भविष्यातील भारतीय सैन्य उभारणीच्या दृष्टीने अग्निपथ भरती योजना जाहीर होताच भारतातील काही भागांत त्याचे हिंसक पडसाद उमटले. मात्र याद्वारे कार्यकुशल आणि सक्षम सैन्य तयार होणार असून तारुण्य आणि अनुभव यांचा तो मिलाफ असेल. वेगळ्या युद्धभूमीवर व वेगळ्या स्वरुपात लढली जाऊ शकतील, अशा भविष्यातील संभाव्य युद्धाच्या दृष्टीने जवानांना आधुनिक तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या वापरासंबंधीचे प्रशिक्षण मिळेल. युद्धकला आणि शास्त्र कसे बदलत चालले आहे, याची स्पष्ट माहिती त्यांना मिळेल.
रशिया-युक्रेन युद्ध
तयारी करा, पूर्वग्रह ठेवू नका
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी हे युद्ध म्हणजे सहजसाध्य आहे, काही दिवसांतच हे संपेल, असे रशिया आणि युक्रेन युद्धाला प्रत्यक्षात सुरुवात होण्यापूर्वी रशिया तसेच पाश्चिमात्य देशातील राजनैतिक विचारवंतांचे मत होते. पण चार महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला तरी, युद्ध सुरूच आहे. प्रतिस्पर्ध्याला कधीच कमी लेखू नका, हे कालबाह्य न झालेले सत्य यातून शिकायला मिळाले. रशियन सैन्याने दाखविलेल्या साधारण कामगिरीवरून देखील हाच निष्कर्ष निघतो की, रणगाड्यांना पायदळाचे पाठबळ, भूभागावर सुरू असलेल्या कारवाईशी हवाई दलाचा समन्वय तसेच अन्न, इंधन आणि दारुगोळा यांच्या वाहतुकीसाठी सूक्ष्म नियोजन या मूलभूत गोष्टी गरजेच्या आहेत.
शहरी युद्ध : एक नवे वास्तव
आणखी एक मुद्दा म्हणजे, नागरी युद्धाचे क्रूर, खर्चिक आणि वेळखाऊ पैलू. शहरी भागातील दाट लोकवस्ती ही बचाव पक्षाच्या दृष्टीने अनुकूल ठरते. स्थानिक जागेची खडा न खडा माहिती असल्याने त्याचा फायदा त्याला होऊ शकतो. उंच इमारती, अरुंद रस्ते आणि भुयारी मार्ग हे अवजड सशस्त्र वाहनांसाठी अडसर ठरतात. मग अशावेळी पायदळाची मदत घ्यावी लागते आणि पण त्यांच्यावर हल्ले होतात तसेच लपून गोळीबारही केला जातो. या सर्व प्रकारामुळे नाउमेद झालेला हल्लेखोर हवेत अंदाधुंद गोळीबार करतो किंवा क्षेपणास्त्र सोडतो. परिणामी मोठ्या प्रमाणावर वित्तीय आणि जीवितहानी होते. (2004चे इराक युद्ध अशाच प्रकारचे होते) याचा आणखी एक परिणाम म्हणजे, जखमींना घटनास्थळावरून हलविताना विलंब होईल, मृतांची संख्या वा़ढेल आणि युद्धविषयक गुन्ह्यांतही वाढ होईल.
स्पेशल फोर्स खरोखर खास असतात
अमेरिका आणि ब्रिटनने प्रशिक्षित केलेल्या युक्रेनच्या स्पेशल फोर्सने रशियाची डोकेदुखी वाढवली आहे. शत्रूच्या ताब्यातील परिसराजवळ कार्यरत असलेल्या या स्पेशल फोर्सने रणगाड्यांसाठी दारूगोळा, अन्न तसेच इंधन वाहून नेणाऱ्या वाहनांवर हल्ला करून रशियाचे दळणवळण उद्ध्वस्त केले आहे. ते अतिशय चपळाईने रणगाडेविरोधी सुरूंग पेरतात तसेच छोट्या ड्रोनचा वापर करून लक्ष्याचा पाठपुरावा करत त्यावर हल्ला करतात. शत्रू सैन्याला मार्गातच रोखून ते युक्रेनच्या सैन्याला पुन्हा सज्ज होण्यास कालावधी देतात.
