चीनच्या चिथावणीखोर धोरणामुळे दक्षिण चीन समुद्रात ‘अपघाती संघर्षा’चा धोका

0
China-Tiwan-South China Sea:
तैपेईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तैवानमधील अमेरिकन इन्स्टिट्यूट इन तैवानच्या (एआयटी) संचालक सँड्रा औडकिर्क. (रॉयटर्स)

तैपेईमधील अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्याचा इशारा

दि. १४ जून: तैवान, जपान आणि दक्षिण चीन समुद्रात चीनकडून सुरु असलेल्या चिथावणीखोर कृत्यांमुळे दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रात ‘अपघाती संघर्ष’ पेटण्याची चिन्हे दिसत आहेत, असे मत तैपेईमधील अमेरिकी राजनैतिक अधिकारी सँड्रा औडकिर्क यांनी केला आहे. तैवानमधील अमेरिकन इन्स्टिट्यूट इन तैवानच्या (एआयटी) संचालक म्हणून त्यांच्याकडे जबादारी आहे. मात्र, वास्तवात त्यांना तैवानमधील अमेरिकी राजदूतच मानले जाते.

‘तैवान आणि लगतच्या परिसरात जैसे थे स्थिती कायम राहावी या साठी अमेरिका ठामपणे वचनबद्ध आहे. मात्र, चीनच्या आक्रमक धोरणामुळे या भागात ‘अपघात घडण्याची चिन्हे आहेत. त्याची परिणीती मोठ्या संघर्षात होऊ शकते. त्यामुळे चीनने जबरदस्ती आणि चिथावणीखोर कृत्ये करू नयेत, अशी आमच्याकडून चीनला सातत्याने विनंती करण्यात येते. ही चिथावणीखोर कृत्ये अतिशय धोकादायक आहेत. त्यामुळे काही चुकीची गृहीतके मांडली जावून त्याचा परिणाम ‘अपघात’ होण्यात होऊ शकतो. परिणामी या भागात मोठा संघर्ष पेटेल,’ असे अधिकारी सँड्रा औडकिर्क यांनी सांगितले. सँड्रा औडकिर्क यांचा तैवानमधील तीन वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला असून, त्या निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘तैवानला स्वतःचा बचाव करता यावा यासाठी त्याची क्षमतावृद्धी करणे हे ‘एआयटी’चे प्राधान्यक्रमाचे काम होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, तैवान आणि अमेरिकी लष्कर एकत्र कसे काम करेल, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. अमेरिकेकडून तैवला होणाऱ्या शस्त्र पुरवठ्यास विलंब होत असल्याच्या तैवानच्या तक्रारीवर, इतर शस्त्र उत्पादकांप्रमाणेच अमेरिकेलाही कोविडचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यात थोडा विलंब होत आहे, असे त्यांनी सांगितले.

चीनकडून तैवानवर सातत्याने दावा करण्यात येत आहे. अमेरिका आणि तैवान यांच्यात औपचरिक राजनैतिक संबंध नसले, तरी अमेरिका तैवानचा सर्वांत मोठा आंतरराष्ट्रीय पाठीराखा आणि शस्त्र पुरवठादार देश आहे. त्यामुळेच सँड्रा औडकिर्क यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. चीनकडून तैवानच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून लष्करी कारवायांत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर तैवानवर राजनैतिक मार्गाने दबाव वाढविण्याचा प्रयत्नही चीन करीत आहे. तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या शपथविधीनंतर गेल्या महिन्यात चीनकडून तैवानच्या खाडीच्या परिसरात लष्करी कवायती आणि युद्धसराव करण्यात आला होता. लाई यांना चीनकडून फुटीरतावादी मानले जात. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्यासाठी चीनकडून हा युद्धसराव करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तैवानबरोबरच दक्षिण चीन समुद्रातील सेकंड थॉमस शोल या पाणथळ जागेवरून चीनचा फिलिपिन्सबरोबरही वाद आहे. तर, पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांवरून जपानबरोबरही चीनचा संघर्ष सुरु आहे. तैवान हा चीन-अमेरिका संबंधांतील सर्वात धोकादायक भाग असल्याचे चीनकडून सातत्याने म्हटले जाते.

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here