जगभरात गेल्या काही वर्षांत टेलिकॉम कंपन्यांमधील मेडाटेडा हॅक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच चीनच्या एका हॅकरने अमेरिकन टेलिकॉम कंपनीचा मेटाडेटा हॅक केल्याची घटना समोर आली आहे. एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार, ‘सॉल्ट टायफून’ नावाच्या चिनी हॅकिंग गटाने राबवलेल्या एका सायबर हॅक मोहिमेमध्ये अमेरिकेतील नागरिकांचा मेटाडेटा मोठ्या प्रमाणावर चोरीला गेला आहे.
चोरीला गेलेल्या डेट्याची नेमकी आकडेवारी देण्यास सदर अधिकाऱ्याने नकार दिला असला तरी अमेरिकेच्या दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये चीनद्वारे होणाऱ्या हॅकिंग अटॅक्सचं प्रमाण वाढत असल्याची चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सदर प्रकरणाविषयी बोलताना ते अधिकारी म्हणाले की, ‘सॉल्ट टायफून’ नावाच्या चिनी हॅकिंग ग्रुपने मोठ्या संख्येने अमेरिकन मेटाडेटा हॅकिंग प्रणालीद्वारे चोरला असून, त्यामध्ये प्रत्येक अमेरिकन सेल फोनचा रेकॉर्ड डेटा समाविष्ट असू शकतो. या हॅकिंग समूहाविषयी आणि त्यांच्या एक्टिव्हिटीज विषयी चीन सरकारला ठाऊक असून, सरकारचा त्यांना यामध्ये पाठिंबा देखील असू शकतो अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली.
दूरसंचार कंपन्यांना मोठा फटका
या हॅकिंग प्रकरणात युनायटेड स्टेट्समधील किमान आठ दूरसंचार (Telecom) कंपन्यांचा टेलिकॉम डेटा चोरीला गेला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच अमेरिकन कंपन्यांव्यतिरिक्त जगभरातील अन्य १० ते १२ टेलिकॉम कंपन्यांना या हॅकिंगमुळे खूप मोठा फटका बसला असल्याचे वृत्त समोर आले आहेत.
अमेरिकन सुरक्षा अधिकारी आणि एजन्सीजनी यापूर्वी देखील हॅंकिंगविरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. रिपोर्टनुसार, आजवर या हॅकर्सनी Verizon, AT&T, T-Mobile, Lumen आणि अशा अनेक टेलिकॉम कंपन्याना आपले लक्ष्य केले आहे. T-Mobile कंपनीच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, हॅकिंगमुळे त्यांना यापूर्वी हॅकिंगचा त्रास सहन करावा लागला आहे. तर Lumen च्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित असून त्यामध्ये हॅकिंगचा प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र इतर काही प्रकरणांमध्ये या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात टेलिफोन ऑडिओ इंटरसेप्ट चोरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
कॉल डेटा हॅकिंगचे दुष्परिणाम
कुठल्याही युजरचा कॉल रेकॉर्ड मेटाडेटा हा त्या युजरने कधी, कोणाला, किती वेळ, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणावरुन फोन कॉल केला याची प्राथमिक माहिती पुरवतो. यात कॉलची सामग्री समाविष्ट नसते. मात्र हा कॉल रेकॉर्ड मेटाडेटा हॅक झाल्यास ही सगळी गोपनीय माहिती तसेच कॉलवर नेमके काय बोलणे झाले हे सगळे हॅक करणाऱ्या व्यक्तीला कळू शकते. यामुळे कॉलरचा तसेच समोरच्या व्यक्तीची खासगी किंवा व्यावसायिक माहिती आणि गोपनियता धोक्यात येण्याची शक्यता असते.
सॉल्ट टायफूनचा सातत्याने मागोवा
हॅकिंग प्रकरणी बोलताना संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने सॉल्ट टायफून हॅकर्सचा सातत्याने मागोवा घेण्यावर आणि त्यांचा सामना करण्यावर नेहमीच प्राधान्य दिले आहे.
एफबीआय, नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक एव्हरिल हेन्स, फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या अध्यक्ष जेसिका रोसेनवर्सल, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल आणि सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी हे बंद-दरवाजा ब्रीफिंगमध्ये सहभागी होते, असे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलाताना स्पष्ट केले.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे