“मी तुम्हांला निश्चितपणे हे सांगू शकतो की पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात उद्या (बुधवारी) ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने बैठक होणार आहे. अचूक वेळ आणि व्यूहरचना तयार केली जात आहे परंतु उद्या (बुधवारी) बैठक होईल.”
या निवेदनासह परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी शिखर परिषदेपर्यंतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ही बैठक किती काळ चालेल, कोणत्या मुद्द्यांवर एकमत होणार आणि इतर अनेक प्रश्नांसाठी आज होणाऱ्या बैठकीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. गलवान संघर्षानंतर मोदी आणि शी यांच्यातील ही पहिलीच बैठक होणार असून तेव्हापासून पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.
भारतशक्तीचे संस्थापक आणि मुख्य संपादक नितीन ए. गोखले यांचे कझानमधील निरीक्षण आणि अभ्यास यावर आधारित यांचे विश्लेषण तुम्ही इथे पाहू शकता. आमच्या दिल्ली स्टुडिओत असलेल्या अमिताभ पी. रेवी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
सध्या चीनबरोबर गमावलेला विश्वास परत मिळवणे महत्वाचे आहे. 1990 च्या दशकात स्वाक्षरी केलेल्या करारांचे काय होते, ज्यामध्ये बारीकसारीक मुद्द्यांची तपशीलवार मांडणी करण्यात आली होती, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देश कसे कार्य करतील याविषयी देखील प्रश्न आहेतच. ते सगळे नंतर विचारात घेतले जातील.
रशियाबरोबरचे आपले संबंधही सुरळीतपणे पुढे जात आहेत. मिस्त्री यांनी निदर्शनास आणून दिले की गेल्या 10 वर्षांतील मोदींची रशियाला ही सातवी भेट आहे. यावर्षी तीन महिन्यांत दोन भेटी झाल्या आहेत.”
पुतीन यांच्यासोबतच्या द्विपक्षीय भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील संघर्षाबाबत दृष्टिकोन एकमेकांना सांगितला. पंतप्रधानांनी युद्धावर राजनैतिक तोडगा काढण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला आणि रशियाच्या अध्यक्षांना युक्रेनच्या नेत्यांसोबत झालेल्या त्यांच्या संभाषणाची माहिती दिली. या भागातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत योगदान देण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.
रशियन सैन्यात सेवा बजावत असलेल्या भारतीय नागरिकांची लवकर सुटका करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. “सध्या भारतीय दूतावास रशियाकडे 20 प्रकरणांचा पाठपुरावा करत असून या नागरिकांची लवकर सुटका होणे अपेक्षित आहे,” असेही मिस्री म्हणाले.
संरक्षण सहकार्यात सातत्याने प्रगती होत आहे आणि लष्करी तांत्रिक सहकार्याबाबतच्या बैठकीची तारीख लवकर जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. भारताचा अणुऊर्जा आयोग आणि रशियाचे रोसाटॉम हे कुडनकुलम ऊर्जा प्रकल्पाच्या तीन ते सहा युनिटच्या स्थापनेबाबत एकमेकांच्या संपर्कात आहेत, असेही मिस्री यांनी सांगितले.
भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज, पुरवठा साखळी टिकवून ठेवणे, खत आणि कोळसा यांचा पुरवठा यासाठी मदत करण्याचे आश्वासन पुतीन यांनी दिले आहे. उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव 12 नोव्हेंबर रोजी व्यापार आणि संस्कृतीवरील चर्चेसाठी भारतात येण्याची शक्यता आहे. ब्रिक्स परिषदेचे आयोजन ज्या कझान शहरात करण्यात आले आहे तिथे भारतीय वाणिज्य दूतावास उघडला जाईल, त्यानंतर येकातेरिनबर्गमध्येही आणखी एक वाणिज्य दूतावास सुरू करण्यात येईल असेही मिस्री यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेकशियान यांचीही भेट घेतली. “प्रादेशिक संपर्क आणि आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या आयएनएसटीसीच्या (आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक मार्गिका) चाबहारवर बंदराबाबतदेखील चर्चा झाली”.
दीर्घकालीन विचार करता, चाबहार बंदर हे दोन्ही देशांना अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणी आणि विकासासाठी, व्यापार आणि लोकांमधील परस्पर संबंध वाढवण्यासाठी मदत करण्याचा दोन्ही देशांचा असणारा इरादा अधोरेखित करते.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाबद्दलही मोदींनी चिंता व्यक्त केली आणि तिथल्या नागरिकांच्या संरक्षणाचे आवाहन केले. याशिवाय संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या गरजेवर भर दिला.
राष्ट्राध्यक्ष पेझेक्शियान यांनी या प्रदेशातील शांतता आणि सलोख्यावर भर दिला तसेच “सर्वांशी चांगले संबंध असल्यामुळे” हा संघर्ष कमी करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका असू शकते यावर भर दिला.
ऐश्वर्या पारीख