सायबर डोमेन
रशियाचे सायबर हल्ले तसेच युक्रेनियन लक्ष्यांविरुद्ध (सरकारी व इन्फ्रा नेटवर्क) इलेक्ट्रॉनिक युद्धाचा अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. खासगी कंपन्या, पाश्चिमात्य देश आणि इतर सरकारी व बिगर सरकारी यंत्रणा यांच्या मदतीने कडेकोट सायबर सुरक्षा ठेवली गेली.
सॉफ्ट पॉवर म्हणजेच हार्ड पॉवर
युद्ध म्हणजे फक्त दोन सैन्यांतील संघर्ष नसतो. सर्वसामान्य जनता देखील त्यातील एक प्रमुख घटक असते. रशियन आक्रमणाला युक्रेनने आपल्या जनतेविरुद्धचे युद्ध, असे संबोधले आहे. दोन असमान देशांमधील युद्ध असल्याचे सांगत राष्ट्रवादाचे भावनिक आवाहन युक्रेनने केले आणि नागरिकांचा पाठिंबा मिळवला. पण रशियन नागरिकांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही, अनेकांना पुतिन यांची ही लष्करी कारवाई पटलेली नाही.
2020चे अर्मेनिया-अझरबैजान युद्ध
हवाई मार्ग
अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात सहा आठवडे चाललेल्या युद्धातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अझरबैजानद्वारे ड्रोनचा झालेला व्यापक वापर. यूएव्ही (Unmanned Aerial Vehicle) हे केवळ आयएसआरसाठी (गुप्तचर माहिती, पाळत व टेहळणी) फायदेशीर ठरले नाही तर, लांब पल्ल्यांच्या हल्ल्यांसाठी देखील सक्षम ठरले. ते दारुगोळ्याने सज्ज करून मानवनियंत्रित विमानातून शत्रूवर सोडण्यात आले. एकूणच, शत्रूचे हवाई संरक्षण मोडून काढण्यासाठी त्याची मदतच झाली.
पारंपरिक युद्धपद्धती
युद्धामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कितीही वापर केला तरी, भूभूगावर कब्जा करून तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाप्रमाणेच पारंपरिक लष्करी कारवाई करावी लागते. समुद्र सपाटीपासून उंचावरील जागा काबीज करण्यासाठी पारंपरिक युद्ध-संघर्ष महत्त्वाचा ठरते. जसे भारतीय सैन्याने कारगिल युद्धादरम्यान आणि एलएसीवरील संघर्षाच्या वेळी दाखवून दिले आहे. कैलास पर्वतरांगांवर ताबा मिळवण्यासाठी भारतीय सैन्य चिनी सैन्यापेक्षा वरचढ ठरले होते. त्यामुळे त्यानंतरच्या वाटाघाटींमध्ये दबाव कायम ठेवता आला.
भाडोत्री सैनिकांचा वापर
अझरबैजान आणि तुर्कस्तानने कितीही नाकारत असले तरी, नागोर्नो-काराबाख संघर्षात सीरियन भाडोत्री सैनिकांचा वापर केल्याची अनेक रिपोर्ट समोर आले आहेत. भाडोत्री सैनिक ही नवी संकल्पना नसली तरी, त्यांचा समकालीन वापर व्यापक आहे. रशियाने सीरिया, युक्रेन आणि लिबियामध्येही वॅग्नर गटाचा मुक्तपणे वापर केला आहे. बोको हराम विरुद्धच्या लढ्यात नायजेरियाने त्यांची मदत मागितली होती आणि सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनेही येमेनमध्ये ते केले आहे. भाडोत्री सैनिक आणि इराक व अफगाणिस्तानमधील युद्धांमध्ये अमेरिकेने वापरलेले ब्लॅकवॉटरसारखे खासगी लष्करी सुरक्षा कंत्राटदार यांच्यातील फरक दर्शवणारे आंतरराष्ट्रीय नियम अस्पष्ट आहेत.
थोडक्यात सांगायचे तर, आधुनिक काळातील युद्धात, पुस्तकातील प्रत्येक युक्ती वापरली जाईल आणि नवीन देखील तयार केली जाईल. युद्धाच्या बाबतीत कोण बरोबर हे ठरवले जात नाही, तर, कोण अस्तित्वात आहे, हे पाहिले जाते.