“धोरणात्मक हितसंबंध सुरक्षित करणे, क्षमता बांधणी, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांवर भर देऊन लष्करी सहकार्य वाढवण्यावर चर्चा केंद्रित असेल,” असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान त्यांच्या दौऱ्यादरम्यान संरक्षण सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील, ज्यामुळे भारत आणि अल्जेरिया यांच्यातील मजबूत लष्करी सहकार्य बळकट होईल.
1 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या अल्जेरियाच्या गौरवशाली क्रांतीच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आणि समारंभात जनरल चौहान यांचा सन्माननीय अतिथी म्हणून सहभाग हे या भेटीचे प्रमुख आकर्षण आहे. ही महत्त्वपूर्ण घटना 1 नोव्हेंबर 1954 रोजी सुरू झालेल्या अल्जेरियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या संघर्षाचा उत्सव साजरा करते.
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, व्यावसायिक लष्करी प्रशिक्षण आणि शिक्षणाला चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने, जनरल चौहान अल्जेरियाच्या लष्करी नेतृत्वाला आकार देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अल्जेरियाच्या प्रतिष्ठित हायर वॉर स्कूलला भेट देतील. संरक्षण शिक्षण आणि प्रशिक्षणातील संबंध आणखी दृढ करण्यासाठी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.
या दौऱ्यामुळे भारत आणि अल्जेरिया यांच्यातील संरक्षण भागीदारी वाढेल तसेच दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वास आणि सामंजस्य वाढेल अशी अपेक्षा आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या अलिकडील ऑक्टोबर महिन्यातील दौऱ्यानंतर राजनैतिक आणि संरक्षण संबंधांमधील बळकटीचा मार्ग अधोरेखित होत आहे.