त्यांनी पुढे नमूद केले की, “संरक्षण उत्पादन हे अधूनमधून होणाऱ्या खरेदीवर अवलंबून राहू शकत नाही, त्यासाठी सातत्य, विश्वास आणि उत्पादनाचे निश्चित प्रमाण आवश्यक आहे.”

अटलुरी यांनी एकसंध उत्पादन चौकट विकसित करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले, जिथे अनेक उद्योग प्रमाणित डिझाइनवर सहयोग करू शकतात, जसे की जागतिक शक्तींनी मोठ्या प्रमाणात तैनातीसाठी त्यांच्या ड्रोन इकोसिस्टमचे स्केलिंग केले. 

दरम्यान, एसएमपीपीचे आशीष कंसल, ज्यांच्या कंपनीला नुकतीच वैयक्तिक संरक्षण उपकरणांसाठी मोठी देशांतर्गत ऑर्डर मिळाली आहे, त्यांनी नमूद केले की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य गेल्या काही वर्षांत उल्लेखनीयरीत्या सुधारले आहे. कंसल म्हणाले की, “गेल्या पाच वर्षांतील बदलाचा वेग अभूतपूर्व आहे. खाजगी उद्योग आता डीपीएसयूंसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, ज्यामुळे नियोजीत वेळापत्रकांना गती मिळत आहे आणि क्षमता विकास अधिक प्रभावीपणे होत आहे.”

“सह-उत्पादन आणि तंत्रज्ञान सामायिकरण, हे जलद वितरण आणि अधिक स्वावलंबन सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत,” असेही ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्तता आणि युद्धातील पुढचे पाऊल

भविष्यवादी दृष्टीकोन मांडताना, शिल्ड एआयचे सर्जन शाह म्हणाले की, “भारत सॉफ्टवेअरवर आधारित असलेल्या युद्धक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.”

त्यांनी सांगितले की, “आपण आतापर्यंत AI तंत्रज्ञानाच्या समाकलनाचा केवळ पृष्ठभाग पाहिला आहे. खरी झेप तेव्हाच घेता येईल, जेव्हा देशाच्या स्वायत्त प्रणाली स्वतंत्रपणे विविध क्षेत्रांमध्ये स्वतः निरीक्षण, निर्णय आणि कृती करू शकतील.”

शाह यांनी नमूद केले की, “भारताकडे असे कौशल्य आणि संधी उपलब्ध आहेत की, आपण संरक्षण तंत्रज्ञानात अनेक पिढ्या ओलांडून पुढे जाऊ शकतो, ज्याप्रमाणे आपण डिजिटल आणि मोबाइल क्रांतीत यश संपादन केले आहे.”

“भविष्यातील लष्करी कारवाया नेटवर्कशी जोडलेल्या, बुद्धिमान प्रणालींवर अवलंबून असतील, आणि त्या सर्व सेवांमध्ये डेटा आणि निर्णय प्रक्रियेचे एकत्रीकरण करतील,” असेही त्यांनी नमूद केले.

शाह यांनी हेही अधोरेखित केले की, “भारताचे खरे हित स्वदेशी सॉफ्टवेअरमधील नवोन्मेष आणि परवडणारे हार्डवेअर उत्पादन यांना एकत्रित आणण्यात आहे.”

ब्राह्मोससपासून पुढच्या पिढीच्या आयुधांपर्यंत

पॅनलमधील तज्ज्ञांनी, भारताच्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा उल्लेख, ‘सरकार आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी सहकार्याचा आदर्श नमुना’ असा केला. “अशीच भागीदारी ड्रोन आणि अँटी-ड्रोन प्रणाली यांसारख्या नवउदयोन्मुख संरक्षण क्षेत्रांमध्येही लागू करता येईल,” असे त्यांनी यावेळी सुचवले.

जागतिक प्रगतींचा, विशेषतः ‘टोमहॉक’ क्षेपणास्त्र प्रणालीचा संदर्भ देत तज्ज्ञांनी नमूद केले की, भारताच्या पुढील प्रगतीचा टप्पा मोठ्या प्रमाणावर उत्पादनक्षम, परस्पर-सुसंगत आणि निर्यातीसाठी सज्ज असलेली संरक्षण उत्पादने तयार करण्यावर अवलंबून असेल.

भविष्यासाठी एक सामायिक दृष्टीकोन

पॅनलमधील सर्व तज्ज्ञांनी या गोष्टीवर एकमत नोंदवले, की भारताचे संरक्षण परिवर्तन हे स्पष्ट उद्दिष्टे, सातत्यपूर्ण निधीपुरवठा, आणि जबाबदारीची संस्कृती यांवर आधारित असले पाहिजे. एक अशी संस्कृती जी एखाद्या प्रकल्पाला संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष तैनातीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यास सहाय्य करेल.

जनरल द्विवेदी म्हणाले की, “भविष्यातील युद्धांचे स्वरूप कोणत्याही एका शस्त्राद्वारे किंवा प्लॅटफॉर्मद्वारे निश्चित केले जाणार नाही, तर आपण कल्पनांना किती वेगाने आणि प्रभावीपणे टिकाऊ क्षमतांमध्ये रूपांतरित करतो आणि भारत त्या बदलाचे नेतृत्व किती आत्मविश्वासाने करतो, यावर त्याची परिभाषा निश्चित केली जाईल.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleसंरक्षण नवउपक्रमांत समन्वय, पुनरुज्जीवन, खाजगी गुंतवणुकीसाठी उद्योग क्षेत्राचे आवाहन
Next articleजागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताचा संरक्षण उद्योग निर्णायक टप्प्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here