डीआरडीओच्या दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी

0
क्रूझ
जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र (एलआरएलएसीएम)

डीआरडीओ म्हणजेच संशोधन आणि विकास संस्थेने काल 12 नोव्हेंबर 2024 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथे ‘मोबाईल आर्टिक्युलेटेड लाँचर’ च्या सहाय्याने जहाजावरून जमिनीवर मारा करणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची (एलआरएलएसीएम) पहिली उड्डाण चाचणी घेतली.
रडार प्रणाली, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली आणि टेलीमेट्री यासह विविध रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचा बारकाईने मागोवा घेण्यात आला. क्षेपणास्त्राच्या उड्डाण मार्गावर सर्वसमावेशक माहिती मिळवण्यासाठी आयटीआरने विविध ठिकाणी धोरणात्मकदृष्ट्या हे सेन्सर्स तैनात केले होते.

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, क्षेपणास्त्राने वेपॉईंट नेव्हिगेशनची निर्दोषपणे अंमलबजावणी केली आणि वेगवेगळ्या उंचीवर तसेच कठीण परिस्थितीतही वेगाने कामगिरी पूर्ण करण्याची त्याची क्षमता दर्शविली. चाचणीमुळे या गोष्टीची खात्री झाली की सर्व उपप्रणाली अपेक्षेप्रमाणे कार्यरत होत्या आणि मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य केली. याव्यतिरिक्त, हे क्षेपणास्त्र प्रगत आणि सॉफ्टवेअरसह सुसज्ज आहे, ज्यामुळे त्याची विश्वासार्हता आणि परिचालन क्षमता वाढते.

एलआरएलएसीएम हा संरक्षण अधिग्रहण परिषदेचा एक महत्त्वाचा प्रकल्प असून, याला अधिकृतपणे मिशन-मोड प्रकल्प म्हणून मंजुरी देण्यात आली आहे. जमिनीवरील फिरत्या प्रक्षेपकांमधून प्रक्षेपित करण्यासाठी हे तयार केले गेले आहे आणि उभ्या प्रक्षेपण मॉड्यूल प्रणालीचा वापर करून आघाडीच्या नौदल जहाजांमधून देखील ते तैनात केले जाऊ शकते.

डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय कारखान्यांच्या योगदानासह बेंगळूरू येथील हवाई विकास आस्थापनेने एलआरएलएसीएम हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हैदराबाद येथील भारत डायनॅमिक्स आणि बेंगळूरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांनी या प्रकल्पासाठी विकास आणि उत्पादन विषयक भागीदारांची भूमिका निभावली असून सदर क्षेपणास्त्राचे विकसन तसेच एकीकरण यामध्ये त्या सहभागी झाल्या.

डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमध्ये कार्यरत ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच या क्षेपणास्त्राचे अपेक्षित वापरकर्ते असलेल्या तिन्ही सेनादलांचे प्रतिनिधी उपरोल्लेखित चाचणीच्या वेळी उपस्थित होते.

या पहिल्याच उड्डाण चाचणीला मिळालेल्या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, सशस्त्र दले आणि उद्योगांचे कौतुक केले आहे. एलआरएलएसीएमच्या पहिल्या चाचणीला मिळालेल्या यशाबद्दल केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे प्रमुख डॉ.समीर व्ही.कामत यांनी डीआरडीओच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleStrengthening Indo-Vietnam Friendship: Exercise VINBAX-24 Underway
Next articleArmy Veteran Pete Hegseth Is Donald Trump’s Secretary Of Defence Pick

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here