हिंद महासागरात सोमाली चाच्यांनी ताब्यात घेतलेल्या एमव्ही अब्दुल्ला जहाजावर कारवाई करण्याच्या युरोपियन युनियन (EU) आणि भारतीय नौदलाच्या प्रस्तावाला बांगलादेश सरकारने नकार दिल्याचे वृत्त ढाका ट्रिब्यूनने दिले आहे.
जहाजाच्या मालकाने म्हटले आहे की, ते समुद्री चाच्यांशी थेट वाटाघाटी करतील. समुद्री चाचे जहाज मालकाच्या नियमित संपर्कात होते. किती रकमेवर वाटाघाटी केल्या जात आहेत याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
जहाजावर 23 खलाशी आहेत. समुद्री चाच्यांनी जहाजाचे अपहरण झाल्यानंतर नऊ दिवसांनी जहाजाच्या मालकाशी प्रथमच संपर्क साधला. बहुतेक चाचे सोमाली आणि अरबी भाषा बोलणारे असून. आता चाच्यांनी भाड्याने घेतलेला एक इंग्रजी भाषिक माणूस फक्त मालकाशी वाटाघाटी करत आहे.
मोझांबिकच्या मापुटो बंदरातून संयुक्त अरब अमिरातीतील अल हमरिया बंदरात कोळसा घेऊन जात असताना सोमालियन चाच्यांच्या एका गटाने बांगलादेशच्या या मालवाहू जहाजावर 12 मार्च रोजी हल्ला केला.
बांगलादेश सरकारने म्हटले आहे की सर्व खलाशी निरोगी असून त्यांच्या कुटुंबियांना आठवड्याच्या शेवटी त्यांच्याशी प्रथमच संपर्क साधता आला.
गेल्या काही महिन्यांपासून विविध नौदलांनी सोमाली चाच्यांवर दबाव वाढवला आहे. अलीकडेच, भारतीय नौदलाने रुएन या मालवाहू जहाजातून 35 सोमाली चाच्यांना गेल्याच आठवड्यात पकडले. तीन महिन्यांपूर्वी या जहाजाचे सोमाली किनारपट्टीवर अपहरण करण्यात आले होते.
येमेनच्या इराणी-समर्थक हुथी अतिरेक्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लाल समुद्रात मांडलेल्या थैमानातून जहाजांचे संरक्षण करण्यावर पाश्चात्य सैन्याच्या लक्ष केंद्रित केले आहे. याचाच फायदा घेत सोमाली चाच्यांच्या चाचेगिरीमध्ये अचानक वाढ झाली आहे. नोव्हेंबरपासून, समुद्री चाच्यांनी 20हून अधिक अपहरण करण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळे विमा आणि सुरक्षा खर्चात वाढ झाली आहे. केप ऑफ गुड होपला वळसा घालून जहाजे लांबचा मार्ग घेत असल्याने गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून या प्रदेशातून होणारी व्यावसायिक वाहतूक निम्मी झाली आहे.
पिनाकी चक्रवर्ती