मंगळवारी बाल्टीमोर येथील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला धडकून तो कोसळण्याला कारणीभूत ठरलेल्या दाली या मालवाहू जहाजावरील सर्व 22 कर्मचारी भारतीय असल्याचे जहाजाच्या व्यवस्थापकांनी मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मंगळवारी पहाटे दालीने धडक दिल्यानंतर बाल्टिमोरमधील प्रमुख पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने खाली नदीत पडली. बचावकार्य सुरू असून पाण्यात पडलेल्या अनेकांचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे.
जहाज व्यवस्थापन कंपनी सिनर्जी मरीन ग्रुपने मंगळवारी दुपारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले की, ‘सिंगापूर – ध्वजांकित मालवाहू जहाज ‘डाली ‘ (IMO 9697428) 26 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार अंदाजे साडेआठ वाजता जहाजावरील दोन पायलटसह प्रवास करत असताना बाल्टिमोर येथील फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजच्या एका खांबाला धडकले.
“2 पायलटसह सर्व 22 क्रू मेंबर्स भारतीय होते. यापैकी कोणीही जखमी झालेले नाही. जहाज पुलावर आदळल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण झाले नाही.ते पुढे म्हणाले की , “घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नसले तरी, ‘डाली’ ने आता आपली क्वालिफाईड इंडिव्हिज्युअल इन्सिडन्ट रिस्पॉन्स सर्व्हिस सुरू केली आहे. अमेरिकेचे तटरक्षक दल आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. जहाज कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक मान्यताप्राप्त योजनेअंतर्गत फेडरल आणि राज्य सरकारी संस्थांना पूर्णपणे सहकार्य करत आहेत.
याशिवाय दिलेल्या माहितीनुसार :
क्रू मेंबर्स – एकंदर 22 कर्मचारी सगळे भारतीय
मालक : ग्रेस ओशन प्राइवेट लिमिटेड
प्रवासाची दिशा – बाल्टीमोरहून कोलंबोला
महापौरांनी केली आणीबाणीची घोषणा
बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन स्कॉट यांनी पूल कोसळल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन आणीबाणी जाहीर केली आहे. आपत्कालीन साधने तैनात करणे आणि त्यांची जोडणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी कार्यकारी आदेश जारी केला आहे. आणीबाणीची स्थिती 30 दिवस कायम राहील आणि परिस्थितीनुसार तिचा कालावधी वाढवायचा किंवा ती मागे घ्यायची याचा विचार होईल.
रामानंद सेनगुप्ता