दि. ०१ जून: भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल हर्ष छीब्बर यांची सिकंदराबाद येथील ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’च्या (सीडीएम) समादेशकपदी (कमांडंट) नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे मावळते समादेशक रिअर ॲडमिरल संजय दत्त यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले मेजर जनरल छीब्बर यांनी १९८८मध्ये लष्कराच्या ‘आर्मी सर्व्हिस कोअर’मध्ये कमिशन मिळाले होते.
Maj Gen Harsh Chhibber takes command at the College of Defence Management, Secunderabad, succeeding Rear Admiral Sanjay Datt. #Leadership #Defence #CDMSecunderabad
Read more: https://t.co/uvuGeOD7t4@rajnathsingh @giridhararamane @HQ_IDS_India @adgpi @indiannavy @IAF_MCC pic.twitter.com/g8NbI5KFi1— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) June 1, 2024
मेजर जनरल छीब्ब्बर यांनी सार्वजनिक धोरण या विषयात पीएचडी प्राप्त केली असून, व्यवसाय व्यवस्थापन आणि नागरी प्रशासन या दोन विषयांत त्यांनी एमफिलची पदवी घेतली आहे. त्याचबरोबर त्यांनी टेक्निकल स्टाफ ऑफिसर कोर्स, हायर डिफेन्स मॅनेजमेंट कोर्स, ॲडव्हान्सड प्रोफेशनल प्रोग्रॅम इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत. त्यांनी लष्कराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यात पॅरा एएससी कंपनी, एएससी बटालियन, एएससी प्रशिक्षण केंद्र, पूर्व विभागात ब्रिगेडीअर जनरल स्टाफ (माहिती यंत्रणा), उत्तर विभागात मेजर जनरल (ऑपरेशनल लॉजिस्टिक) आदी पदे भूषविली आहेत. त्यांनी आर्मी कोअर सेंटर अँड कॉलेज येथे प्रशिक्षक म्हणूनही काम पहिले आहे.
लष्करी सेवेतील कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने १९७० मध्ये ‘कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट’ची स्थापना करण्यात आली होती. सशस्त्रदलांच्या तिन्ही अंगातील अधिकाऱ्यांना या संस्थेत व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. हे कॉलेज संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. लष्करी सेवांतील अधिकाऱ्यांना व्यवस्थापनाचे शिक्षण देणारे हे आशियातील एकमेव कॉलेज आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)