ब्रिटनमध्ये आठवड्याच्या शेवटी देशभरातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने झाली. उत्तर ब्रिटनमधील रोथरहॅम येथे निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर किमान दहा पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत, इतर अनेकांची हाडे मोडली आहेत किंवा तुटलेली आहेत. या सगळ्या प्रकाराची सुरुवात निर्वासितांसाठी बांधलेल्या हॉटेलच्याबाहेर दिल्या गेलेल्या घोषणाबाजीने झाली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली. ‘त्यांना बाहेर काढा’ अशा मोठमोठ्या आवाजात घोषणा दिल्या गेल्या. काहींनी तर आणखी अपमानास्पद घोषणा दिल्या तसेच पोलिसांविरोधात अपशब्द वापरले. अनेक निदर्शकांनी चेहरे माकडटोपी घालून आणि मुखवटे लावून झाकलेले होते. या निदर्शकांनी नंतर दंगली घडवून आणल्या, हॉटेलच्या दिशेने आगीचे पेटते गोळे फेकले, खिडक्या फोडल्या, आग लावली आणि पोलिसांवर हल्ला केला.
या गर्दीत नंतर 700 लोक सहभाग झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी एक पोलीस अधिकारी बेशुद्ध पडला. “याचा निषेध असो,” असे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले.” ही संघटित, हिंसक गुंडगिरी आहे आणि तुम्ही यात थेटपणाने किंवा ऑनलाइन सहभागी असलात तर त्याला कडक शिक्षा होईल,” असेही त्यांनी निक्षून सांगितले.
पण रोथरहॅमपुरतीच हीं घटना मर्यादित राहिली नाही. शनिवार आणि रविवारी स्थलांतरित-विरोधी गट, मुस्लिम-विरोधी गट आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षामुळे ब्रिटनमधील विविध शहरांमध्ये आठवड्याच्या शेवटी निदर्शने झाली. 29 जुलै रोजी वायव्य ब्रिटनमध्ये तीन तरुण मुलींची हत्या ही घटना या ताज्या निदर्शनांची प्रेरणा बनली आहे. या हत्यांनंतर लगेचच, हल्ल्यातील संशयित कट्टरपंथी मुस्लिम स्थलांतरित असल्याची अफवा समाजमाध्यमांवर पसरली. ही सुरुवातीची ठिणगी होती ज्याचे रूपांतर नंतर निदर्शनांच्या वणव्यात झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेला संशयित स्थलांतरीत नसून त्याचा जन्म ब्रिटनमध्येच झाला आहे.
ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टारमर यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आणि याला ‘अति-उजव्या विचारसरणीची गुंडगिरी’ असे संबोधले आहे. दंगलखोरांवर त्वरित कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले. “या आठवड्याच्या शेवटी आपण पाहिलेल्या अति उजव्या विचरसरणीच्य गुंडगिरीचा मी पूर्णपणे निषेध करतो. ज्यांनी या हिंसाचारात भाग घेतला आहे त्यांना कायद्याने होणाऱ्या शिक्षेला सामोरे जावे लागेल यात काहीच शंका नाही,” असे स्टारमर यांनी इशारा दिला. जर तुम्ही लोकांना त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे किंवा त्यांच्या श्रद्धेमुळे लक्ष्य करत असाल तर ती अति-उजव्या विचारसरणीची गुंडगिरीच आहे आणि मी तसे सांगण्यास तयार आहे.”
अलीकडील हिंसाचाराने 2011च्या आठवणी परत एकदा जाग्या झाल्या. 2011 मध्ये पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले तेव्हा हजारो लोक रस्त्यावर उतरले. कीर स्टारमर तेव्हा ब्रिटनचे मुख्य वकील होते. हलसारख्या ठिकाणी, स्थलांतरितविरोधी हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एकतेचा संदेश पाठवण्यासाठी स्थानिक समुदाय एकत्र आला होता. दंगलीनंतर साफसफाईसाठी आलेल्या जोश हॅमलेट यांनी बीबीसीला सांगितले, “(मी) लज्जित आहे. हा सगळाच प्रकार तिरस्करणीय आहे आणि मला काहीतरी कारवाई करायची होती. मला काहीतरी करायचे होते. तुम्ही बघू शकता, मला एक लहान मुलगा आहे. त्याने ज्या जगात मोठे व्हावे अशी माझी इच्छा आहे ते हे नाही. तर हो, फक्त बाहेर या, एक सकारात्मक बदल करा, लोकांना दाखवा की हलमध्ये तुम्ही काल रात्री पाहिलेला मूर्खपणा परत बघायला मिळणार नाही.” आणखी एक हल रहिवासी, नादिन बाल्मर, “आणि मला वाटते की स्प्रिंग बँकच्या लोकांना, आपल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई समुदायाला हे दाखवणे खरोखर महत्वाचे होते, की, तुम्हाला माहिती आहे, जर लोक द्वेष पसरवण्यासाठी 200 लोकांना रस्त्यावर आणणार असतील, तर आम्ही चांगुलपणा पसरवण्यासाठी 20 हजार लोकांना रस्त्यावर उतरवू.”
या निदर्शनांनंतर देशभरातून एकंदर 150 लोकांना अटक करण्यात आली आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज