एका महिला अधिकाऱ्यासह ४२ जणांना ‘विंग्स’ आणि प्रशिक्षक ‘बॅज’ प्रदान
दि. २३ मे: लष्करी हवाईदलाच्या (आर्मी एव्हिएशन) वैमानिकांच्या आणि ड्रोन पायलटच्या (रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम्स- आरपीएएस) तुकडीचे संयुक्त दीक्षांत संचलन नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (सीएएटीएस) येथे बुधवारी पार पडले. या दीक्षांत संचलन सोहोळ्यात ड्रोन पायलटसह ४२ अधिकाऱ्यांना ‘विंग्ज’ आणि प्रशिक्षक ‘बॅज’ प्रदान करण्यात आले. ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’चे (सीएएटीएस) महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. सुरी यांनी या संचलनाची मानवंदना स्वीकारली.
The Passing out Parade of Combat Army Aviators was held at Combat Army Aviation Training School at Nashik, today.
Lt Gen AK Suri, Director General and Colonel Commandant #ArmyAviation awarded ‘Aviation Wings’ to 23 Officers of Army Aviation, including one Woman Officer, on… pic.twitter.com/FDVkWBMQpp— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 22, 2024
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (सीएएटीएस) येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलनात लष्कराच्या प्रथा आणि परंपरांचे दर्शन घडले. ‘दीक्षांत संचलन हे केवळ तुम्हाला ‘विंग्स’ आणि ‘बॅज’ प्रदान करण्याचा सोहळा नाही, तर अतिशय मेहनतीने तुम्ही साध्य केलेल्या एका मोठ्या लक्ष्याची ही पावती आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सुरी यांनी या वेळी सांगितले. त्यांनी यशस्वी अधिकाऱ्यांची प्रशंसाही केली. ‘तुम्हाला देण्यात आलेले ‘विंग्ज’ आणि प्रशिक्षक ‘बॅज’ तुमच्या समर्पणभावाचे, कष्टाचे आणि कठोर प्रशिक्षणाचे फलित आहे. भारतीय लष्कराच्या उच्च परंपरेचे पालन करण्याची आणि त्याचे धैर्याने व प्रामाणिकपणे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. आपल्या भाषणात लेफ्टनंट जनरल सुरी यांनी आधुनिक युद्धातील तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दलही चर्चा केली. ‘जग आधुनिक होतेय, तसे तंत्रज्ञानाचा युद्धातील भागही वाढला आहे. उद्याची आव्हाने पेलण्यासाठी तुम्हाला तंत्रस्नेही आणि नाविन्याचा स्वीकार करावा लागेल,’ असे त्यांनी सांगितले.
कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधील (सीएएटीएस) प्रशिक्षण त्याची काठीण्य पातळी आणि सर्वंकष अभ्यासक्रम या साठी ओळखले जाते. लष्करी हवाईदल आणि ‘रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टिम्स’च्या मोहिमांत काम करण्यासाठी बहुकेंद्री अधिकारी निर्माण करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होतो. या अभ्यासक्रमात विविध कौशल्ये प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना शिकविण्यात येतात. बेसिक फ्लाईट ट्रेनिंगपासून हवाई लढ्याच्या अत्याधुनिक तंत्राचे प्रशिक्षण वैमानिकांना दिले जाते. त्या माध्यमातून आधुनिक युद्धातील गुंतागुंतीच्या आणि सातत्याने बदलणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यास त्यांना तयार केले जाते. या अभ्यासक्रमात प्रत्यक्ष काम आणि तासिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येते. लष्कराची सामरिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक बाबी या प्रशिक्षणाच्या केंद्रस्थानी असतात. त्यामुळे आधुनिक युद्धाला सज्ज होण्यासाठी आर्मी एव्हिएशनची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
विनय चाटी
(वृत्तसंस्था)