चीनमार्गे पाकिस्तानला जाणारे एक व्यापारी जहाज मुंबईतील सुरक्षा यंत्रणांनी काल रोखले, कारण यात असणारी सामग्री देशाच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम अशा दुहेरी वापरासाठी वापरली जाऊ शकते, असे पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 23 जानेवारी रोजी पाकिस्तानातील कराचीला जाणाऱ्या माल्टा देशाचा झेंडा असलेले व्यापारी जहाज सी.एम.ए.सी.जी.एम अटिला रोखले. या जहाजावर मिळालेल्या मालामध्ये इटालियन कंपनीकडून तयार केलेल्या कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल मशीनचा (सी.एन.सी) समावेश होता.
ही मशीन्स मुळात कॉम्प्युटरद्वारे नियंत्रित केली जातात. यामुळे कार्यक्षमता, सातत्य आणि अचूकतेची पातळी प्राप्त करता येते, जे हाताने करणे शक्य नसते.
संरक्षण संशोधन आणि संस्थेच्या (डी.आर.डी.ओ) अधिकाऱ्यांनी या मालाची तपासणी केली आणि हे यंत्र क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी वापरले जाऊ शकते, यावर शिक्कामोर्तब केल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे.
बंदर अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सतर्क केले. त्या आधारावर त्यांनी या मालवाहतुकीच्या जहाजाची तपासणी केली आणि माल संशयास्पद असल्याचे सांगितले.
शंघाई जे.एक्स.ई ग्लोबल लॉजिस्टिक्स कंपनी लिमिटेड आणि सियालकोटची पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड असा माल पाठवणाऱ्यांचा उल्लेख आहे.
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या पुढील तपासात, 22 हजार 180 किलोग्रॅम वजनाची ही सामग्री तैयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेडने पाकिस्तानातील कॉसमॉस इंजिनिअरिंगच्या नावाने पाठवल्याचे, पीटीआयने म्हटले आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी इटालियन निर्मित थर्मोइलेक्ट्रिक उपकरणांच्या शिपमेंटला आता जरी रोखले असले तरी, कॉसमॉस इंजिनिअरिंग या पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कंपनीवर मार्च 2022 पासूनच लक्ष आहे
गेल्या काही वर्षांमध्ये, पाकिस्तानच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना चीनकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल चिंता वाढत आहे. 2020 मध्ये, एक चीनी जहाज पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र उत्पादनासाठी घटक घेऊन जात होते, जे औद्योगिक ड्रायरच्या नावाने लपवून ठेवण्यात आले होते. या वस्तूंचे संशयित पाकिस्तानी प्राप्तकर्ते पाकिस्तानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेशी संबंधित आहेत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न आहे.
पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या जनरल टेक्नॉलॉजी लिमिटेड (पाकिस्तानचा ऑटोक्लेव्ह पुरवठादार), बीजिंग लुओ लुओ टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आणि चांगझोउ उटेक कंपोझिट कंपनी अशा तीन कंपन्यांवर अमेरिकेने जून 2023मध्ये बंदी घातली.
(अनुवाद : आराधना जोशी)