भारत आपले संरक्षण क्षेत्र सातत्याने बळकट करत आहे. स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना आता यश मिळत आहे. अलिकडेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आणखी एक महत्त्वाची कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. देशातील आतापर्यंतचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट डीआरडीओने बनवले आहे. संरक्षण क्षेत्र कशाप्रकारे सातत्याने नवनवीन यशाला गवसणी घालत आहे, याचा आढावाच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बुधवारी घेतला.
दिल्लीतील माणेकशॉ केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलताना जनरल पांडे यांनी संरक्षण क्षेत्रात भारताची वाढलेली आधुनिकता आणि आत्मनिर्भरता याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, भारतीय लष्कर हलकी वाहने आणि बुलेटप्रूफ जॅकेट यांच्याबरोबरच अनेक इतर स्वदेशी सामग्रीची खरेदी करत आहे. एवढेच नव्हे, तर नाइट व्हिजन उपकरणांद्वारे भारतीय सैनिकांची रात्रीच्या वेळी आवश्यक असणारी लढाऊ क्षमता वाढली आहे. याशिवाय दळणवळण प्रणालीही सुधारली जात आहे.
लष्करासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत जनरल पांडे म्हणाले, “सरकारने चार टप्प्यात दिलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांमुळे आम्हाला 18 हजार कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षऱ्या करून स्वतःचे आधुनिकीकरण करण्यास मदत झाली आहे. यापैकी अनेक उपकरणे आता सीमेवर वापरली जात आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या युनिटने उच्च पातळीच्या धोक्यांपासून संरक्षणासाठी देशातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात या जॅकेटची माहिती देण्यात आली आहे. नव्याने विकसित केलेल्या या जॅकेटला देशातील आतापर्यंतचे सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट मानले जात आहे. हे जॅकेट सहा उच्च पातळीच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. हे जॅकेट नवीन डिझाइन पद्धतीवर आधारित आहे, जेथे नवीन प्रक्रियेसह आधुनिक उत्पादन सामग्री वापरली गेली आहे.
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, हे जॅकेट डीआरडीओच्या डिफेन्स मटेरियल अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, कानपूर यांनी तयार केले आहे. हे बुलेटप्रूफ जॅकेट 7.62 X 54 R API दारुगोळ्यापासून संरक्षण प्रदान करण्यास सक्षम आहे.टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी (TBRL), चंदिगड येथे या जॅकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
हे नवे बुलेट प्रूफ जॅकेट अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की, सुरक्षा दलाच्या जवानांना ते परिधान करणे सोपे जाईल.एर्गोनॉमिकली डिझाइन केलेले हे जॅकेट फ्रंट हार्ड आर्मर पॅनेल (एचएपी) पॉलिमर बॅकिंग आणि मोनोलिथिक सिरॅमिक प्लेटचे बनलेले आहे. कामगिरीदरम्यान सैनिकांसाठी ते परिधान करणे अधिक आरामदायक आणि सुरक्षित असेल.
याशिवाय भारताने मंगळवारीच मध्यम श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणीसह क्षेपणास्त्राने वापरलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे प्रमाणीकरण देखील केले. ओडिशाच्या चांदीपूर या किनारपट्टीच्या भागातून त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. चाचणीदरम्यान सर्व प्रणालींनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. क्षेपणास्त्राचे निरीक्षण करण्यासाठी, आयटीआरने संपूर्ण उड्डाण मार्ग विविध रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग प्रणाली, टेलीमेट्री आणि एकाधिक श्रेणी सेन्सरसह सुसज्ज केला होता. भारतीय हवाई दलानेही या मोहिमेत मदत केली.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)