ब्राझील खेळाडूंचा ऑलिम्पिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय, बचावकार्यात झाले सहभागी

0
ब्राझील
ब्राझीलमधील रिओ ग्रँड डो सुल राज्यातील पोर्टो एलेग्रे येथे पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या बोटीला तयार करताना ब्राझीलचे ऑलिम्पिकपूर्व नौकानयनपटू इवाल्डो मथियास बेकर आणि पिड्रो तुचटेनहॅगन (रॉयटर्स/एड्रियानो मचाडो)

ब्राझील खेळाडूंनी त्यांची ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या स्वप्नाला तिलांजली दिली आहे.  देशात आलेल्या सर्वात भीषण पुरामुळे प्रभावित झालेल्या देशबांधवांना मदत करण्यासाठी खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे. देशाच्या दक्षिणेकडील रिओ ग्रँड डो सुल राज्यात मुसळधार पाऊस आणि आलेल्या पुरामुळे किमान 100 लोक मरण पावले असून 130 हून अधिक बेपत्ता आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या केवळ तीन महिने आधी खेळाडूंनी हा निर्णय घेतला आहे.

या काही खेळाडूंमध्ये जागतिक तसेच ऑलिम्पिक सर्फिंग विजेता इटालो फेरेरा, ब्राझील ऑलिम्पिक पुरुष ज्युडो संघाचे प्रशिक्षक अँटोनियो कार्लोस किको परेरा यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत माजी ऑलिम्पियन-तीन स्पर्धांमध्ये भाग घेणारा जिम्नॅस्ट डायने डॉस सांतोस आणि 50 मीटर बटरफ्लायमध्ये जागतिक विक्रमवीर असलेल्या माजी ऑलिम्पिक जलतरणपटू निकोलस सांतोस यांचाही समावेश आहे.

याशिवाय हलक्या वजनाच्या दुहेरी स्कल्स प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेतील पात्रता फेरीत भाग घेणाऱ्या रोअर्स इव्हाल्डो बेकर आणि पिड्रो टुचटेनहॅगन यांनीही देशबांधवांची दुर्दशा पाहून स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सशी दूरध्वनीवरून बोलताना बेकरने आपल्या सहकाऱ्याशी याबाबत काय बोलणे झाले ते सांगितले.

“मी म्हटलेः पेड्रो, मी आता हे करू शकत नाही.”

“ऑलिम्पिक हे आपल्या जीवनाचे स्वप्न आहे, परंतु आज आपण स्वतःला आपल्या देशबांधवांना याच परिस्थितीत सोडलेले पाहू शकत नाही”, असे तुचटेनहॅगन म्हणाले.

पुरामुळे केवळ नागरिकांचेच नाही तर राज्यात राहणाऱ्या ऑलिम्पिकपटूंचेही नुकसान झाले आहे. काही खेळाडूंचे म्हणणे आहे की गुएबा नदीचा किनारा फुटल्यानंतर राज्याची राजधानी पोर्टो एलेग्रेच्या रस्त्यांवर आलेल्या पुरामुळे त्यांचे प्रशिक्षण विस्कळीत झाले.

इतर खेळाडूंसाठीही हे नुकसान आणखी भयंकर आहे. पोर्टो एलेग्रे येथे राहणाऱ्या पॅरालिम्पिक तलवारबाज वॅन्डरसन चावेस यांनी सांगितले की, संपूर्ण शहर पाण्याखाली गेल्याने त्याने आपली सर्व पदके आणि पासपोर्ट गमावला आहे. चावेस अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. प्रशिक्षण देणे आणि घेणे ही देखील एक मोठी समस्या बनली आहे. ब्राझीलच्या ऑलिम्पिक समितीने आखलेल्या एका योजनेनुसार राज्यातील खेळाडू इतरत्र प्रशिक्षण घेऊ शकतील, परंतु आलेल्या पुरामुळे विमानतळही पाण्याखाली गेल्याने तिथून बाहेर पडणे ही पण एक समस्या आहे.

राष्ट्रपती लुला यांनी सरकारला देशात सार्वजनिक आपत्ती घोषित करण्यास सांगितले आहे. यामुळे गेल्या वर्षी मंजूर झालेल्या वित्तीय नियमांद्वारे निर्धारित केलेल्या खर्चाच्या मर्यादेचे पालन करण्याची आवश्यकता न ठेवता अतिरिक्त सरकारी खर्च करण्याची परवानगी मिळेल.

ब्राझीलला या वर्षी अनेक आरोग्य संकटांचा सामना करावा लागत आहे. फेब्रुवारीमध्ये देशातील प्रसिद्ध कार्निव्हलच्या अगदी आधी देशव्यापी डेंग्यू महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली गेली. डेंग्यूचे संकट आणि अलीकडील पूर या दोन्हींसाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी हवामान बदलांना कारणीभूत ठरवले आहे. वाढलेली उष्णता आणि सरासरीपेक्षा जास्त पडलेला पाऊस हे त्याचे दृश्य परिणाम आहेत.

अश्विन अहमद
(वृत्तसंस्था)


Spread the love
Previous articleArmy To Get An Advanced Made-In-India Drone To Keep An Eye On Pakistan
Next articlePoK in Turmoil: What’s Behind The Rising Unrest?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here