कॅनडातील चार प्रमुख बँकांनी जागतिक बँकिंग क्षेत्राच्या हवामान आघाडीतून बाहेर पडण्याचा त्यांचा निर्णय जाहीर केला. शुक्रवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. कॅनडाचे कर्जदार आता सहा प्रमुख अमेरिकन बँकांमध्ये सहभागी झाले आहेत.नेट-झिरो बँकिंग आघाडीमधून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा 6 डिसेंबर रोजी गोल्डमॅन सॅक्सने केली आणि हे सत्र पुढे सुरू राहिले. डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये परत येण्यापूर्वी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामान बदल धोरण ठरवण्याच्या सरकारांच्या प्रयत्नांवर ट्रम्प यांनी टीका केली आहे.

बाहेर पडलेल्या बॅंका कोणत्या?

हवामान आघाडीतून बाहेर पडलेल्यांमध्ये टीडी बँक, बँक ऑफ मॉन्ट्रियल, नॅशनल बँक ऑफ कॅनडा आणि कॅनेडियन इम्पीरियल बँक ऑफ कॉमर्स (सीआयबीसी) या चार कॅनेडियन बँका आहेत.

तर वेल्स फार्गो, सिटी, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टेनली आणि जे. पी. मॉर्गन या अमेरिकेच्या इतर मोठ्या बँकांनी माघार घेतली आहे.

बॅंका त्यांचे हवामान धोरण तयार करणार

बँक ऑफ कॅनडाचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी यांनी स्थापन केलेला संयुक्त राष्ट्र-प्रायोजित उपक्रम, नेट-झिरो बँकिंग अलायन्स, वित्तीय संस्थांना हवामान बदलाचे परिणाम मर्यादित करण्यासाठी आणि निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने चालना देण्यासाठी 2021 मध्ये सुरू करण्यात आली.

कॅनडाच्या बँकांनी वेगवेगळ्या निवेदनात म्हटले आहे की ते आघाडीबाहेर राहून काम करण्यासाठी आणि त्यांची हवामान धोरणे विकसित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

सीआयबीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “एनझेडबीएची स्थापना अशा वेळी करण्यात आली होती जेव्हा जागतिक उद्योगक्षेत्र हवामानाबाबत काहीतरी निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि या प्रयत्नांना चालना देण्यात तसेच त्याला गती  देण्यात याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.”

“हे क्षेत्र जसजसे विकसित आणि परिपक्व झाले आहे, या क्षेत्रांमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसोबत लक्षणीय प्रगती केली आहे, तसतसे आम्ही आता एनझेडबीएच्या औपचारिक संरचनेच्या बाहेर हे काम पुढे नेण्यासाठी सुस्थितीत आहोत,” असे त्यात म्हटले आहे.

वाढता दबाव

कॅनेडियन बँकांना गेल्या काही वर्षांत त्यांच्या निधीच्या उपक्रमांमुळे उद्भवणाऱ्या हवामान-संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी वाढत्या दबावाला सामोरे जावे लागले आहे.

देशाच्या बँकिंग नियामकाने वित्तीय संस्थांना त्यांच्या हवामान-संबंधित जोखमींचे व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील सादर केली आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)