लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल मनोज पांडे यांच्या सेवेस एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) घेतल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. देशात सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. येत्या 31 मे रोजी लष्करप्रमुख सेवानिवृत्त होणार होते.
नियम 1954 च्या नियम 16 ए (4) अंतर्गत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ संरक्षण मंत्रालयासाठी एक ऐतिहासिक पाऊल मानण्यात येत आहे. या निर्णयामुळे जनरल पांडे आता 30 जूनपर्यंत कार्यरत असतील.
संरक्षण मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २६ मे २०२४ रोजी लष्करी नियम १९५४ च्या नियम १६ अ (४) अंतर्गत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (PVSM, AVSM, VSM, ADC) यांच्या सेवेत त्यांच्या सामान्य सेवानिवृत्तीच्या वयापासून (३१ मे २०२४) म्हणजे ३० जून २०२४ पर्यंत एक महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे.
जनरल पांडे यांनी 31 एप्रिल 2022 रोजी 29वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. डिसेंबर 1982 मध्ये ते कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये (द बॉम्बे सॅपर्स) रुजू झाले. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. जनरल पांडे यांच्या नियुक्तीमुळे एक इंजिनिअर लष्करप्रमुख बनण्याची ही पहिलीच वेळ होती. याआधी पायदळ, तोफखाना आणि चिलखती रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी पारंपरिकपणे हे पद भूषवले आहे.
पुढील लष्करप्रमुख (सीओएएस) कोण असतील याची सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. सामान्यतः, सशस्त्र दलांमधील नेतृत्व बदल सुरळीत होण्यासाठी नवीन लष्करप्रमुखांची निवड अनेक आठवडे आधी केली जाते. त्यासाठी सहसा सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सशस्त्र दलातील उत्तराधिकारी म्हणून दिले जाते. मात्र सध्या कोणाचेही नाव अधिकृत उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. मात्र तीन तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, जे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत; लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग हे दक्षिणी लष्करी कमांडरकमांडर आहेत आणि लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमण्यम, जे मध्यवर्ती कमांडचे नेतृत्व करतात.
रवी शंकर