अत्याधुनिक विमानचालन आणि लष्करी प्रगती दाखवून देणारा चीनचा सर्वात मोठा हवाई कार्यक्रम आज ग्वांगडोंग प्रांतातील झुहाई येथे सुरू होत आहे. 15 व्या चायना इंटरनॅशनल एव्हिएशन अँड एरोस्पेस एक्झिबिशनमध्ये – ज्याला एअरशो चायना असेही म्हणतात – जे-35ए स्टील्थ फायटर आणि एचक्यू-19 अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे पहिले दर्शन होणार आहे. देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगतीवर यामुळे प्रकाश टाकला जाईल.
पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या अवघ्या एका दिवसानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 2023 मध्ये चीनने कोविड 19 वरील कडक निर्बंध उठवल्यानंतरचा हा पहिलाच हवाई कार्यक्रम आहे. झुहाईमध्ये विमाने दाखल होत असल्याचे हवाई दल आणि राज्य वृत्तसंस्था शिन्हुआच्या फूटेजमुळे अपेक्षा वाढल्या आहेत.
सहा दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रगत लढाऊ विमाने, आक्रमकपणे हल्ला करणारे ड्रोन आणि इतर उच्च तंत्रज्ञानयुक्त लष्करी उपकरणांचा समावेश असेल. चीनच्या विस्तारीत विमानचालन क्षमतेबाबत एक व्यापक दृष्टीकोन यातून प्रतिबिंबित होईल.
जे-35ए स्टील्थ फायटर
झुहाई एअर शोमध्ये पदार्पण करत असल्यामुळे जे-35ए हे शोस्टॉपर होणार आहे. चिनी हवाई दलाने “मध्यम आकाराचे स्टील्थ बहुउद्देशीय लढाऊ विमान” म्हणून याचे वर्णन केले जाते. दोन जे-35ए सक्रिय स्टील्थ लढाऊ विमाने आपल्या दलात शामिल करणारा अमेरिकेव्यतिरिक्त चीन हा एकमेव देश आहे. जे-31 नंतर तयार करण्यात आलेल्या आणि अमेरिकन एफ-35शी साम्य असलेल्या जे-35एची रचना प्रामुख्याने एअरस्ट्रीप ऑपरेशनसाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे पीएलएची सामरिक लवचिकता आणि हवाई वर्चस्व वाढणार आहे. याशिवाय हाती आलेल्या काही वृत्तांनुसार जे-35 चा भविष्यातील प्रकार विमानवाहू जहाज तैनात करण्याच्या दृष्टीने तयार केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची परिचालन व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
एचक्यू-19 अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच प्रदर्शनात प्रदर्शित होणाऱ्या एचक्यू-19 हे अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण तंत्रज्ञानातील चीनच्या प्रगतीचे प्रतिनिधित्व करणारे आहे. पुढच्या पिढीतील जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हायपरसॉनिक ग्लाइड वाहने अडवण्यासाठी हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आली असून आधुनिक काळातील धोक्याच्या वातावरणाच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण क्षमता आहे. 8×8 चाकांच्या चेसिसवर बसवलेले प्रत्येक फिरते (mobile) एचक्यू-19 युनिट, एकात्मिक प्रक्षेपक नलिकांमध्ये ठेवलेल्या सहा अवरोधकांनी आणि अत्याधुनिक प्रतिकारक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे एचक्यू-19 पीएलएच्या इतर हवाई संरक्षण प्रणालींपासून वेगळे ठरते, कारण एचक्यू-9 आणि एचक्यू-22 यांची निर्मिती प्रामुख्याने विमानविरोधी भूमिकांसाठी करण्यात आली आहे.
एसएस-यूएव्ही हल्ला टेहळणी ड्रोन
“जिउ तियान” किंवा “हाय स्काय” असे टोपणनाव असलेले एसएस.-यूएव्ही हे 10 टन वजनाचे एक शक्तिशाली नवीन जेट-चालित मानवरहित हवाई वाहन असून ते लहान ड्रोन्सच्या गटाचे चलनवलन करण्यास सक्षम आहे. मोठ्या जोखमीच्या मोहिमांच्या दृष्टीने तयार केलेले एसएस -यूएव्ही बुद्धीमत्ता,गुप्तपणे पाळत ठेवणे आणि हेरगिरी करणे (आयएसआर) अशी कामे करू शकते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि गतिमान हल्ल्यांमध्ये सहभागी होऊ शकते. हे अमेरिकन ए-10 वॉर्थॉग आणि व्हिएतनाम-काळातील ओव्ही -10 ब्रॉन्कोसारखे दिसते. एसएस-यूएव्ही दक्षिण चीन समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारताच्या सीमेबरोबरच अनेक मोक्याच्या ठिकाणांजवळ आधीच तैनात करण्यात आले आहे, ज्यामुळे चीनच्या प्रादेशिक संरक्षण धोरणातील त्याची भूमिका अधोरेखित होते.
झेड-20 आर्म्ड हेलिकॉप्टर
झेड-20 आर्म्ड हेलिकॉप्टरद्वारे केला जाणारा हल्ला चीनच्या लष्करी मोहिमांना वर्धित अष्टपैलूत्व आणि फायरपॉवरची ताकद प्रदान करतो. प्रगत इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर आणि विविध शस्त्रास्त्रांसाठी बाह्य विंग माउंट्ससह सुसज्ज, हे सुधारित झेड-20 हल्ला, पाणबुडीविरोधी युद्ध, गस्त आणि हेरगिरी यासह विविध मोहिमांमध्ये मदत देऊ शकते. त्याच्या मुख्य डिझायनरच्या मते, भविष्यात यात केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे हेलिकॉप्टर हवेतच इंधन भरण्यास सक्षम होऊ शकते, ज्यामुळे त्याची श्रेणी आणि परिचालन क्षमता आणखी वाढेल.
जे-15टी वाहक-आधारित लढाऊ विमान
पीएलए नौदल झुहाई एअर शोमध्ये जे-15टी या 4.5 जनरेशन वाहक-आधारित लढाऊ विमानाचे अनावरण करणार आहे. या अद्ययावत प्रकारात प्रगत एईएसए (सक्रिय इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड ॲरे) रडार आणि अत्याधुनिक हवाई शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे चिनी नौदलाच्या विमानचालन क्षमतांमध्ये मोठी भर पडणार आहे. कॅटापल्ट-सहाय्यित टेकऑफसाठी तयार केलेली जे-15टी फुजियान या सागरी चाचण्या सुरू असलेल्या चीनच्या नवीन जहाजावर तैनात केले जाईल. जे-15टीने याआधी काही कामगिऱ्यांमध्ये भाग घेतला आहे, दक्षिण चीन समुद्रात सक्रिय असलेल्या लिओनिंग आणि शॅन्डॉंग या जहाजांवर नुकत्याच झालेल्या कवायतींमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे उच्च जोखमीच्या सागरी मोहिमांमध्ये त्याचा लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे.
जे-20 स्टील्थ फायटर
जे-20 हे चीनच्या प्रगत स्टील्थ लढाऊ जोडीपैकी एक फायटर प्लेन असून नव्याने सुरू झालेल्या जे-35 सोबत जोडले गेले आहे. सुरुवातीला कमी दर्जाचे मानले जाणारे हे पाचव्या पिढीतील हेवीवेट फायटर अमेरिकन एफ-22 ला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी म्हणून विकसित करण्यात आले आहे. तैवानच्या हवाई हद्दीत याच फायटरने प्रवेश केला होता मात्र त्याचा थांगपत्ता तैवानला लावता आला नाही अशा बातम्या आल्या होत्या. जे-20 चे आता मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. अमेरिका यापुढे एफ-22 ची निर्मिती करणार नसल्यामुळे एकप्रकारे त्याला युद्धात मोठा फायदा होणार आहे. जे-20 ची रचना प्रामुख्याने हवाई श्रेष्ठतेसाठी करण्यात आली आहे, तर अधिक अष्टपैलू जे-35ए हे हवाई श्रेष्ठता, जमिनीवरील हल्ले आणि सागरी मोहिमांसह अनेक मोहिमा पार पाडू शकते, ज्यामुळे चीनच्या गुप्त लढाऊ विमानांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोहिमांसाठी व्यापक लवचिकता मिळते.
एसयू-57 स्टील्थ फायटर
रशियाचे सर्वात प्रगत लढाऊ विमान, एसयू-57, झुहाई येथे होणाऱ्या त्याच्या पहिल्या परदेशी हवाई प्रदर्शनासाठी सज्ज आहे. पाश्चिमात्य देशांबरोबर वाढत्या तणावाच्या दरम्यान चीन-रशियाच्या वाढत्या संरक्षण सहकार्यातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एसयू-57 मध्ये अत्याधुनिक थ्रस्ट वेक्टरिंग नियंत्रण आहे, ज्यामुळे त्याला अतुलनीय कुशलता प्राप्त होते आणि त्याचे लढाऊ अष्टपैलुत्व वाढते. एसयू-57 व्यतिरिक्त, रशियन नाईट्स एरोबेटिक टीम एसयू-35 एस आणि एसयू-30 एसएम विमानांसह या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे, जे आठ वर्षांत त्यांचे पहिले हवाई प्रदर्शन असेल. हे प्रदर्शन रशियाची प्रगत हवाई क्षमता तसेच मॉस्को आणि बीजिंग यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत करणे या दोन्हींवर प्रकाश टाकते.
जे-16डी इलेक्ट्रॉनिक लढाऊ विमान
2021 मध्ये सादर करण्यात आलेले जे-16डी हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक लढाऊ विमान आहे, ज्याची रचना युद्धात चीनचे विद्युतचुंबकीय वर्चस्व वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. अनेक प्रगत जामिंग पॉड्ससह सुसज्ज, जे-16डी शत्रूच्या दळणवळण, रडार आणि क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये व्यत्यय आणण्यासाठी अनुकूल आहे. विशेषतः तैवान सामुद्रधुनीसारख्या धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांमध्ये हवाई श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी ते जे-20, जे-16 आणि जे-10सी सारख्या इतर लढाऊ विमानांशी समन्वय साधून काम करते. हे अत्यंत सक्षम लढाऊ विमान इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर वर्चस्व गाजवण्याची आणि आधुनिक हवाई युद्धात आघाडी मिळवण्याची चीनची क्षमता वाढवते.
इतर ठळक वैशिष्ट्ये
सातत्याने ठळक बातम्यांचा विषय झालेल्या लढाऊ विमाने आणि ड्रोन व्यतिरिक्त, या शोमध्ये पहिल्यांदाच वाय-20 या अवजड वाहतूक विमानाच्या मालवाहतुकीची विशेष झलक पाहायला मिळेल. वाय-20 सोबतच, आय. एल.-76 अवजड वाहतूक विमान आणि वाय. वाय.-20ए हवाई टँकर हवाई प्रदर्शनासाठी आकाशात घेऊन जातील. याशिवाय ते प्रदर्शनातही प्रदर्शित केले जातील.
प्रदर्शनातील इतर प्रमुख विमानांमध्ये एच-6के बॉम्बफेक विमान आणि केजे-500ए विमान यांचा समावेश आहे. लष्करी यंत्रसामग्रीच्या पलीकडे, मानवरहित प्रणाली, शस्त्रास्त्र तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांमध्ये चीनचे वाढते कौशल्य या हवाई प्रदर्शनात दाखवले जाईल. याव्यतिरिक्त, सरकारी मालकीचे विमान उत्पादक सीओएमएसी चीनच्या व्यावसायिक विमानचालन महत्त्वाकांक्षांचे प्रमुखपणे प्रतिनिधित्व करेल आणि जागतिक एरोस्पेस बाजारपेठेतील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकेल.
टीम भारतशक्ती