युक्रेनमध्ये नोकऱ्यांसाठी आता महिलांना जास्त पसंती

0
युक्रेनमध्ये
चालक लिलिया शुल्हा 13 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनच्या कीव प्रदेशातील ट्रेबुखिव गावात  रशियाकडून होणाऱ्या हल्ल्याच्यावेळी लॉजिस्टिक कंपनीच्या आवारात तिचा ट्रक चालवतानाचा फोटो. (रॉयटर्स)

युक्रेनमध्ये रशियाबरोबरच्या युद्धामुळे कामगारांची भयंकर टंचाई निर्माण झाल्यामुळे कंपन्यांनी आता महिलांना नोकरी देण्याचा पर्याय निवडला आहे.
अनेक युक्रेनियन कंपन्यांमध्ये बैठ्या स्वरूपाची नोकरी केल्यानंतर, लिलिया शुल्हा हिला ट्रक ड्रायव्हर म्हणून तिच्या स्वप्नातील नोकरी मिळाली. युक्रेनच्या आघाडीच्या रिटेलर फॉझी ग्रुपमध्ये काम करणाऱ्या लिलिया म्हणाल्या, “मी नेहमीच मोठ्या गाड्या चालवण्याचे स्वप्न पाहिले आहे.”
“सध्या परिस्थिती अशी आहे की ते लोकांना अनुभवाशिवाय नोकरीवर ठेवतात आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देतात. मी भाग्यवान आहे,” असे 40 वर्षीय शुल्हा म्हणाल्या.
रशियाबरोबरच्या युद्धामुळे कामगार वर्गाची सर्वच क्षेत्रात गंभीर स्वरूपाची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न युक्रेनच्या कंपन्या करीत आहेत.
युक्रेनमधील कंपन्यांनी पारंपरिक पुरुषप्रधान नोकऱ्यांसाठी अधिकाधिक महिलांना कामावर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय किशोरवयीन, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीवर ठेवले जात आहे.
लाखो नागरिक, मुख्यतः महिला आणि मुले, युद्धातून पळून  परदेशात आश्रयाला गेले आहेत तर हजारो पुरुष सैन्यात भरती झाले आहेत, त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी उद्भवलेल्या कामगार टंचाईमुळे आर्थिक विकास धोक्यात येऊ शकतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनने आपले एक चतुर्थांश कामगार गमावले असल्याचे केंद्रीय बँकेच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
तर अर्थव्यवस्था मंत्रालयाकडून 3 हजार कंपन्यांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे 60 टक्के व्यवसायिकांनी सांगितले की कुशल कामगार शोधणे हे आता त्यांचे मुख्य आव्हान बनले  आहे.
मेटिनव्हेस्ट या पोलाद कंपनीच्या मुख्य अधिकारी टेटियाना पेट्रुक म्हणाल्या, “परिस्थिती खरोखरच गंभीर आहे.” युक्रेनच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक कंपनी  असून तिथे सुमारे 45 हजार कर्मचारी काम करतात. सध्या इथे सुमारे 4 हजार पदे रिकामी आहेत.
“आम्हाला भेडसावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा आमच्या प्रोडक्शनवर परिणाम होतो,” असे पेट्रुकने एका ऑनलाइन मुलाखतीत रॉयटर्सला सांगितले. “कर्मचाऱ्यांच्या टंचाईचा सामना करणारे आम्हीच एकटे नाही, आमच्या कंत्राटदारांसह या प्रदेशातील सर्व कंपन्यांसमोरचे ते एक मोठे आव्हान आहे.”
रॉयटर्सने मोठ्या औद्योगिक कंपन्यांपासून ते किरकोळ गट आणि लहान खाजगी उद्योजकांपर्यंत नऊ युक्रेनियन कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कौशल्यांची वाढती विसंगती ही त्यांची सध्याची मोठी आव्हाने असल्याचे या सर्वांनी सांगितले.
व्यावसायिकांनी सांगितले की भरती प्रक्रिया आणि व्यवसाय पद्धती यात मोठा बदल झाला आहे. कर्मचाऱ्यांची जागा आता यंत्रांनी घेतली आहे, विद्यमान कर्मचाऱ्यांना आळीपाळीने विविध कामे करावी लागत आहेत, त्यामुळे त्यांच्या नोकरीचे स्वरूपच बदलत चालले आहे.
याव्यतिरिक्त, सेवानिवृत्त झालेल्यांना पुन्हा कामावर घेतले जात आहे आणि विशेषतः तरुण कामगारांना अधिक लाभ देण्यात येत आहेत.
त्यांचे पगारही वाढवावे लागले आहेत. सरासरी मासिक वेतन आता सुमारे 20 हजार रिव्निया (470 अमेरिकन डॉलर) आहे, जे एका वर्षापूर्वी सुमारे 14 हजार 500 रिव्निया होते.
