चीन सरकारशी संबंधित ऑनलाइन वापरकर्ते अमेरिका आणि इतर ठिकाणी मतदारांना लक्ष्य करण्यासाठी एआयचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) अधिकाधिक फायदा घेत चुकीची माहिती पसरवत असल्याचा अहवाल मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी प्रकाशित केला. या अहवालात असे म्हटले आहे की, देशांतर्गत फूट पाडणारे राजकीय मुद्दे कोणते ते ओळखून निवडणुकांवर संभाव्य प्रभाव पाडण्यासाठी चीनच्या अशा मोहिमांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांद्वारे खोटी माहिती पसरवली आहे.
मायक्रोसॉफ्टच्या अहवालात असेही म्हटले आहे की, जनरेटिव्ह एआय साधनांच्या वापराचा थेट संबंध परदेशी मतदारांविरुद्ध गुप्तपणे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रभाव मोहिमेशी जोडला गेला आहे. ही साधने पूर्वीपेक्षा अधिक प्रगत पद्धती कोणत्या त्यांचीही माहिती पुरवतात.
एआयचा वापर हा केवळ अमेरिकेच्या निवडणुकांपुरता मर्यादित नसून, दक्षिण कोरिया आणि भारतात होणाऱ्या यंदाच्या निवडणुकांमध्येही त्याच्या मदतीने चीन व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू शकेल असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे.
“भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतील जनता मतदानासाठी सज्ज होत असताना, चीन सरकार सायबर आणि इन्फ्युएन्झर्स यांची मदत घेण्याची शक्यता आहे. याशिवाय काही प्रमाणात उत्तर कोरियातील सायबर इन्फ्युएन्झर्स या निवडणुकांना लक्ष्य करण्याच्या दृष्टीने कार्यरत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. खरेतर याआधी एआय-निर्मित सामग्रीचा प्रभाव अतिशय किरकोळ स्वरूपाचा होता, पण आता त्यात बदल होऊ शकतो असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, “प्रेक्षकांना प्रभावित करण्यासाठी अशा सामग्रीचा फारसा उपयोग होत नसला तरी, मिम्स, व्हिडिओ आणि ऑडिओ यांचे प्रमाण वाढवण्यासाठी चीनचे या क्षेत्रात नवनवीन प्रयोग सुरूच राहील-आणि पुढे प्रभावीही ठरू शकतील.”
चीनने याआधी एआयच्या मदतीने तैवानच्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचे प्रयत्न केले आहेत. बीजिंग समर्थित स्टॉर्म 1376 नावाचा ग्रुप, ज्याला स्पॅमॉफ्लेज किंवा ड्रॅगनब्रिज असेही म्हणतात, तैवानच्या निवडणुकीदरम्यान अत्यंत सक्रिय होता. या ग्रुपने निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये निवडणूक उमेदवार टेरी गौ यांची एक बनावट ऑडिओ क्लिप यूट्यूबवर पोस्ट करण्यात आली होती. टेरी गौ यांनी नोव्हेंबरमध्येच आपली उमेदवारी मागे घेतली होती. ते दुसऱ्या उमेदवाराचे समर्थन करत असल्याची ती ऑडिओ क्लिप होती. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की ही क्लिप “बहुधा एआयच्या मदतीने तयार केलेली” होती.
मायक्रोसॉफ्टच्या अहवालात असेही म्हटले आहे की, चिनी गट अमेरिकेत विविध प्रकारांनी आपल्या प्रभाव मोहिमा सुरू ठेवत आहेत. अमेरिकन मतदारांमध्ये फूट पाडणारे मुद्दे कोणते असू शकतात हे लक्षात यावे म्हणून ‘ फुटीरतावादी प्रश्न’ विचारण्यासाठी बीजिंग समर्थित इन्फ्युएन्झर्स सोशल मीडियावरील खात्यांचा वापर करत आहेत. मायक्रोसॉफ्टने अहवालासोबत लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मतदानाच्या प्रमुख लोकसंख्येविषयी (मतदारांविषयी) अचूक आणि अतिशय सखोल माहिती गोळा करण्यासाठी हे प्रकार केले जाऊ शकतात.”
अश्विन अहमद