कॅनडा सरकारने, त्यांच्या इमिग्रेशन धोरणात बदल करणार असल्याचे जाहीर केले असून याचा भारतीयांना मोठा फटका बसू शकतो. इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षाच्या अखेरीस कॅनडामध्ये येणाऱ्या परदेशी कामगारांपैकी सुमारे ५० लाख ‘तात्पुरत्या व्हिसाचे’ परवाने कालबाह्य होतील. त्यामुळे संबंधित सर्व परवाना धारकांना जोवर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण होत नाही किंवा परमनंट रेसिडंटमध्ये परावर्तन होत नाही तोपर्यंत कॅनडामध्ये वास्तव्य करता येणार नाही. त्यांना देशाबाहेर जावे लागेल.
त्यात भर म्हणजे, सुमारे 7 लाख 66 हजार शिक्षण व्हिसा परवान्यांची मुदतही पुढील वर्षी डिसेंबर अखेर संपणार असल्याचे मिलर यांनी स्पष्ट केले आहे.
इमिग्रेशन प्रक्रियते अचानक बदल का?
अहवालात म्हटल्यानुसार, पुढील तीन वर्षांत कॅनडातील तात्पुरत्या स्थलांतरित झालेल्या आणि कायमस्वरूपी रहिवाशांचा प्रवाह मर्यादित करण्याच्या ट्रुडो सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून हे मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कॅनडाच्या सरकारला त्यांच्या स्थानिक पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि गृहनिर्माणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रिपोर्टनुसार, सध्या कॅनडाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. बँक ऑफ कॅनडाचे माजी गव्हर्नर स्टीफन पोलोझ यांच्या मते, ‘’देशावर मंदीचे संकट घोंगावते आहे कारण कॅनडाबाहेरील स्थलांतरितांमुळे आम्ही भरडले जात आहोत. आमच्या मूळ स्थानिक रहिवाशांना याचा फटका बसतो आहे.”
भारतीय नागरिकांना बसू शकतो फटका
या नवीन धोरणांमुळे, पुढील वर्षी कॅनडातील कायमस्वरूपी रहिवाशांची (परमनंट रेसिडंट्स) नोंद ही 5 लाखांवरुन वरून 3 लाख 95 हजारांपर्यंत खाली येईल. म्हणजेच त्यामध्ये 21% टक्क्यांची घट होईल. याशिवाय अन्य भारतासह अन्य देशांमधून तात्पुरत्या कालावधीसाठी आलेले कामगार आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याकरता आलेले विद्यार्थी यांच्या संख्येत देखील घट होईल.
या बदलांमुळे कॅनडामध्ये तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या भारतीय कामगारांना त्रास होऊ शकतो. त्यांच्यासाठी त्यांच्या वर्क परमिटचे नूतनीकरण करणे किंवा त्यांचा मुक्काम वाढवणे हे आव्हानात्मक ठरु शकते. तसेच परमनंट व्हिसासाठी अप्लाय केलेल्या भारतीयांनाही या पॉलिसी बदलाचा फटका बसू शकतो.
कॅनडाची वांशिक भारतीय लोकसंख्या 1.68 दशलक्ष इकती असून त्यामध्ये सर्व प्रकारच्या अभियंत्यांपासून, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांपर्यंत अशा विविध पदावरील लोकांचा समावेश आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे