चिनी शास्त्रज्ञांनी चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांग प्रदेशातील वाळवंटात आढळणाऱ्या मॉसची एक अतिशय लवचिक प्रजाती ओळख पटवली आहे. मंगळावर संभाव्य वसाहती टिकवून ठेवण्यास ही प्रजाती मदत करू शकते, असे चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अभ्यासातून दिसून आले आहे.
मंगळावरील वातावरणाचे अनुकरण करणाऱ्या परिस्थितीत हे मॉस – सिंट्रिचिया कॅनिनेर्व्हिस – अत्यंत कोरडेपणा, अति-कमी तापमान आणि किरणोत्सर्गाचा सामना करण्यास सक्षम असल्याचे आढळले, असे अकादमीने गेल्या आठवड्यात द इनोव्हेशन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे.
1 जुलै रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे की, “ऑक्सिजनचे उत्पादन, कार्बन पृथक्करण आणि मातीची सुपीकता या घटकांसाठी योगदान देऊन परिसंस्थेची (ecosystem) निर्मिती आणि देखभाल याचा आधार म्हणून हे मॉस काम करू शकते.”
“(हे) इतर उच्च वनस्पती आणि प्राण्यांसाठी आवश्यक असलेल्या वातावरणीय, भूगर्भीय आणि पर्यावरणीय प्रक्रियांना चालना देण्यास मदत करू शकते आणि मानवी वस्तीसाठी दीर्घकालीन अनुकूल, नवीन, राहण्यायोग्य वातावरण तयार करण्यास मदत करू शकते,” असे या पेपरमध्ये म्हटले आहे.
संशोधनात, चिनी शास्त्रज्ञांना असे आढळले की मॉसमधील सेल्युलर पाण्याची पातळी 98 टक्क्यांपेक्षा जास्त खालावल्यानंतरही, मॉस हायड्रेटेड झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात प्रकाशसंश्लेषक (photosynthetic) आणि शारीरिक क्रियाकलाप पुनर्प्राप्त करू शकले.
एकसंध असताना, वनस्पती अति-कमी तापमान देखील सहन करू शकते आणि पाच वर्षांसाठी उणे 80 अंश सेल्सिअस (उणे 112 फॅरेनहाइट) तापमानात फ्रीजरमध्ये किंवा एका महिन्यासाठी द्रव नायट्रोजनमध्ये साठवल्यानंतर पुनरुत्पादित करता येऊ शकते.
शिंजियांग, तिबेट, कॅलिफोर्नियाचे वाळवंट, मध्य पूर्व आणि ध्रुवीय प्रदेशात हे शेवाळ आढळते.
अंतराळ क्षेत्रात दमदार पाऊल ठेवण्याच्या चढाओढीने अलिकडच्या वर्षांत चीन आणि अमेरिकेला अशा शोध मोहिमा सुरू करण्यास प्रेरित केले आहे.
चिनी मोहिमांमध्ये पुढील वर्षी पृथ्वीजवळील लघुग्रह प्रोब तियानवेन-2 आणि मंगळावरून नमुने परत आणण्यासाठी 2030 च्या सुमारास तियानवेन-3 प्रक्षेपित करणे समाविष्ट आहे. चीनने गेल्या महिन्यात चंद्राच्या दूरवरच्या भागातून नमुने मिळवले.
हा लाल ग्रह मानवांना राहण्यायोग्य आहे की नाही याची उत्तरे शोधण्यासाठी अमेरिकेत नासाने मंगळासाठी 20 वर्षांची योजना तयार केली आहे.
सूर्या गंगाधरन