दोन वर्षांपूर्वी चीनने लष्करी संबंध संपुष्टात आणल्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मीने दक्षिण चीन समुद्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या आपल्या कमांडरला प्रथमच अमेरिकेला पाठवले आहे. पी. एल. ए. सदर्न थिएटर कमांडचे प्रमुख जनरल वू यानान यांनी अमेरिकेच्या निमंत्रणावरून 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान हवाई येथे झालेल्या इंडो-पॅसिफिक चीफ ऑफ डिफेन्स कॉन्फरन्सदरम्यान यूएस इंडो-पॅसिफिक कमांडर ॲडमिरल सॅम्युअल पापारो आणि इतर देशांसह फिलीपिन्सच्या प्रतिनिधींची भेट घेतल्याच्या बातमीला चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. थायलंड, सिंगापूर, फिलीपिन्स, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका झाल्या आणि त्यांनी त्या त्या देशांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कमांडर पातळीवर झालेल्या व्हिडिओ कॉलनंतर, दळणवळणाचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र दोन्ही बाजूच्या सैन्याने पुन्हा संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्याच्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी समान चिंतेच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि सखोल विचारांची देवाणघेवाण केली आणि चिनी मंत्रालयाने सोमवारी सांगितल्याप्रमाणे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी केलेल्या सहमतीची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केले. यू. एस. इंडो-पॅसिफिक कमांडने सांगितले की पापारो यांनी गैरसमज किंवा चुकीच्या अंदाजांमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी अमेरिकन सैन्य आणि पीएलए यांच्यातील अखंड संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
गेल्या वर्षी फिजी येथे झालेल्या परिषदेत चीनचे प्रतिनिधित्व केंद्रीय लष्करी आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागातील उप-प्रमुख जनरल शू किलिंग यांनी केले होते.
अभ्यासकांच्या मते या निर्णयामुळे दक्षिण चीन समुद्रातील तणावाच्या काळात अमेरिका किंवा फिलीपिन्सशी चीनचा होऊ शकणाऱ्या संघर्षाचा धोका कमी होण्यास मदत होईल. ऑगस्ट 2022 मध्ये नॅन्सी पेलोसी अमेरिकन सभागृहाच्या अध्यक्षा असताना तैवान भेटीवर आल्या होत्या. त्यावेळी त्याचा निषेध म्हणून बीजिंगने थिएटर कमांड पातळीवरील काही महत्त्वाच्या लष्करी संभाषण वाहिन्या बंद केल्या होत्या. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, चिनी कमांडरने अमेरिकेचा द्विपक्षीय दौरा केलेला नसला तरी, परिषदेतील त्यांची उपस्थिती दोन्ही पक्षांनी त्यांचा समजूतदारपणा अधिक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरली.
चीन आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पीएलए आणि पेंटागॉन यांच्यातील संवाद पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवल्यानंतर, संबंधांमधील तणाव कमी करण्यासाठी इतर करारांसह, जगातील दोन सर्वात मोठ्या सैन्यांनी बातचीत सुरू केली आहे.
टीम भारतशक्ती