कीव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने म्हटले आहे की, “नोकरीसाठी उमेदवारांच्या निवडीमध्ये लिंग आणि वयाच्या अटींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.”
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगांवर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा अधिक परिणाम होत असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
बांधकाम क्षेत्र, वाहतूक, खाणकाम आणि इतर सर्वच क्षेत्रांना लष्करी भरतीमुळे त्रास सहन करावा लागला आहे. कारण 25 ते 60 वर्षे वयाचे पुरुष लष्करासाठी पात्र आहेत.
अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी, सरकार महत्त्वाच्या कंपन्यांना कामगार कपातीमधून पूर्णपणे किंवा अंशतः स्थगिती देते. ऊर्जा आणि शस्त्रे उत्पादन क्षेत्रातील 100% कर्मचाऱ्यांना लष्करात भरती होण्यापासून सवलत देण्यात आली आहे.  मात्र ही सवलत मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे. इतर काही क्षेत्रांमध्ये, कंपन्या 50 टक्के पुरुष कर्मचारी ठेवू शकतात.
मायकोलायिव्हच्या दक्षिणेकडील शेतीविषयक कंपन्यांकडून आता महिलांना ट्रॅक्टर चालक म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे.
महिला ट्राम तसेच ट्रक चालक, कोळसा खाण कामगार, सुरक्षा रक्षक आणि गोदाम कामगार म्हणूनही काम करत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
फॉझी समूहाचा भाग असलेल्या सिल्पो येथील मनुष्यबळ विभागाचे संचालक ल्युबोव्ह युक्रेनेट्स म्हणाले, “आम्ही कमीतकमी अनुभव असलेल्या महिलांना प्रशिक्षण आणि नोकऱ्या देऊ करत आहोत.” कंपनीमध्ये शुल्हासह सध्या सहा महिला ट्रक चालक आहेत.
पूर्वी पुरुषांचे वर्चस्व असलेल्या लोडर, मीट स्प्लिटर्स, पॅकर्स आणि सुरक्षा रक्षकांसह इतर नोकऱ्यांसाठी आता सक्रियपणे महिलांची भरती करण्यात येत आहे.
पोलाद उत्पादनासारख्या उद्योगांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढत आहे. पेट्रुक म्हणाले की, मेटिनव्हेस्टच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 30 ते 35 टक्के महिला कर्मचारी आहेत आणि कंपनीने आता काही भूमिगत कामांसाठी (खाण कामासाठी) महिलांची नियुक्त केले आहे. मेटिनव्हेस्ट युद्धापूर्वीची तुलनात्मक आकडेवारी मात्र देऊ शकले नाही.
इतर काही महिला बालसंगोपनाच्या जबाबदारीमुळे कामावर रुजू होण्यास असमर्थ आहेत किंवा फारशा इच्छुक नाहीत.
वाहन चालक म्हणून रस्त्यावर सलग 15 दिवस काम करणारी शुल्हा तिच्या 14 वर्षांच्या मुलाची आणि 16 वर्षांच्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिच्या पालकांसोबत परत आली आहे.
बाजारातील कामगार टंचाईशी संबंधित आव्हाने यानंतरही कायम राहतील असा व्यवसाय आणि अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आवश्यक प्रशिक्षण देऊ करणे, नोकरीच्या अनुभवाबाबतची तडजोड आणि मोठ्या पगारची पॅकेज देऊन कंपन्या आता तरुण वर्गाकडे लक्ष केंद्रित करत आहेत.
पूर्वी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणारी मेटिनव्हेस्टने आता व्यावसायिक महाविद्यालयांकडे आपले लक्ष वळवले आहे, असे पेट्रुक म्हणाले. सुपरमार्केटमधील एन्ट्री लेव्हलवरील नोकऱ्यांसाठी सिल्पो अधिक सक्रियपणे किशोरवयीन मुलांची भरती करत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक विशेष इंटर्नशिप कार्यक्रमही सुरू केला आहे.
मोबाईल फोन ऑपरेटर कंपनी व्होडाफोनने आपला युवा कार्यक्रम पुन्हा तयार केला, ज्यामुळे 12 शहरांमधील सुमारे 50 किशोरवयीन मुलांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. याशिवाय सरकार आणि परदेशी भागीदारांनी युक्रेनियन नागरिकांना पुन्हा कौशल्य प्राप्त करण्याच्या हेतूने मदत करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleSpaceX-Polaris Crew Set To Undertake First Private Spacewalk
Next articleDRDO, Indian Navy Successfully Flight Test Short Range Surface-To-Air Missile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here