सकल राष्ट्रीय आनंद (ग्रॉस नॅशनल हॅपीनेस – जीएनएच) निर्देशांक जगाला देणाऱ्या भूतान देशाने गेलेफूमध्ये एक अद्वितीय “माइंडफुलनेस सिटी” बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. गेलेफू माइंडफुलनेस सिटी (जीएमसी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाश्वत शहरी केंद्रासाठी 100 दशलक्ष डॉलर्सच्या रोख्यांद्वारे निधी उभारला जाईल. हे रोखे आज म्हणजे सोमवारपासून विक्रीसाठी खुले झाले. या दूरदर्शी प्रकल्पाचा उद्देश भूतानची अर्थव्यवस्था पुन्हा सुधारणे आणि आनंद-केंद्रित शहरी विकासाचा नमुना प्रदान करून प्रादेशिक संबंध मजबूत करणे हा आहे.
गेलेफू माइंडफुलनेस सिटीः शाश्वत जीवनासाठीचा एक दृष्टीकोन
भारत-भूतान सीमेजवळ अडीच हजार चौरस किलोमीटरवर पसरलेल्या जीएमसीमध्ये चालण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी ट्रॅक, रोख्यांद्वारे गेलेफू माइंडफुलनेस सिटी उभारण्याचा भूतानचा मानसध्यानधारणेसाठी हिरवीगार जागा, ध्यान केंद्रित शिक्षण आणि आरोग्य केंद्रे असतील. हे शहर पर्यावरण-पर्यटनाला प्रोत्साहन देईल आणि तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, वित्त आणि शेतीसह विविध उद्योगांना पाठबळ देईल. सजगता आणि पर्यावरण-स्नेही उपक्रमांद्वारे भूतान आधुनिक, कल्याण-केंद्रित शहरी जागांसाठी एक उदाहरण स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
जीएमसीचे वरिष्ठ अधिकारी रॅबसेल दोरजी यांनी या शहराच्या उभारणीमागचे उद्दिष्ट भूतानच्या मूल्यांमध्ये खोलवर रुजलेले असल्याचे सांगितले. आर्थिक विकास आणि कल्याण यांच्यात समतोल साधण्याच्या भूतानच्या अद्वितीय दृष्टिकोनावर भर देताना ते म्हणाले, “माइंडफुलनेस हे आपल्या मूल्यांवर आधारित शहराच्या केंद्रस्थानी आहे आणि आपल्या राष्ट्राच्या मूल्यं आणि ओळखीशी सुसंगत आहे.”
निधी उभारणी आणि आर्थिक महत्त्वाकांक्षा
जीएमसी राष्ट्रबांधणी रोखे 17 डिसेंबरपर्यंत अनिवासी भूतानी नागरिकांना उपलब्ध असतील. गोळा केलेला निधी भूतानच्या कार्बन-नकारात्मक विकासाच्या उद्दिष्टाला पाठबळ देत प्रारंभिक पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा स्रोत आणि वाहतूक प्रणाली विकसित करण्यास मदत करेल. जीएमसीचे गव्हर्नर आणि माजी पंतप्रधान लोटे शेरिंग म्हणाले, “हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशाच्या आर्थिक महत्त्वकांक्षेला पुन्हा उभारी देईल.”
जीएमसी गुंतवणूकदारांना आकर्षित करून तसेच वित्त, पर्यटन, हरित ऊर्जा आणि इतर क्षेत्रांमध्ये रोजगार निर्माण करून आर्थिक विकासाला चालना मिळेल असे भूतानला वाटते. अलिकडच्या वर्षांत युवकांच्या बेरोजगारीचा दर 30 टक्क्यांच्या जवळ येत असताना, राष्ट्रीय वारसा आणि अग्रगामी विचारांच्या मूल्यांमध्ये रुजलेले एक समृद्ध शहरी केंद्र तयार करून परदेशात संधी शोधणाऱ्या तरुणांच्या स्थलांतराला आळा घालण्याचे भूतानचे उद्दिष्ट आहे.
आव्हाने आणि प्रादेशिक पाठबळ
भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या कल्पनेतून साकार होणाऱ्या जीएमसीला पूर्ण होण्यास 21 वर्षे लागण्याची अपेक्षा आहे, सुरुवातीच्या टप्प्यात दीड लाख रहिवाशांना सामावून घेण्याचे आणि अखेरीस दहा लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाबाबत लक्षणीयरित्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आकर्षण असले तरी, भूतानचे भौगोलिक स्थान संपर्क आव्हाने निर्माण करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधा आणि शहरी नियोजन तज्ज्ञ सूर्यराज आचार्य यांनी नमूद केले की, “शहराला स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करणे हे जागतिक दळणवळणाशी तुम्ही कसे जोडून घेता यावर अवलंबून आहे.”
भूतानचा प्रमुख आर्थिक भागीदार असलेल्या भारताने आपले रस्ते आणि रेल्वेचे जाळे सीमेपर्यंत वाढवून, या प्रदेशासोबत शहराचे असणारे संबंध मजबूत करून जीएमसीला पाठिंबा दर्शविला आहे. जगातील पहिले कार्बन-निगेटिव्ह राष्ट्र म्हणून, भूतान पर्यावरणीय व्यवस्थापन आणि कल्याण-केंद्रित धोरणांसह आर्थिक उद्दिष्टे संतुलित करून शहरी विकासाचे एक नवीन मॉडेल प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रेशम
(रॉयटर्स)