मागील महिन्यात रशियामधील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतही असा हल्ला होण्याची शक्यता फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) संचालकांनी गुरुवारी अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) समितीसमोर बोलून दाखवली.
ख्रिस्तोफर रे यांनी गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदारांना सांगितले की, “मी कायद्याच्या अंमलबजावणीतील माझ्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना, अशा काळाचा विचार करणे मला कठीण जाईल जेव्हा आपल्या सार्वजनिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एकाच वेळी अनेक धोके वाढले होते.”
“पण ही परिस्थिती आहे म्हणून आज मी इथे बसलो आहे,” असेही ते म्हणाले.
22 मार्च रोजी मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्यात किमान 144 लोक ठार झाले. गेल्या 20 वर्षांतील रशियातील सर्वात प्राणघातक हल्ला होता. इस्लामिक स्टेट दहशतवादी गटाच्या एका शाखेने या हल्ल्याची जबाबदारी जरी स्वीकारलेली असली तरी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला होता. अर्थात त्यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे मात्र दिले नाहीत.
गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने प्रेरित होऊन एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या छोट्या गटाने हल्ला करण्याच्या शक्यतेबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांना चिंता आहे.
मात्र रशियातील कॉन्सर्ट हॉलमधील हत्याकांडानंतर अधिक समन्वित (coordinated) पद्धतीने होऊ शकणाऱ्या हल्ल्याच्या शक्यतेने एफबीआयची चिंता वाढली आहे, असे रे यांनी हाऊस अप्रोप्रिएशन्स कमिटीच्या उपसमितीसमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे.
रे यांच्या लेखी साक्षीनुसार, 2023 च्या आर्थिक वर्षाच्या शेवटी, एफबीआयकडे 4,000 आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या घटना तपासासाठी आल्या होत्या.
“काही आठवड्यांपूर्वी रशियन कॉन्सर्ट हॉलमध्ये आम्ही पाहिलेल्या आयएसआयएस-के हल्ल्याप्रमाणेच, येथे अमेरिका या आपल्या मातृभूमीत समन्वित हल्ल्याची शक्यता आहे”, असे रे यांनी त्यांच्या लेखी साक्षीच्या छोट्या आवृत्तीत खासदारांना सांगितले.
रे यांनी एफबीआयसाठी निधी वाढवून मिळावा यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना संस्थेच्या दहशतवादाबद्दलच्या चिंतेचा हवाला दिला असला तरी त्यांना कॉंग्रेसच्या रिपब्लिकनकडून जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.
एफबीआय हे रिपब्लिकन पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एक प्रमुख लक्ष्य बनले आहे. ब्युरोने आपल्या राजकीय शत्रूंबाबत सौम्यपणाची भूमिका घेत आपल्याला अन्यायकारकपणे लक्ष्य केले आहे असा ट्रम्प यांनी आरोप केला आहे.
ट्रम्प यांनी कॉंग्रेसला एजन्सीचा निधी कमी करण्याचे आवाहन केले असून न्याय विभाग आणि एफबीआयला “दुष्ट राक्षस” म्हणून संबोधले आहे.
एफबीआय विरुद्धच्या वाढत्या राजकीय वक्तव्यांमुळे एफबीआय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, दक्षिण कॅरोलिनातील एका व्यक्तीने त्याच्या गाडीने एफबीआयच्या अटलांटा कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
“आम्ही आर्थिक वर्ष 2022 ते 2023 पर्यंत एफबीआयच्या कर्मचारी आणि सुविधांसाठीच्या धोक्यांमध्ये लक्षणीय वाढ पाहिली आहे”, असे रे यांनी खासदारांना सांगितले. “खरं तर, आम्ही त्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी एक युनिटही तयार केले.”
2017 मध्ये ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्या रे यांनी, 2024 च्या आर्थिक अर्थसंकल्पात असलेल्या 50 कोटी डॉलर्स कमी पडल्यानंतर, ब्युरोचे अंदाजपत्रक “पुन्हा रुळावर” आणण्यासाठी मदत करण्याचे खासदारांना आवाहन केले.
रे यांनी या महिन्यात कालबाह्य होणाऱ्या अमेरिकेच्या सर्व्हेलन्स प्रोग्रॅमचे नूतनीकरण करावे यासाठी खासदारांवर दबाव आणला आणि त्याला अमेरिकेच्या विरोधकांविरुद्ध एक अपरिहार्य साधन म्हटले. सरकारच्या पाळत ठेवण्याच्या अधिकारांना आळा घालण्यात हा कार्यक्रम पुरेसा यशस्वी ठरला नसल्याने बुधवारी सभागृहात त्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेली किरकोळ आर्थिक तरतूद रोखण्यात आली.
“आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे आणि आम्ही संकटाच्या काळात आहोत,” असे रे यांनी खासदारांना सांगितले.
“मी तुमच्याशी प्रामाणिक राहीन, आणि हे सांगताना मला वेदना होत आहेत, परंतु माझा तुमच्यावर विश्वास नाही,” असे रिपब्लिकन काँग्रेसचे सदस्य माईक गार्सिया यांनी गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी रे यांना सांगितले.
“मला असे वाटते की ही तुमच्या एजन्सीसाठी खरेतर नेतृत्वाची समस्या आहे. निधीची समस्या फार मोठी नाही.”
पिनाकी चक्रवर्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)