चीनचा इशारा: सागरी हद्दीचे उल्लंघन केल्यास ‘योग्य’ कारवाई करणार
दि. ११ जून: पूर्व चीन समुद्रात आपल्या नौदलाची युद्धनौका आणि त्यावरील विमाने संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर असल्याचा नेदरलँड्सकडून करण्यात येत असलेला दावा खोटा असून, त्यांनी दुसऱ्या देशाच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश करून त्याच्या सार्वोभौमत्त्वाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे. डच युद्धनौकेने केलेले हे कृत्य निंदनीय असून, आपल्या सागरी हद्दीचे उल्लंघन केल्यास ‘योग्य’ कारवाई करण्यात येईल, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे.
पूर्व चीन समुद्रात गस्तीवर असलेल्या डच नौदलाच्या ट्रॉम्प या युद्धनौकेला चिनी हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी आक्रमकपणे घेरल्याचा दावा नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी केला होता. त्याचबरोबर या युद्धनौकेवर असलेल्या हेलिकॉप्टरलाही नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने घेरण्यात आले होते, असे नेदरलँड्सने म्हटले होते. संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाविरोधात घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने पूर्व चीन समुद्रात गस्ती घालण्यासाठी नेदरलँड्सच्या नौदलाची ट्रॉम्प ही युद्धनौका पूर्व चीन समुद्रात आली होती. या वेळी चिनी हवाईदलाच्या दोन लढाऊ विमानांनी या युद्धनौकेला घेरले होते. ही घटना बऱ्याचदा घडली. त्यानंतर चिनी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या ताफ्याने ट्रॉम्पवरील एनएच-९० या हेलिकॉप्टरला घेरले होते. ही विमाने आमची युद्धनौका आणि हेलिकॉप्टरला नुकसान पोहोचवू शकतील इतकी जवळ आली होती, असे नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.
चीनकडून नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाने केलेला दावा फेटाळण्यात आले आहे. उलट नेदरलँड्सच्या युद्धनौकेनेच आमच्या सागरी हद्दीत बेकायदा प्रवेश केला, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. नेदरलँड्सच्या युद्धनौकेकडून घडलेले कृत्य, डच सरकारचे वागणे आणि त्यांनी वापरलेले शब्द सगळेच निंदनीय आहे. त्या विरोधात आम्ही त्यांच्याकडे जोरकस निषेध नोंदवीत आहोत, असे चीनने म्हटले आहे. ‘आपली युद्धनौका संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेवर होती हा हा डचांचा दावा खोटा आहे. उलट त्यांनी आमच्या सागरी आणि हवाई हद्दीत बेकायदा प्रवेश करून आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग केला आहे. त्यांचे हे कृत्य उभय देशांतील मैत्रीपूर्ण संबंध बिघडविणारे आणि विनाकारण तणाव उत्पन्न करणारे आहे,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झांग शियाओगॅंग यांनी म्हटले आहे. नेदरलँड्सकडून करण्यात आलेले हे उल्लंघन आणि चिथावणी देणारे कृत्य चीनकडून ठामपणे मोडून काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटांच्या मालकीवरून चीन आणि जपान यांच्यात तणाव आहे. या दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंधात हा कळीचा मुद्दा मनाला जातो. त्यामुळे पूर्व चीन समुद्रात इतर नौदलांच्या उपस्थितीला चीनकडून सातत्याने विरोध करण्यात येत असतो.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’वरून)