संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे आगामी एरो 2023 या हवाई प्रदर्शनाच्या संदर्भात विविध देशांच्या राजदूतांची गोलमेज परिषद 09 जानेवारी 2023 रोजी पार पडली. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण सामग्री उत्पादन विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला 80 हून अधिक देशांचे राजदूत, उच्चायुक्त, राजदूत अथवा मंत्र्यांचे प्रतिनिधी, संरक्षण विभागाचे परदेशांत कार्यरत प्रतिनिधी उपस्थित होते. 13 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कर्नाटकातील बंगळुरू येथे भरणाऱ्या एरो इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या आणि 14व्या हवाई प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी जगभरातील देशांच्या प्रतिनिधींना निमंत्रण दिले आहे. या जागतिक पातळीवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या देशांनी त्यांच्या संरक्षण तसेच हवाई क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती सिंह यांनी केली आहे.
एरो इंडिया हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा हवाई क्षेत्रविषयक व्यापार मेळावा असून त्यात एरोस्पेस उद्योगासह भारतीय हवाई संरक्षण क्षेत्रातील सर्व उद्योगांना त्यांची उत्पादने, तंत्रज्ञान आणि समस्येवरील उपाय राष्ट्रीय निर्णयकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याची संधी देते, असे सिंह यांनी यावेळी सांगितले.
आगामी एरो शोमध्ये प्रदर्शक आणि आमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांच्या प्रतिनिधींची मोठी उपस्थिती मागील प्रदर्शनात सेट झालेल्या बेंचमार्कला मागे टाकेल, अशी आशा परदेशी प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी व्यक्त केली. ‘भागीदारी’ आणि ‘संयुक्त प्रयत्न’ हे भारताच्या इतर देशांशी असलेल्या संरक्षण सामग्री उद्योगातील भागीदारीला विशेष रूप देणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संरक्षण क्षेत्रातील सामग्रीच्या उत्पादनासाठी मजबूत परिसंस्था (इकोसिस्टीम) उभारण्यात आली असून त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षणविषयक सामग्रीतील आघाडीचा निर्यातदार देश म्हणून भारताचा उदय होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या प्रमाणात आठपट वाढ झाली आहे आणि आता भारत जगातील 75हून अधिक देशांना ही सामग्री निर्यात करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तसेच नव्याने उदयाला येणाऱ्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण सामग्रीनिर्मिती क्षेत्र सज्ज आहे, यावर त्यांनी भर दिला. भारताने स्वदेशी हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाची निर्मिती केली असून हलक्या वजनाच्या बहुपयोगी हेलिकॉप्टर्सच्या उत्पादनाला देखील सुरुवात केली आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड आणि एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस, स्पेन यांच्या एकत्रित सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी C-295 विमाने तयार करण्यासाठी भारताने केलेल्या कराराचा दाखला देत ते म्हणाले, जागतिक संरक्षण उद्योगातील दिग्गजांशी भागीदारी केली जात आहे.
केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’च्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न म्हणजे जगापासून विभक्त राहाणे किंवा केवळ भारतासाठी प्रयत्न असे नाही, तर ‘भागीदारी’ आणि ‘संयुक्त प्रयत्न’ हे भारताच्या इतर देशांशी असलेल्या संरक्षण सामग्री उद्योगातील भागीदारीला विशेष रूप देणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, असे ते म्हणाले.
जेव्हा आमच्या भागीदार राष्ट्रांकडून संरक्षण उपकरणे खरेदी करत असतो, तेव्हा ते उपकरणांबरोबरच त्याचे तांत्रिक ज्ञानही सामायिक करत असतात. भारतात उत्पादन प्रकल्प उभारत असतात आणि आमच्या स्थानिक कंपन्यांसोबत विविध उपप्रणालींसाठी काम करत असतात आणि जेव्हा आम्ही आमची संरक्षण उपकरणे आमच्या मित्रराष्ट्रांना निर्यात करत असतो, तेव्हा आम्ही तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि सह-उत्पादनाच्या देवाणघेवाणीद्वारे खरेदीदाराच्या क्षमता विकासासाठी आमचा पूर्ण पाठिंबा देतो, हे सिंह यांनी नमूद केले.
आम्ही असे सहजीवी संबंध निर्माण करू इच्छितो, जिथे आपल्याला एकमेकांकडून शिकता येईल, एकत्र वाढता येईल आणि सर्वांसाठी फक्त विजय अशी परिस्थिती निर्माण करता येईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले. जी 20च्या मिळालेल्या यजमानपदाचा उपयोग करून आम्ही भारताचे तीन डी – डेव्हलपमेंट (विकास), डेमॉक्रॉसी (लोकशाही) आणि डायव्हर्सिटी (विविधता) – जगासमोर मांडणार असल्याची कल्पनाही त्यांनी बोलून दाखवली.
(अनुवाद : आराधना जोशी)