भारतीय हवाई दल आणि नौदलाने 10 तपस ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सहा ड्रोन्स हवाई दलासाठी तर चार ड्रोन्स नौदलासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. या निर्णयामुळे स्वदेशी संरक्षण उपकरणांवरील सशस्त्र दलांचा वाढता विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले तपस ड्रोन संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेप्रती भारताची असणारी बांधिलकी दर्शवतात. मात्र, हे ड्रोन 30 हजार फूट उंचीचा पल्ला गाठणे आणि 24 तास चिकाटीने सेवा पुरवणे या संयुक्त सेवांच्या गुणात्मक आवश्यकता (जेएसक्यूआर) पूर्ण करत नाहीत. त्यामुळे सध्या यसशस्त्र दलांनी त्यांच्या सध्याच्या 28 हजार फूट उंचीच्या आणि 18 तास चिकाटीने सेवा पुरवण्यासाठी या ड्रोनचा पर्याय स्वीकारलेला आहे. हा निर्णय ड्रोनची कामगिरी वाढवणे तसेच मागणी असलेल्या जेएसक्यूआर मानकांची पूर्तता करण्यासाठी डीआरडीओच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर विश्वास असल्याचे दर्शवते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही खरेदी आत्मनिर्भर भारताच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. परदेशी लष्करी उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे या उद्देशाने उचललेले हे एक धोरणात्मक पाऊल आहे.
सॅटकॉम ड्रोन्सची गरज
सॅटकॉम सक्षम ड्रोन त्यांच्या लाइन-ऑफ-साईटमधील (एलओएस) इतर ड्रोन्सपेक्षा बरेच फायदेशीर ठरतात. त्यामुळे ते आधुनिक लष्करी कारवायांसाठी एक अत्यावश्यक साधन बनले आहे. सॅटकॉम ड्रोनचा प्राथमिक फायदा म्हणजे एलओएस संभाषणाच्या मर्यादांशिवाय प्रतिकूल आणि दुर्गम वातावरणातही विशाल भाग व्यापून काम करण्याची त्यांची क्षमता. या अद्वितीय क्षमतेमुळे दूर असणाऱ्या कमांड केंद्रांमधून ड्रोनचे नियंत्रण आणि देखरेख करणे सोपे होते. त्यामुळे सततच्या कामगिरीसाठी आवश्यक कव्हरेज सुनिश्चित करता येते. सॅटकॉमचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्राथमिक स्थानकाशी संपर्क तुटला किंवा संपर्क नष्ट झाला तरी दुसऱ्या ग्राउंड स्टेशनवरून नियंत्रण बदलण्याची क्षमता यात आहे. त्यामुळे ड्रोनची कामगिरीवर टिकून राहण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढते आणि हाती घेतलेल्या कामगिऱ्या कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहू शकतात. याव्यतिरिक्त, सॅटकॉम ड्रोन अतिशय उत्तमरित्या एकापेक्षा जास्त आदेश आणि नियंत्रण केंद्रांमध्ये रियल टाइम माहिती प्रसारित करू शकतात. यामुळे परिस्थितीजन्य आकलन वाढते आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते.
भारतीय सशस्त्र दलांमध्ये डझनभर इस्रायली हेरॉन एमके1 आणि सर्चर एमके1 ड्रोन वापरले जात आहेत. हे ड्रोन एलओएस संवादावर अवलंबून असतात. त्यांची क्षमता वाढवून आणि सॅटकॉमसह सुसज्ज अशा चार हेरॉन एमके2 ड्रोनचा अलीकडेच समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, लष्कर आणि नौदलाने देशांतर्गत उत्पादन झालेल्या चार धृष्टी 10 स्टारलाइनर यूएव्हीची मागणी केली आहे. प्रत्येक सेवेसाठी दोन अशी याची विभागणी करण्यात आली असून त्याचे वितरण आधीच झाले आहे. तपस ड्रोनच्या खरेदीमुळे भारतीय सशस्त्र दलांच्या ड्रोन ताफ्याची कामगिरीवर अधिक काळ टिकून राहण्याची क्षमता आणि परिचालन लवचिकता आणखी वाढेल आणि आव्हानात्मक वातावरणात विविध कामगिऱ्या पार पाडण्याच्या त्यांची क्षमतेत वाढ होईल.
गुप्तवार्ता, पाळत ठेवणे आणि शोध (ISR) मोहिमा आणि धोरणात्मक उपयोजन
भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवरील गुप्तवार्ता, पाळत आणि शोध (आयएसआर) मोहिमांमध्ये तपस ड्रोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. सध्या सुरू असलेला तणाव आणि सुरक्षा आव्हानांचा विचार करता हे प्रदेश केवळ प्रदेश म्हणून महत्त्वाचे नसून धोरणात्मकदृष्ट्या देखील महत्त्वाचे आहेत. तपस ड्रोनची उंचीवर दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता या संवेदनशील भागांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे सशस्त्र दलांना अत्यंत मोलाची रियल टाइम गुप्त माहिती मिळेल. त्यामुळे सैन्य तैनात करण्याची निकड आणि आवश्यकता याला बळकटी मिळेल.
सीमेवर पाळत ठेवण्याव्यतिरिक्त नौदल अंदमान आणि निकोबार बेटांवर तांत्रिकदृष्ट्या प्रगत तपस ड्रोन तैनात करण्याची योजना आखत आहे. भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करणे तसेच महत्त्वाच्या सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी हा प्रदेश महत्त्वपूर्ण आहे. तिथे प्रगत क्षमतेचे तपस ड्रोन तैनात केल्याने नौदलाची विशाल सागरी विस्तारावर लक्ष ठेवण्याची आणि गस्त घालण्याची, संभाव्य धोके शोधण्याची आणि कोणत्याही घटनेला त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. विशेष म्हणजे, तपस ड्रोन लहान धावपट्ट्यांवरून उड्डाण करू शकतात, त्यामुळे ते खास करून बेटांच्या प्रदेशात तैनात करण्यासाठी योग्य ठरतात. तपस ड्रोनच्या प्रगत क्षमतांचा लाभ घेऊन, भारतीय नौदल आपल्या सागरी क्षेत्रातील जागरूकता लक्षणीयरीत्या सुधारून या प्रदेशातील आपली धोरणात्मक स्थिती मजबूत करू शकते.
मेल यूएव्हीची भविष्यातील आवश्यकता
भारतीय सशस्त्र दलांना त्यांची आयएसआर क्षमता वाढवण्यासाठी मध्यम उंचीवरील दीर्घ-सहनशक्ती (एमएएलई- मेल) असलेल्या अधिक यूएव्हीची आवश्यकता आहे. हेरॉन एमके2 सोबत हर्मीस 900 ड्रोनचा समावेश हा यूएव्हीच्या यादीत विविधता आणि सुधारणा करण्यासाठी सुरू असणारे धोरणात्मक प्रयत्न दाखवून देतो. यासंदर्भातील अहवाल असे सूचित करतात की सशस्त्र दलांनी 91 ड्रोन समाविष्ट करण्याची योजना आखली आहे, जे एकतर हेरॉन एमके2 किंवा दृष्टी 10 स्टारलाइनर असू शकतात. यामुळे आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी जुळवून घेण्यासाठी आंशिक किंवा संपूर्ण देशांतर्गत उत्पादनावर भर दिला जाईल.
भारतीय लष्कराचा तपस खरेदीचा हा विशिष्ट निर्णय अद्याप जाहीर झालेला नसला तरी, भारतीय हवाई दल आणि नौदलाने तपस ड्रोनची मागणी करून स्वदेशी उपाययोजनांना त्यांचे असणारे प्राधान्य स्पष्टपणे दाखवून दिले आहे. एका महत्त्वपूर्ण धोरणात्मक मूल्यांकनाच्या टप्प्याची सुरुवात यातून झाल्याचे बघायला मिळते. या टप्प्यात ड्रोनच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवून त्याचे मूल्यांकन केले जाईल. या काळात गोळा केलेला अभिप्राय आणि माहिती भविष्यातील खरेदी निर्णयांना आकार देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विनय साधम